95th All India Marathi Literary Conference : साहित्य संमेलनात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध  : जेम्स लेन च्या निषेधासह 20 ठराव 

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र

साहित्य संमेलनात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध 

: जेम्स लेन च्या निषेधासह 20 ठराव 

उदगीर : ब्रिटिश लेखक जेम्स लेन याने ‘शिवाजी – हिंदू किंग इन मुस्लिम इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजामाता यांच्याबद्दल हेतुतः बदनामीकारक लेखन केल्याबद्दल त्याचा निषेध करण्याचा ठराव ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात मांडण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निषेध करण्यात आला. उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, यासह एकूण वीस ठराव झाले.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत निश्चित झालेल्या वीस ठरावांचे वाचन महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी संमेलनाच्या समारोप सत्रात केले. २००४ मध्ये वादंगाचे कारण ठरलेल्या जेम्स लेन या ब्रिटिश लेखकाचा निषेध करणारा ठराव महामंडळाने यानिमित्ताने अठरा वर्षांनी केला. तसेच, ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री जिजाबाई आणि शाहू महाराज यांच्याविषयी बदनामीपर लेखन करणाऱ्या किंवा व्यक्तिगत पातळीवर सभा-संमेलनात जाहीरपणे विकृत बुद्धीने बोलणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींचा हे संमेलन तीव्र निषेध करीत आहे’, असा ठराव मांडत महामंडळाने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
.सीमाप्रश्न निकाली काढावागोव्यात मराठी भाषिक बहुसंख्य असतानाही मराठीला डावलून कोकणी राजभाषा केल्याचा वाद संमेलनाच्या निमित्ताने उफाळून आला होता. त्या अनुषंगाने गोव्यात मराठी राजभाषा करावी, अशी मागणी करणारा ठरावही मांडण्यात आला. या संमेलनाच्या निमित्ताने सीमाभागाचा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी होता. सीमावर्ती भागातील लोकांचे प्रश्नही चर्चेला आले होते. त्यामुळे सीमाभागाच्या वादाचे प्रकरण महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पूर्ण शक्तीनिशी लढवावे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तातडीने निकाली काढावा, असा ठरावही मांडण्यात आला.
अन्य ठराव असे
उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा
केंद्राने लवकरात लवकर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा
 मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडणार नाहीत यासाठी कृती कार्यक्रम आखावेत
बोलीभाषा, आदिवासी भाषांच्या संवर्धनासाठी ‘बोलीभाषा अकादमी’ स्थापन करावी
सीमाभागातील मराठी शाळा, महाविद्यालयांना आर्थिक मदत करावी
 मराठी भाषा व मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध
 बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा
महाराष्ट्र परिचय केंद्रांची स्थापना करावी
 स्वतंत्र मराठी विद्यापीठाचे स्वरूप ठरविण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या समितीवर साहित्‍य महामंडळाचा प्रतिनिधी घ्यावा
दूरदर्शन, आकाशवाणीवरून साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण निःशुल्क करावे
 मराठी भाषा धोरण त्वरित मंजूर करावे
 केंद्र- राज्य सरकारने कोरोनाग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी
 उदगीर येथे पशुवैद्यकीय विद्यापीठ स्थापन करावे
उदगीर किल्ला, हत्तीबेट पर्यटनस्थळाला पर्यटन क्षेत्राचा ‘अ’ दर्जा द्यावा.