Amenity Space: पुणेकरांवरचे विघ्न टळले… असे का म्हणाले प्रशांत जगताप?

Categories
PMC पुणे
Spread the love

ॲमेनिटी स्पेस विक्रीप्रकरणी अखेर भाजपला सुबुद्धी

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे : पुणे महानगरपालिकेतील पाशवी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या सत्ताधारी भाजपला अखेर पुणेकरांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधासमोर झुकावे लागले असून, दीर्घ मुदतीच्या कराराने १८५ ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय स्थगित करून पुढे ढकलावा लागला आहे. हा पुणेकरांचा विजय तर आहेच, शिवाय महानगरपालिकेची मालकी असलेल्या आणि सर्वसामान्य पुणेकरांच्या हक्काच्या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला लगावलेली जोरदार चपराक आहे. विघ्नहर्ता गजाननाने भाजपला उशिरा का होईना सद्बुद्धी दिली असून, त्यामुळे पुणेकरांवर भाजपमुळे येऊ घातलेले एक विघ्न टळले आहे. असे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

: प्रस्ताव पुढे ढकलला जाणार

जगताप म्हणाले पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या आणि ॲमेनिटी स्पेससाठी राखीव जागा दीर्घ मुदतीच्या कराराने भाड्याने देण्याचा म्हणजेच एक प्रकारे या मालमत्तांच्या विक्रीचा घाट सत्ताधारी भाजपने घातला होता. विशेष म्हणजे, ज्या १८५ ॲमेनिटी स्पेस भाजपने विक्रीस काढल्या होत्या, त्यात सर्वाधिक ७४ ॲमेनिटी स्पेस या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिनिधित्व करीत असलेल्या या मतदारसंघातील सर्वाधिक ॲमेनिटी स्पेस या चंद्रकांत पाटील यांच्या परवानगीनेच विक्रीस काढल्याचाही आमचा दावा होता. अखेर, तो दावा खरा निघाला आहे. जिथे प्रतिनिधित्व करण्यासाठी आले, ज्या मतदारांनी मोठ्या अपेक्षांनी निवडून दिले, त्या मतदारांच्या हक्काच्या जागा लाटण्याचाच हा प्रकार समोर आला होता. या निर्णयामागे दडलेले काळेबेरे हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेसकडून चव्हाट्यावर आणले जात असल्यानेच अखेर चंद्रकांत पाटील आणि महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना हा निर्णय स्थगित करावा लागला, यात काही शंका नाही.
जगताप पुढे म्हणाले, भाजपच्या या मोगलाई कारभाराला राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसाधारण सभेतही विरोध केला होता. मात्र, पाशवी बहुमताच्या जोरावर भाजपने हा ठराव मंजूर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने या विरोधात तीव्र आवाज उठवला होता. राज्य सरकारकडेही तक्रार करण्यात आली होती. न्यायालयीन लढाही पुकारला होता. पुणेकरांच्या हक्कांवर गदा आणणारा हा निर्णय मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणेकरांच्या मदतीने रस्त्यावरही उतरली होती. अखेर भाजपला हा निर्णय स्थगित करावा लागला असून, हा समस्त पुणेकरांचा विजय आहे.

: मोकळ्या जागा या शहराची फुफ्फुसे

भौगोलिकदृष्ट्या देशातील दुसऱ्या आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाचे शहर असलेल्या आपल्या पुण्यातील ॲमेनिटी स्पेससाठीच्या मोकळ्या जागा या शहराची फुफ्फुसे आहेत. परंतु, पुणेकरांच्या हितापेक्षा स्वत:चेच हितसंबंध जोपासण्यात मश्गुल असलेल्या भाजपने ही फुफ्फुसेच विकायला काढली होती. पुणेकरांचा श्वास असलेल्या मोकळ्या जागांवर बुलडोझर फिरवू पाहणाऱ्या महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना विघ्नहर्ता गजाननाने अखेर सद्बुद्धी दिली आहे.
पुणेकरांच्या हिताकडे हिताकडे काणाडोळा करून स्वत:चे आर्थिक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला पुणेकर कदापि माफ करणार नाहीत. पुणेकरांच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीही तीव्र विरोध केला असून, आमचा विरोध आजही आहे आणि यापुढेही असणार आहे, याची मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष या नात्याने खात्री देतो.असे ही जगताप म्हणाले.

Leave a Reply