Metro Station : निगडी ते कात्रज मेट्रो मार्गावर भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर येथे मेट्रो स्टेशन करा

Categories
पुणे
Spread the love

 निगडी ते कात्रज मेट्रो मार्गावर भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर येथे मेट्रो स्टेशन करा

: नगरसेवक विशाल तांबे यांची मागणी

पुणे: पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मेट्रो मार्गाच्या प्रस्तावाला नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. परंतु, स्वारगेट ते कात्रज या मार्गात स्वारगेट-साईबाबा नगर (पद्मावती)-कात्रज हे मेट्रोचे तीनच स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहेत. या मार्गावर पद्मावती ते कात्रज दरम्यान स्टेशन नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ती दूर करण्यासाठी या दोन्ही स्टेशनच्या मध्ये बालाजी नगर किंवा भारती विद्यापीठ यापैकी एका ठिकाणी मेट्रो स्टेशन असणे आवश्यक आहे. याबबतची दुरुस्ती महामेट्रोने आपल्या डिपीआर मध्ये करावी.  याबाबत या भागातील नागरिकांची सातत्याने मेट्रो स्टेशन बाबत मागणीही होत आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेऊन हा थांबा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक विशाल तांबे यांनी महामेट्रो तसेच राज्य सरकार, खासदार सुप्रिया सुळे यांना केली आहे.

: सुधारित डीपीआर मध्ये अंतर्भूत करा

तांबे यांच्या पत्रानुसार दक्षिण पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो ही अत्यावश्यक बाब आहे. ही मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी असताना मेट्रोसाठी स्वारगेट ते कात्रज जे स्टेशन बनविण्यात आले आहेत, त्यासाठी लावण्यात आलेले निकष काही प्रमाणात चुकीचे आहेत. आज आपण दिल्लीतील यशस्वी मेट्रोमार्गाचे स्टेशन पाहिल्यास साधारणपणे एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर एक स्टेशन करण्यात आला आहे. त्यामुळे, प्रवाशांची सोय होत असून, मेट्रोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, पुण्यात मात्र स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाचे स्टेशन पाहता, ते प्रवाशांच्या सोयीने अडचणीचे ठरणार असल्याने त्यास कितपत प्रतिसाद मिळेल, हा प्रश्न आहे.
आज धनकवडी, बालाजी नगर, भारती विद्यापीठ परिसर, चैतन्यनगर, आंबेगाव पठार हा परिसर दाट लोकवस्तीचा असून 2-3 लाख नागरिक या परिसरात रहात आहेत. तसेच या परिसरात शासकिय व निमशासकिय आस्थापना आणि भारती विद्यापीठ पीआयसीटी यासारख्या शिक्षणसंस्था या परिसरात कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, कामगार, नोकरवर्ग आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट देणारे पर्यटक यांचा विचार करता जवळपास एक लाखाहून अधिक प्रवासी या परिसरात रोज ये-जा करीत असतात. परंतु, सध्या मार्गावरील जे स्टेशन प्रस्तावित आहेत, त्यामध्ये साईबाबा नगर (पद्मावती) नंतर थेट कात्रज स्टेशन देण्यात आले आहे. या दोन्ही स्टेशनमधील अंतर साधारणपणे दोन  किलोमीटरपेक्षा अधिक असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. मेट्रो ही प्रवाशांच्या सोयीसाठी, वेळ वाचविण्यासाठी असताना एका स्टेशनवर उतरून आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिकांना पुन्हा पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे, मेट्रो सेवा सुरू करण्याचा नेमका उद्देश साध्य होणार का, असा प्रश्न आहे. त्यामुळे, या सर्व स्टेशनचा आढावा घेऊन बालाजी नगर किंवा भारती विद्यापीठ येथे स्टेशन होणे ही नागरिकांच्या सोयीचे व गरजेचे आहे. या ठिकाणी स्टेशन झाल्यास धनकवडी व बिबवेवाडीला जाणारा समांतर रस्ता जोडला जाईल. त्यामुळे बिबवेवाडीतील नागरिकांनाही थेट या स्टेशनवरून मेट्रोचा प्रवास करता येणे सहज शक्य होणार आहे.
कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे यश-अपयश हे प्रवाशांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो, त्यावर अवलंबून असते. त्यामुळे, मेट्रोच्या स्टेशनबाबत निर्णय घेताना ही वाहतूक व्यवस्था प्रवाशांच्या अधिक सोयीची कशी होईल, याचा विचार होण्याची गरज आहे, असे वाटते. या आराखड्यात अद्याप बदल होणे शक्य आहे.
त्यामुळे स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर नवीन प्रस्तावित भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर स्टेशनचा अंर्तभाव डिपीआर मध्ये करावा. ही सर्व धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार परिसर येथील नागरिकांकडून मागणी आहे.
तरी भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर या मेट्रो स्टेशनचा अंर्तभाव महामेट्रोने स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाच्या सुधारीत डिपीआर मध्ये करावा.

Leave a Reply