मुंबई आणि पुण्यात धोक्याची घंटा! – कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले; पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले

Categories
महाराष्ट्र
Spread the love
मुंबई आणि पुण्यात धोक्याची घंटा!
– कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले 
पुणे/मुंबई : पुणे आणि  मुंबईत करोनारुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायी चित्र दिसू लागल्यानंतर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मागील काही दिवसांपासून दोन्ही शहरात रुग्णसंख्येने पुन्हा उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत आग्रीपाडा येथील अनाथाश्रमात २२ आणि कांदिवलीच्या एका सोसायटीत सहा रुग्ण आढळल्याने, ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. तसेच पुण्यातही गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे.

अनाथाश्रमात २२ जणांना लागण

मुंबईतील आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील आरोग्य शिबिरात मुले आणि कर्मचारी मिळून तब्बल २२ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. यात १२ वर्षांखालील चार, १२ ते १८ वर्षांपर्यंतची १२ मुले आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील चार मुलांना नायर रुग्णालयातील मुलांसाठीच्या विभागात, तर उर्वरित १८ जणांना भायखळ्यातील रिचर्डसन क्रुडास करोना केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून करोनारुग्ण सातत्याने कमी होत होते. त्याअनुषंगाने राज्य सरकार, पालिकेने अनेक निर्बंध शिथीलही केले आहेत. या परिस्थितीत आग्रीपाड्यातील सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन मुले काही दिवसांपूर्वी करोनाग्रस्त झाल्याचे आढळले. पालिकेच्या ई विभागाने तातडीने सतर्कता दाखवत दोन दिवसांपूर्वी येथील मुले व कर्मचारी अशी ९५ जाणांची करोनाचाचणी केली. यात एकूण २२ जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

– पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले 
पुणे शहरात मागील महिन्यापासून आशादायक चित्र दिसू लागले होते. मात्र ह्या आठवड्यात पुन्हा कोरोना ने उसळी मारल्याचे दिसून येत आहे. पुण्यात दररोज 150-200 पर्यंत रुग्ण आढळून येत. मात्र बुधवारी 399 तर गुरुवारी 282 रुग्ण आढळून आले. त्या तुलनेत मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा मानली जात आहे. 

Leave a Reply