महापालिकेची मुख्यसभा आॅफलाइन घ्यायला सरकारची परवानगी : 50% उपस्थितीची ठेवली अट : कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार

Categories
PMC पुणे
Spread the love

 महापालिकेची मुख्यसभा आॅफलाइन घ्यायला सरकारची परवानगी

: 50% उपस्थितीची ठेवली अट

: कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार

पुणे: शहरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे निर्बंध कडक केले होते. त्याचा परिणाम महापालिकेच्या मुख्य सभेवर झाला होता. मुख्य सभा ऑनलाइनच घेतली जात आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप देखील महापालिकेची मुख्यसभा आॅनलाइन होत आहे. हे निर्बंध हटविण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याचे सचिव महेश पाठक यांना दिले होते. त्यानुसार आता सरकारने मुख्य सभा ऑफलाईन घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.  त्यातच उद्याच मुख्य सभा आहे. त्यात अमेनिटी स्पेस चा प्रस्ताव आहे. यावर सभेत वादळी चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.

– सरकार ला वारंवार पत्रव्यवहार

 महापालिकेची मुख्य सभा ऑफलाईन करण्याबाबत सत्ताधारी भाजपने देखील सरकारला वारंवार पत्रव्यवहार केला होता. महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेता गणेश बीडकर यांनी सरकारला पत्रे पाठवली आहेत. याचा प्रतिसाद म्हणून सभा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी लगेच सरकारने सभा ऑनलाईन घेण्यास सांगितले. त्यामुळे सत्त्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची देखील कोंडी झाली होती. मात्र नुकतेच अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशामुळे मुख्य सभा ऑफलाईन घेण्याबाबत निर्देश आले आहेत. त्यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार सभेत कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार. शिवाय 50% उपस्थितीची अट सरकार ने ठेवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे महानगरपालिकेतील सर्व सभासदांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पुणे महानगरपालिकेची मुख्यसभा ऑफलाईन पध्द्तीने घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. पुणेकरांचे प्रश्न समस्या प्रखरतेने सभागृहात मांडण्यासाठी ऑफलाईन सभा होणे खूप महत्वाचे होते. त्यामुळे याबाबत महापौर यांना सुद्धा आम्ही विनंती केली होती. त्यानुसार सरकार ने मंजुरी दिली आहे.

प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

 

राज्य सरकारने ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्यास मान्यता दिल्याने नगरसेवकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. अनेक दिवसांची प्रतीक्षा या आदेशामुळे संपली आहे.

गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

Leave a Reply