महापालिकेतील ‘कारभारी’ बदलण्यासाठी राष्ट्रवादी तयारीत! : राष्ट्रवादीची 238 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर : जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न

Categories
पुणे
Spread the love

महापालिकेतील ‘कारभारी’ बदलण्यासाठी राष्ट्रवादी तयारीत!

: राष्ट्रवादीची 238 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर

: जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न

पुणे: आगामी महापालिका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीने काहीही करून महापालिकेतील ‘कारभारी’ बदलण्याचा चंग बांधला आहे. आगामी काळात भाजपाला टार्गेट करत शहरात आक्रमक होण्यासाठी राष्ट्रवादीने तब्बल 238 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या माध्यमातून पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय राष्ट्रवादीकडे पहिल्यापासूनच कार्यकर्त्यांची फळी राहिलेली आहे. मात्र त्यांना वाव मिळत नव्हता. या निम्मित्ताने पक्षाने सर्वांची एकत्र मोट बांधली आहे.

: महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक बनले प्रवक्ते

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, शहराची लोकसंख्या लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादीने एवढी मोठी कार्यकारिणी पहिल्यांदाच जाहीर केली आहे. नवे आणि जुने असे सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. आगामी काळात अजून काही कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. फक्त महापालिका नाही तर येणाऱ्या काळातल्या सर्व निवडणूका पूर्ण ताकदीने लढण्यासाठी ही कार्यकारिणी केली आहे. त्याचप्रमाणे आता शहराला योग्य न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असेल, असे ही जगताप यांनी सांगितले.
दरम्यान पार्टीने शहरात 5 प्रमुख प्रवक्ते नियुक्त केले आहेत. ही सर्वच लोक महापालिकेत अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. यामध्ये विशाल तांबे, भैयासाहेब जाधव, योगेश ससाणे, महेंद्र पठारे व प्रदीप देशमुख यांचा समावेश आहे. तर 8 विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 5 ते उपाध्यक्ष यांची देखील नियुक्ती केली आहे. खजिनदार पदी ऍड निलेश निकम तर प्रसिद्धी प्रमुख पदी अमोघ ढमाले यांची निवड पक्षाने केली आहे.

: भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपाला टार्गेट करण्याचा मानस राष्ट्रवादीने ठेवला आहे. कारण नुकतेच एमेनिटी स्पेस चा मुद्दा गाजतोय. या विषयात राष्ट्रवादी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना बदनाम होण्याची वेळ आली आहे. हे टाळण्यासाठी आणि लोकांमध्ये पक्षाची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी राष्ट्रवादी नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रयत्न करेल. हे करण्यासाठी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी सातत्याने करणार आहे.  मात्र हे करत असतानाच शहर अध्यक्षांना अंतर्गत कलहाचा ही गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण अमेनिटी स्पेस च्या विषयात हा अनुभव आला आहे. हे सर्व पाहता आगामी काळात पार्टी लोकांच्या नजरेत कशी भरेल, हे येणारा काळच ठरवेल.
शहराची लोकसंख्या वाढतीय. शिवाय 34 गावें समाविष्ट झाली आहेत. एवढ्या मोठ्या शहरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि पक्षाची धोरणे पोचवण्यासाठी एवढी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. आगामी काळात चांगले प्रयत्न करून पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा आमचा मानस आहे.

 प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे.

गेल्या साडेचार वर्षात भाजपने जो भष्ट्राचार केला आहे, तो चव्हाट्यावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिवाय कोविड च्या काळात ही जे अवैध काम केले गेले, ते मुख्य सभेच्या माध्यमातून पुणेकरांसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.

   भैय्यासाहेब जाधव, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस.

Leave a Reply