Zilla Parishad teacher : transfer process : जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया आता अधिक पारदर्शक!

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र
Spread the love

जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया आता अधिक पारदर्शक 

: सॉफ्टवेअरची निर्मिती सुरू

 

पुणे- जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पारदर्शक, वेगाने करण्यासाठी आता राज्य सरकारने एका सॉफ्टवेअरची निर्मिती सुरू केली आहे. या सॉफ्टवेअरच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून येत्या एप्रिलपर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित असून मे महिन्यांपासून बदल्यांची प्रक्रिया या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होईल.

सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने पुणे, सातारा आणि वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली. सॉफ्टवेअर निर्मिती करणाऱ्या कंपनीला मार्गदर्शन करण्याचे काम ही समिती करणार आहे. त्या समितीची पुण्यात मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये काही सूचना केल्या आहेत. राज्यातील जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनेकदा घोळ होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींची दखल राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतली.

 

बदल्यांची प्रक्रिया कशा पद्धतीने राबविण्यात यावी. त्यावर नेमक्‍या कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यात सातारा, वर्धा, रायगडसह काही जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्या समितीने राज्य सरकारला बदली प्रक्रिया कशापद्धतीने राबविता येईल या शिफारशींचा अहवाल दिला होता. शिफारशीनुसार सरकारमार्फत तयार करण्यात येणारे हे सॉफ्टवेअर मराठी, इंग्रजी भाषेत आहे. हे सॉफ्टवेअर संगणकासह मोबाईलद्वारे वापरता येणार असून त्याद्वारे संपूर्ण प्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे. सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा याची माहितीदेखील दिली जाणार आहे. सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यासाठी अवघ्या तीन सेकंदाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a Reply