Pune Rain : पावसाने केला भाजपच्या अपयशाचा पंचनामा : मोहन जोशी यांची टीका

Categories
PMC पुणे
Spread the love

 

पावसाने केला भाजपच्या अपयशाचा पंचनामा

– माजी आमदार मोहन जोशी यांची खरमरीत टीका

पुणे – मुसळधार पावसामुळे शहरात शनिवारी साचलेले पाणी, रस्त्यावरचे जागोजागी पडलेले भयावह खड्डे यातून महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा अपयशी कारभाराचाच पंचनामा झाला, अशी खरमरीत टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

 

: बापट, पाटील नगरसेवकांना जाब विचारत नाहीत

गेले काही महिने शहरातील सर्वच रस्त्यांवर भयावह खड्डे पडले आहेत. रस्ते दुरुस्तीही सत्ताधारी भाजपला जमलेली नाही. दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी केली, साध्य काहीही झाले नाही. मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मीरोड तर दुरुस्ती नंतर अधिकच बिघडला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. गेले दोन, तीन वर्ष सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस पडतो आणि भीषण परिस्थिती उदभवते. हे लक्षात घेऊन सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करायला हवी होती. परंतु, टक्केवारीत रमलेल्या महापालिकेतील भाजप नेत्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आणि शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे कात्रज, बिबवेवाडी, धानोरी, बालेवाडी वगैरे उपनगरांमधील रस्ते पाण्यात बुडाले. तास, दीडतासाने पाणी ओसरल्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. पावसात अडकलेल्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. या पावसाने स्मार्ट सिटी म्हणून उदोउदो करणाऱ्या भाजपच्या कारभाराचा पंचनामाच केला, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. काही जखमींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, काही कायमचे जायबंदी झाले. रस्त्या़ंची कामे निकृष्ट दर्जाची झाली. दुरुस्तीबाबत हलगर्जीपणा करण्यात आला. याबाबत भाजपचे नेते खासदार गिरीश बापट, आमदार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गप्प आहेत. आपल्या नगरसेवकांना जाब विचारण्याचे धाडस त्यांच्यात नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी म्हणून निवडलेल्या बाणेर, बालेवाडी भागातही पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक सोसायट्यांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

Leave a Reply