Prashant Jagtap : Deepali Dhumal : BJP : Kirit Somaiya : …. शेवटी ज्याची त्याची पायरी!

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

…. शेवटी ज्याची त्याची पायरी!

: प्रशांत जगतापांचा टोला

पुणे : पुणे महापालिकेत(Pune municipal corporation) भाजप नेते किरीट सोमय्या(BJP leader kirit somaiya)  यांचा सत्कार करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. जगताप म्हणाले, कोणाच्या सत्कारासाठी मोठमोठी व्यासपीठे कमी पडतात; तर कोणाच्या सत्कारासाठी पायरीही पुरेशी असते. असो .. शेवटी ज्याची त्याची पायरी…

जगताप म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या आज पुणे महानगरपालिकेत येणार असल्यामुळे पुणे महानगरपालिका व परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. महानगरपालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ जवळपास ३००-३५० पोलिसांचा जागता पहारा होता. काल दुपारपासूनच शिवाजीनगर पोलिसस्थानक, एसीपी, डीसीपी यांनी तातडीने बैठकांचं आयोजन करून माझ्यासह पुणे शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आंदोलन करू नये याबाबत विनंती केली. या सर्व गोष्टी सुदृढ लोकशाहीसाठी मारक आहेत. तक्रार करण्यासाठी माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणून त्यांना झूम मिटिंग, ईमेल, व्हाट्सऍप असे अनेक मार्ग उपलब्ध असताना केवळ चमकोगिरी, स्टंटबाजी करण्यासाठी त्यांनी संपूर्ण पुणे शहरास वेठीस ठरून अतिशय चुकीचं उदाहरण प्रस्थापित केलं आहे.

पुणे शहराच्या बाहेरील भारतीय जनता पार्टिचा एक माजी खासदार केवळ एखाद्या पक्षाला बदनाम करण्यासाठी, राजकीय फायद्यासाठी पुणे शहरातील पोलीस दलास नाहक कामास लावतो हे दुर्दैवी आहे. विचारवंतांचे शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात यानिमित्ताने भाजपची वैचारिक दिवाळखोरी नागरिकांना पहायला मिळाली. ५-६ दिवसांपूर्वी किरीट सोमेय्या महानगरपालिकेत आले, स्टंटबाजी करण्याच्या नादात स्वतःच पायरीवरून घसरले, आपल्यावर हल्ला झाल्याचा त्यांनी खोटा बनाव केला. त्यानंतर आज पुन्हा महानगरपालिकेत येण्यासाठी हट्ट धरला. त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी आज पुणेकरांचे झालेले हाल आपण पाहिले. शिवजयंती उत्सवाच्या परवानगीसाठी आलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना दोन्ही गेटवरच रोखून धरण्यात आले. शिवजयंतीच्या उत्सवापेक्षाही पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना किरीट सोमय्यांचे लाड पुरवणे महत्वाचे वाटले. त्यासोबतच अत्यावश्यक सेवेसाठी महानगरपालिकेत येणाऱ्या सामान्य नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक रुग्णांचे नातेवाईक कागदपत्रांसाठी डोळ्यात पाणी आणून याचना करत असतानाही सत्ताधारी भाजपला पाझर फुटला नाही. यावरूनच भाजपचा कारभार किती लाजिरवाणा आहे हे आपल्या लक्षात येते. पुणेकरांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी आवाहन करतो कि मोदींच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही ज्यांना महानगरपालिकेची सत्ता दिली, त्यानंतर दोनच महिन्यात भाजपच्या अंतर्गत गटबाजीतून महानगरपालिकेत झालेली सभागृह नेते कार्यालयाची तोडफोड ते आज किरीट सोमय्यांच्या निमित्ताने महानगरपालिकेला आलेलं छावणीचं स्वरूप या सगळ्या गोष्टी दुर्दैवी आहेत. धर्माच्या नावाने मत मागणारा पक्ष आपल्या स्वार्थासाठी शहर वेठीस धरताना कोणाचाही धर्म विचारात घेत नाही. यापुढे मतदान करताना पुणेकरांनी या गोष्टींचा विचार करावा हीच नम्र विनंती. अशी जगताप म्हणाले.

आज पुणे महानगरपालिकेमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरक्षा विभागाने पोलिसांच्या सहकार्याने कडक बंदोबस्त मध्ये सर्वसामान्य नागरिकांना पुणे महानगरपालिकेत प्रवेश दिला नाही. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांबरोबर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते महानगरपालिकेमध्ये फिरताना दिसत होते.
दुपारी चार ते साडेचार च्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र येऊन नवीन इमारतीतील जुन्या इमारतीमध्ये जात असताना नागरिक व विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक यांची देखील पोलिसांनी अडवणूक केली , त्यामुळे नागरिकांचा व विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांच्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळा आणला गेला आहे.सर्व प्रकार महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी तसेच पत्रकार बंधु यांच्या देखतच घडत होता.
टॅक्स भरणारे सर्वसामान्य पुणेकर नागरिक तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरी गरीब योजनेसाठी महानगरपालिकेत पत्र घेण्यात येतात त्यांची देखील अडवणूक भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आल्यामुळे त्यांच्या सत्काराचा अट्टहास करणा-या सत्ताधारी भाजपमुळे झाली. ही बाब अत्यंत निंदनिय व पुणे शहराच्या लौकिकास लाजविणारी आहे.

दीपाली प्रदीप धुमाळ
विरोधी पक्ष नेत्या, पुणे मनपा

Leave a Reply