Additional commissioner Vikas Dhakne | भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुणे मनपात येण्याची मिळाली संधी!

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र
Spread the love

भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुणे मनपात येण्याची मिळाली संधी!

पुणे : महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झालेले विकास ढाकणे (Additional commissioner Vikas Dhakne) यांची आता पुणे महापालिकेत (PMC Pune)  अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील एका बड्या नेत्याने मदत केल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. पुणे महापालिकेत येण्यासाठी बरेच अधिकारी इच्छुक असतात. (pune municipal corporation)

विकास ढाकणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या मदतीने एकहाती कारभार चालवला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांना पुरक भूमिका घेतल्यामुळे ढाकणे भाजपाकडून ‘लक्ष्य’ झाले होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ढाकणे यांची बदली झाली. त्यांना काही काळासाठी रेल्वे सेवेत (IRPFS) काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, पुणे महापालिकामधील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खेचाखेची सुरू असतानाच राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर वर्णी लागण्यासाठी महापालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती. यामध्ये प्रतिस्पर्धी अधिकाऱ्याचा स्पर्धेतून पत्ता कट करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर केला. या पदावर नेमकी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता असताना, राज्य शासनाने महापालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश राज्य नगरसचिव विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत. या प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या एका बड्या नेत्याने ढाकणे यांना मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.