Spread the love

मोठी बातमी:  ईडीने नवाब मलिकांना घेतले ताब्यात

: ईडीच्या कार्यालयात सकाळपासून मलिकांची चौकशी

मुंबई – राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे  प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने (Enforcement directorate) मोठी कारवाई केली आहे. आज पहाटे मलिक यांच्या निवास्थानी आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांना मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले असून, तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे.

 कुर्ल्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांची चौकशी करण्यात येत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे समोर आणत नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार  केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपांबाबतच्या चौकशीसाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

Leave a Reply