Lal Pari : MSRTC : आता गावाकडून यायचं कसं?  : लाल परी बंद असल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल 

Categories
social पुणे महाराष्ट्र

आता गावाकडून यायचं कसं?

: लाल परी बंद असल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल

पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यांत जवळपास ११९ डेपोत सध्या संप सुरू आहे. त्यामुळे एसटीला रोज जवळपास ४ कोटींचा फटका बसत आहे. महागाई भत्ता व घर भत्ता या मागण्या मान्य झाल्यावर आता कर्मचारी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणच्या मागणीसाठी संप करीत आहे. त्यामुळे आता गावावरून यायचं कसं? असा सवाल प्रवासी करत आहेत.

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने जवळपास १४ ते १५ तास राज्यभर संप केला. यात त्यांनी महागाई भत्ता, घरभत्ता यासह एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, ही प्रमुख मागणी केली होती. त्यापैकी महागाई भत्ता व घर भत्ता वाढविण्याची मागणी मान्य झाली. मात्र विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून काही आगार बंद आहेत. सुरुवातीला १० ते २०  आगार बंद करण्यात आले. आताही संख्या ११९ आगारांवर गेली आहे.

जिल्ह्यातील तीन आगार बंद 

पुणे जिल्ह्यात १३ आगार आहेत. त्यापैकी रविवारी तीन आगार बंद झाले. यात नारायणगाव, राजगुरूनगर ,इंदापूर या तीन आगारात एसटीचा १०० टक्के संप झाला. यामुळे एसटी ला जवळपास ४० ते ५० लाख रुपयांचा फटका बसला.

एसटीचे 4 कोटीचे नुकसान

पुणे विभागातील तीन डेपोसह रविवारी राज्यातील 119 आगरात संप झाला.त्यामुळे एसटीला एक दिवसाचे जवळपास 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा आकडा आता वाढण्याची शक्यता आहे. कारण बंद पडणाऱ्या आगराची संख्या वाढत जात आहे.पूर्वी विदर्भ, मराठवाड्यापुरते मर्यादित असणारा संप आता पुणे, मुंबईला देखील होत आहे.

प्रवाशांना फटका

एसटी कर्मचाऱ्यांनी संपास सुरुवात केल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.दिवाळीत झालेली भाडेवाढ सहन करीत एसटीचा प्रवासी पुन्हा एसटीने प्रवास करण्यास इच्छुक आहे.मात्र संपामुळे त्याची मोठी गैरसोय होत आहे. त्याला दुप्पट व तिप्पट दर देऊन ट्रॅव्हल्सने प्रवास करावे लागत आहे.