शहरी गरीब योजना सर्व खाजगी दवाखान्यात!

Categories
PMC
Spread the love

शहरी गरीब योजना सर्व खासगी रुग्णालयात सुरू ठेवणार

– स्थायी समितीची मान्यता

द कारभारी वृत्तसेवा

पुणे. एक लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या  नागरिकांसाठी वरदान ठरलेली महापालिकेची शहरी गरीब योजना शहरातील सर्व खासगी रुग्णालयात सुरू ठेवण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘महापालिका प्रशासनाने काही खासगी रुग्णालये शहरी गरीब योजनेतून वगळली होती. त्यामुळे योजनेत सहभागी झालेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. खासगी रुग्‌णालयात छोट्या-मोठ्या आजारांसाठी, शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार्या रुग्णांना या योजनेमुळे मोठी आर्थिक सवलत मिळते. ह्दय, किडनी, कॅन्सर अशा खर्चिक आजारातील रुग्णांसाठी ही योजना उपकारक आहे. कोरोना काळात आर्थिक परिस्थिती खालावलेल्या कुटुंबांसाठी या योजनेत उपचार घेणे दिलासाकारक ठरणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची गरज लक्षात घेता सर्व खासगी रुग्णालयात ती उपलब्ध असणे आवश्यक आहे.’

रासने पुढे म्हणाले, ‘सन २००९ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी या योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतकरधारक किंवा सदनिकाधारक लाभार्थ्यांच्या चौकशी करणार्या नोटिसा प्रशासनाने पाठवल्या होत्या. परंतु लाभार्थी मिळकतकरधारक किंवा सदनिकाधारक नसावा अशी कुठलीच अट या योजनेच्या नियमावलीत नव्हती. तसेच या लाभार्थ्यांचे उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असेलच असे ही नाही. ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त, विधवा महिला, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे मिळकतकरधारक आहे म्हणून या लाभार्थ्यांना योजनेतून वगळता येणार नाही अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.’

Leave a Reply