Imran Khan : Pakistan : मध्यरात्री पाकिस्तानमधील सरकार पडलं  : इम्रान खान यांना पदावरून हटवले 

Categories
Breaking News Political देश/विदेश
Spread the love

मध्यरात्री पाकिस्तानमधील सरकार पडलं 

: इम्रान खान यांना पदावरून हटवले 

इस्लामाबाद: सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानातील `इम्रानशाही` अखेर खालसा झाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने १७४ मते मिळाली, तर विरोधात शून्य मते मिळाली. अशा प्रकारे पदावरून हटविले जाणारे इम्रान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

इम्रान यांना सत्ताच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ आवश्यक होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाचे मित्र असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. (Imran Khan)शेवटच्या चेंडूपर्यंत सत्तेचा गेम खेळण्याचा निर्धार करत मैदानात उतरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज विरोधकांना अक्षरशः दिवसभर झुलविले. परंतु, ते दिवसभरात नॅशनल असेंब्लीत फिरकलेच नाहीत. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाला बगल देत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. इम्रान यांनी राजीनामा द्यावा म्हणून ‘आयएसआय’ आणि लष्करानेही दबाव आणला होता पण शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत इम्रान यांनी हा दबाव झुगारून लावत पंतप्रधानपदाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला. (Imran Khan)

‘नॅशनल असेंब्ली’च्या सभापती असद कैसर यांनी देखील इम्रान यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. इम्रान खान यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावावर मतदान न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली व सभापतीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी इम्रान यांच्याबरोबरील ३० वर्षांच्या मैत्रीचा हवालाही दिला. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शनिवारी अविश्वास ठरावावर मतदान घेणे बंधनकारक होते. न्यायालयाचा निकाल न मानल्यास सभापतींवरही टांगती तलवार होती. त्यापासून कैसर यांनी बचावात्मक पवित्रा घेत राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ उपसभापतींनीही राजीनामा दिला. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी नॅशनल असेंब्लीतून सभात्याग करण्याचा निर्णय घेतला.

हे सर्व नाट्य पाकिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार पावणेबारापर्यंत सुरू होते. नंतर पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)चे अयाज सादिक यांच्याकडे सभागृहाच्या सभापतीपदाची सूत्रे सोपविण्यात आली. त्यांनी शनिवार संपण्यापूर्वी अविश्वासदर्शक ठरावावरील मतदानाची प्रक्रिया सुरू केली. स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १२ वाजता सभागृहाचे कामकाज दोन मिनिटांसाठी तहकूब केले व पुन्हा १२ वाजून दोन मिनिटांनी कामकाज सुरू करत ठरावावरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. स्थानिक प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री एक वाजता निकाल जाहीर करण्यात आला. अविश्वास ठरावावेळी सत्ताधारी पक्षाचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता.
सभागृहात दिवसभर गोंधळया सगळ्या घडामोडींमुळे राजधानी इस्लामाबादमधील सुरक्षाही वाढविण्यात आली होती. ‘नॅशनल असेंब्ली’च्या कामकाजाला स्थानिक प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास सभापती असद कैसर यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरवात केली होती पण दिवसभरामध्ये वेळोवेळी गोंधळ झाल्याने अविश्वास ठरावावर मतदान होऊ शकले नाही. खुद्द पंतप्रधान इम्रान खान हे देखील सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले नव्हते. वारंवार गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज वेळोवेळी तहकूब करण्यात आले. हा गोंधळ आणि आरोप- प्रत्यारोपाच्या फैरींमध्येच सगळा दिवस वाया गेला.
इम्रान यांना सत्ताच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ हवे होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाचे मित्र असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे.दिवसभरातील वादविवादानंतर नॅशनल असेंब्लीत रात्री साडेआठवाजता अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा इम्रान खान यांनी ठोठावला. त्यामुळे सभागृहातील मतदान पुन्हा पुढे ढकलले गेले. अखेरीस मध्यरात्रीनंतर इम्रानशाही खालसा झाली.

दिवसभरात

– नॅशनल असेंब्लीचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांची बैठक
– इम्रान यांची माजी पत्नी रेहम संसदेमध्ये उपस्थित
– सकाळी अकरा वाजता नॅशनल असेंब्लीच्या कामकाजाला सुरूवात
– शाहबाज शरीफ यांचा इम्रान सरकारवर हल्लाबोल- विरोधकांच्या टीकेवर नॅशनल असेंब्लीचे सभापती भडकले
– इमरान यांच्यावतीने शाह मेहमूद कुरेशींनी केला युक्तिवाद
– गरमागरम चर्चेनंतर असेंब्लीचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब
– इमरान खान यांची कायदेतज्ज्ञांशी खलबते
– संसद कामकाजाला पुन्हा सुरूवात, रात्री मतदान घेण्याचे ठरले
 – पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीबाहेर निमलष्करी दले तैनात
 – शनिवारी मध्यरात्री इम्रान खान सरकारवरील अविश्वास ठराव मंजूर

शाहबाज  शरीफ नवे पंतप्रधान शक्य

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सरकार स्थापनेचा दावा करण्याची मुदत असेल. त्यानंतर सोमवारी नव्या नेत्याचा पंतप्रधानपदी शपथविधी होऊ शकतो. सर्व विरोधी पक्षांनी शाहबाज शरीफ यांची नेते म्हणून निवड केली आहे. त्यामुळेच ते नवे पंतप्रधानपदाची सूत्रे घेऊ शकतील.

Leave a Reply