Swachh ATM : प्लास्टिक, काचेच्या जुन्या बाटल्या मिळवून देणार तुम्हाला पैसे! : शहरात ठिकठिकाणी बसणार स्वच्छ एटीएम

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

प्लास्टिक, काचेच्या जुन्या बाटल्या मिळवून देणार तुम्हाला पैसे!

: असे आहेत दर

:  शहरात ठिकठिकाणी बसणार स्वच्छ एटीएम

पुणे : प्लॅस्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, धातूचे कॅन्स, प्लॅस्टिक रॅपर अशा पुनर्वापर होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी शहराच्या विविध भागात स्वच्छ एटीएम मशिन्स बसविण्यात येणार असून, या मशिन्समध्ये कचरा टाकल्यानंतर नागरिकांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ठरलेल्या दराप्रमाणे पैसे जमा होणार आहेत. इकोमक्स गो (इं) या स्टार्टअप कंपनीच्या अभिनव योजनेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

:वाय फाय आणि बँक खाते उघडण्याची सोय

याबाबत रासने म्हणाले, ‘पुनर्वापर होणारा कचरा या एटीएम मशिन्समध्ये संकलित केला जाणार आहे. त्यामुळे कचरा संकलनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी या मशिनमध्ये नागरिकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर कचऱ्याचा कुठला प्रकार निवडायचा आहे त्याची माहिती द्यावी लागणार आहे. प्लॅस्टिकच्या एका बाटलीसाठी एक रुपया, काचेच्या बाटलीसाठी तीन रुपये, धातुच्या कॅनसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्लॅस्टिक रॅपर्ससाठी प्रत्येकी वीस पैसे जमा होणार आहेत.’
रासने पुढे म्हणाले, ‘ज्या ठिकाणी ही मशिन्स बसविली जाणार आहेत त्यासाठी २४ तास मोफत वाय-फाय, नवीन बॅंक खाते उघडण्याची सोय, नवीन सिम कार्ड खरेदी, सिनेमा, लोगल, रेल्वे, बसेसच्या तिकिटांची खरेदी, फी भरणे, पैसे पाठविणे अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एटीएममध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. एटीएमची उंची ६ फूट आणि रुंदी ४ फूट असणार आहे. या मशिनमध्ये तीन स्क्रिन असणार आहेत. पुढील स्क्रिनवर मशिन वापरणाऱ्याची  माहिती, महापालिकेच्या जाहिराती, अन्य कंपन्यांच्या जाहिराती असणार आहेत. दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली, वाराणसी या ठिकाणी या मशिन्स कार्यान्वित आहेत. पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी दहा वर्षे मुदतीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत चाळीस मशिन्स टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहेत.’

Leave a Reply