Anti-witchcraft law : जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठी लवकरच कृती आराखडा

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र
Spread the love

जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे-धनंजय मुंडे

कायद्याचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्यासाठी लवकरच कृती आराखडा

पुणे  – जादूटोणाविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून अंधश्रद्धा, अफवा व त्यामधून घडणाऱ्या कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी या कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी स्थापन केलेल्या समितीच्या माध्यमातून व्यापक प्रयत्नांची गरज असून त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीच्यावतीने पुणे येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेच्या दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आलेल्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके, भारत केंद्रे, प्रशांत चव्हाण, रवींद्र कदम, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहेत. मात्र आजही काही भागात नरबळी, अंधश्रद्धांच्या माध्यमातून लैंगिक शोषण, अत्याचार असे अनेक प्रकार घडल्याचे कानावर येतात. त्यात कायदा आपले काम करतोच. परंतु, या कायद्याची कडक अंमलबजावणी होऊन हे प्रकार कायमचे थांबले पाहिजेत यासाठी या कायद्याचा अधिकाधिक प्रसार जनसामान्य वर्गात व्हायला हवा. यादृष्टीने एक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

समाजाला अंधश्रद्धांच्या विळख्यातून बाहेर काढून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी हा कायदा पोषक असून विभागाच्यावतीने सामाजिक न्याय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली व्यापक प्रसार मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे सचिव श्री. भांगे यावेळी म्हणाले.

कार्यशाळेस जादूटोणाविरोधी कायदा प्रसार समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी यावेळी उपस्थितांना कायद्याची ओळख करून दिली. तसेच समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे सर्व प्रादेशिक उपायुक्त, जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply