पीएमपीएमएलच्या पास दरात कपात, तिकीटदरवाढही रद्द : पुणेकरांना दिलासा : पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

Categories
पुणे
Spread the love

पीएमपीएमएलच्या पास दरात कपात, तिकीटदरवाढही रद्द

: पुणेकरांना दिलासा

: पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पासेसच्या दरात  कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी ७ सप्टेंबरपासून केली जात आहे. तर दुसरीकडे तिकीट दरवाढ करण्याचा पीएमपीएमएल प्रशासनाचा निर्णयही रद्द करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पासेसचे दर कमी करण्यासंदर्भात आणि दरवाढ टाळण्यासाठी महापौर मोहोळ यांनी आग्रही सूचना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. यात महापौर मोहोळ यांच्यासह पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, पीएमपीएमएल अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, संचालक प्रकाश ढोरे आदी उपस्थित होते.
या बैठकीबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणेकरांनी शहरांतर्गत प्रवासासाठी अधिकाधिक वापर पीएमपीएमएलचा करावा, यासाठी पासेसच्या दरात सवलीतीचा निर्णय घेतला आहे. ही कपात म्हणजे पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा आहे. पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करण्याचे टप्पे सुरु तर आहेतच शिवाय आहे त्या स्थितीतही प्रवाशांना दिलासा देणे आवश्यक होते. म्हणूनच संचालक मंडळाच्या बैठकीत दर कपातीची सूचना केली’.

: तिकिटदरातील प्रस्तावित दरही रद्द

पासेसच्या दरकपातीसोबत झालेल्या निर्णयांची माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, तिकीट दर वाढवण्यासाठीचा प्रस्तावही संचालक मंडळाच्या बैठकीसमोर आला असता तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पीएमपीएमएलच्या मिळकतींवर सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याच्या निर्णयालाही मान्यता देण्यात आली आहे. याचशिवाय मिळकती व्यापारी तत्त्वावर विकसित करण्यासाठी ‘व्हिजिबलिटी स्टडी रिपोर्ट’ करण्याच्या निर्णयालाही मान्यता देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या दहावर्षांवरील डिझेल बसेसचे रूपांतर इलेक्ट्रिक किंवा सीएनजीमध्ये करायचे याचा संबंधित संस्थेकडून अहवाल तयार करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे’.

असे असतील नवे दर !

: दैनिक सामान्य पास
एका मनपा हद्दीत : ₹ ४०
दोन्ही मनपा हद्दीत : ₹ ५०
मनपा हद्दीबाहेरसह : ₹ ७०
: मासिक पास- सामान्य
एका मनपाहद्दीत : ₹ ९००
दोन्ही मनपा हद्दीत : ₹ १२००
मनपा हद्दीबाहेरसह : ₹१४००

Leave a Reply