Spread the love

मेट्रो पुलाला आमचा विरोध नाही!

: मानाच्या गणपतीसह प्रमुख गणेश मंडळांनी जाहीर केली भूमिका

पुणे – संभाजी पूल (लकडी पूल) येथील मेट्रोच्या मार्गिकेला (Metro Route) शहरातील काही गणेश मंडळांनी (Ganesh Mandal) विरोध केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हे काम ठप्प आहे. अखेर शहरातील मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी प्रथमच भूमिका जाहीर केली आहे. मेट्रोच्या कामामुळे पुलाच्या उंचीचा (Bridge Height) मुद्दा कोणीही निदर्शनास आणून दिला नाही, पण आता हे काम अंतिम टप्प्यात असल्याने या कामाला आमचा विरोध नाही. मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भरच पडणार आहे, असे आज (बुधवारी) स्पष्ट केले.

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात, मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा गणपती श्री.तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, मानाचा पाचवा गणपती श्री केसरी वाडा गणेशोत्सव मंडळआचे अध्यक्ष रोहित टिळक, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी यासंदर्भात संयुक्त निवेदन काढले आहे. उद्या (गुरुवारी) महापालिकेची मुख्यसभा होत असताना प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने यावादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

महापौरांनी मेट्रोचे अधिकारी व गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न जवळपास चार महिने केले. परंतु तज्ज्ञ समितीने सुचविलेले पर्याय अव्यवहार्य असल्याने महापौरांनी काम सुरु करण्यास सांगितले. आम्ही सगळे गणपती मंडळ कार्यकर्ते असलो तरी जबाबदार पुणेकर नागरिक आहोत. १२५ वर्षाहून अधिक पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असून, समाज प्रबोधन,समाजहिताला प्राधान्य दिले आहे. संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंची बाबत आमचा कधीही विरोध नव्हता. कोरोनाच्या काळात साधेपणाने उत्सव साजरा केला. प्रशासनाला सहकार्य केले. अशी परंपरा असलेल्या गणेशोत्सवामुळे यावेळी संभाजी पुलावरील पुलास कामास आम्ही विरोध करत नाही. गणेशोत्सव कार्यकर्त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलेली आहे, असे प्रमुख मंडळांनी निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply