Spread the love

महापालिका निवडणूक : तीन सदस्यीय प्रभाग रचना

: महाविकास आघाडीसाठी सोपे वाटप

मुंबई/ पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुंबई वगळता इतर ठिकाणी तीन सदस्यीय प्रभागरचनेला मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन सदस्यीय तर एकनाथ शिंदे हे चारजणांच्या प्रभागासाठी आग्रही होते. त्यातून तोडगा काढत ही प्रभागरचना तीनची ठरणार असल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या कायद्यात एक सदस्यीय प्रभागरचना असा उल्लेख आहे. आज झालेल्या बैठकीत बहुसदस्यीय प्रभागरचनेस मंजुरी देण्यात आली. अधिकृतरित्या हा प्रभाग किती सदस्यांचा असेल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. नगपपालिका आणि नगरपरिषदा यांसाठी मात्र दोन सदस्यांचा प्रभाग ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

: निवडणूक फेब्रुवारीत होणार हे स्पष्ट

मुंबईत एक, तर पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूरसह इतर साऱ्या महापालिकांसाठी तीन सदस्यांच्या प्रभागावर ठाकरे सरकारने शिक्कामोर्तब केलयाचे सांगण्यात आले. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका मुदतीत म्हणजे, फ्रेबुवारीत होणार असल्याचे स्पष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची युती होणार असल्याची चर्चा आहे. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचे तीनही पक्षांनी जाहीर केले आहे. तसे झालेच तर तीनचा प्रभाग असल्याने जागावाटपही सोपे होणार असल्याची चर्चा या निर्णयानंतर सुरू झाली आहे.

मुंबई वगळता राज्यातील अन्य महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे. खरं तर हा निर्णय करायला राज्य सरकारने उशीरच केला आहे. परंतु तीनही पक्षात कुठल्याही विषयात एकवाक्यता नसल्याने ही दिरंगाई अपेक्षित होती. पुणे महापालिकेत प्रभाग कितीचा आणि कसाही झाला तरी पुणेकरांचा कौल भाजपच्याच बाजूने राहणार असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे.  पुण्यासाठी कोणतीही ठोस योजना सरकारला करता आलेली नाही. पुणे शहराला आजपर्यंत शून्य निधी उपलब्ध करून दिला. भाजपचे बूथप्रमुख, बूथसमिती, शक्तीकेंद्र प्रमुख आदी संघटनात्मक रचना पूर्ण झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घरोघरी संपर्क सुरू आहे. महापालिकेतील उत्तम काम, संघटनात्मक बांधणी, पुणेकरांचा विश्वास आणि राज्य सरकारचे अपयश यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे.

जगदीश मुळीक, शहर अध्यक्ष, भाजप.

प्रभाग रचना कशी का असेना; लढणे हे आपल्या स्वभावात आहे. आम्ही संघर्ष करणार. सगळ्या रचनांची निवडणूक आम्ही लढलो. आता या रचनेत ही विजय मिळवू. शिवाय मनसेचे जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार.

       वसंत मोरे, शहर अध्यक्ष, मनसे

तीन सदस्यीय प्रभाग रचनेचे आम्ही स्वागत करतो. शिवाय लोकांची कामे करणाऱ्याला काही अडचण येत नसते. आताच्या सत्ताधाऱ्यांना पुणेकर जागा दाखवतील. तसेच या निवडणुकीत शिवसेना यश खेचून आणेल.

        पृथ्वीराज सुतार, गटनेता, शिवसेना.

सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सरकारने चांगला मध्य काढला आहे. कांग्रेस या निवडणुकीत चांगल्या प्रकारे प्रयत्न करून कांग्रेस चा झेंडा आम्ही महापालिकेवर फडकावू.

आबा बागुल, गटनेता, काँग्रेस.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि सरकारचे अभिनंदन करतो. आघाडी असो अथवा स्वबळावर आम्ही ही निवडणूक सहजपणे जिंकू, असा आत्मविश्वास आम्हाला आहे. पक्ष संघटन मजबूत करून आम्ही राष्ट्रवादीचा महापौर बनवणार, हे निश्चित.

     प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

 

राज्य सरकारने तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्याने अत्यंत अनुकूल स्थिती भारतीय जनता पक्षासाठी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन सदस्यांचा प्रभाग व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. मार्च २०२१ च्या निवडणुकीत ‘अब की बार सौ पार ‘ असेच चित्र निश्चित पाहायला मिळेल.

गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

Oooooooooo

Leave a Reply