‘टेंडर’ जगतापांचा पुणेकरांना ताप : भाजपचा राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांच्यावर पलटवार

Categories
PMC पुणे
Spread the love

 ‘टेंडर’ जगतापांचा पुणेकरांना ताप

: भाजपचा राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांच्यावर पलटवार

पुणे: महानगरपालिकेतील प्रत्येक विकास प्रस्तावाला विरोध करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक प्रशांत जगताप राबवत आहेत. पुणेकरांच्या विकासाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मोठा ताप ठरत आहेत, अशी टीका भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळिक आणि महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे.

पुण्याचा विकासाला सुरूंग लावण्यास सुरूवात

निवेदनात दोघांनी म्हटले आहे, की महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जगताप यांनी उशिराने विरोध केलेल्या प्रस्तावांना पालिकेतील त्यांच्याच पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आधी मान्यता दिलेली आहे. यामुळे वारंवार पुण्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद समोर येत आहेत. पुणे महानगरपालिकेत सर्व पक्षांमध्ये विकासाप्रती असलेले सौहार्द नष्ट करण्याचा विडा जगताप यांनी उचलला आहे. त्यांच्याच पक्षातील सदस्यांचे विकासाबद्दलचे धोरण सुस्पष्ट असताना केवळ आणि केवळ पुढारपणापोटी त्यांनी पुण्याचा विकासाला सुरूंग लावण्यास सुरूवात केली आहे. महानगरपालिकेत शहराच्या सामान्य नागरीकांचा विचार व्हावा, यासाठी सर्व समित्यांमध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी घेतलेले असतात. सर्वांनी मिळून शहर घडवावे, असा विचार त्यामागे असतो. जगताप यांनी शहर बिघडवण्याचा उद्योग मांडला आहे.  जगताप यांनी महापौर म्हणून काम केले आहे. त्यांना शासकीय कामाची पद्धत माहिती असावी, असा आमचा समज आहे. शासकीय कामे निविदा प्रक्रियेतून होतात. हे काम ऑनलाईन होते. त्यामध्ये पारदर्शकता असते. मात्र, कुठलेही टेंडर आले, की विरोध करण्यास जगताप यांनी सुरूवात केली आहे. पुण्यात एकही काम होऊच द्यायचे नाही, असे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे त्यांचे वर्तन सुरू झाले आहे.

– सर्व काही निवडणुकीसाठी

महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे; मग एकही काम होऊ द्यायचे नाही, असे फक्त जगताप यांनी ठरवले आहे. एकही विकास काम होऊ न देण्यात पुणेकरांचे किती नुकसान आहे, हे न समजण्याइतके पुणेकर अज्ञानी नाहीत, असेही बिडकर म्हणाले. पुण्यात २०१७ साली भाजप प्रथमच महानगरपालिकेत सत्तेवर आला. गेल्या साडेचार वर्षांत मेट्रोपासून ‘२४ बाय ७’ पर्यंतची कामे जनतेसमोर आहेत. ही कामे पक्षाने पुणेकरांच्या पाठबळावर आणि पुणेकरांचा विश्वास राखत उभी केली. जगताप विचारतात, भाजपने काय काम केले. त्यांनी भानावर येऊन डोळे उघडून पाहिले, तरी कामे दिसतील. नगरसेवक होऊन, महापौर होऊन त्यांनी काय काम केले? पुण्यात वीस वर्षे सत्तेवर राहून काय दिवे लावले, हे जनतेला माहिती आहेत. गेली दोन वर्षे जग कोरोनाशी झगडत असतानाही आम्ही पुण्याला विकासात मागे पडू दिले नाही. जगताप यांची विकासाची व्याख्या काय आहे, हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. प्रत्येक विकास कामे म्हणजे वसुली, असे यांचे धोरण आहे का, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. त्यांनी कधीतरी गांभिर्याने आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठांचे धोरण समजून घ्यावे. ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार वंदनाताई चव्हाण यांनी विकास कामे करताना काय भूमिका ठेवली होती, याचा अभ्यास करावा. विकास कामे म्हणजे फक्त टेंडर आणि वसुली नव्हे, हे समजून घ्यावे.
महापालिकेतील सर्व निविदांना जगताप विरोध करतात. परंतू याच निविदांच्या मान्यतेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद हे एकमताने पाठींबा देतात. विरोधी पक्षनेत्या देखील जगताप यांच्या बरोबर नसतात. पालिकेतील विरोधी पक्षनेत्या तसेच विविध समित्यांमधील राष्ट्रवादीचे सभासद त्यांच्या या मनमानी कारभाराला वैतागले आहेत.

गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

Leave a Reply