Nawab Malik Portfolios : नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री  : ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

: ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या या बैठकीत सध्या संक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आलाय. नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झालेत.

खाती कोणाकडे?


राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्यणानुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजेश टोपे यांच्याकडे नवाब मलिक यांच्याकडे असणारं दुसरं खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असणारा राजेश टोपे आता कौशल्य विकास आणि रोजगार या विभागाचा कार्यभारही पाहतील.

पालमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे?
दोन विभागांबरोबरच नवाब मलिक यांच्याकडे असणारी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर परभणीचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मलिक यांच्याकडील जबाबदाऱ्या का काढल्या?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल सांगताना नवाब मलिक यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. “नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचं आम्ही ठरवलं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही काढली
मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद नवाब मलिकांकडे आहे आणि लवकरच मुंबई महापालिका निवडणुक आहे, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. नवाब मलिक उपलब्ध नसल्याने पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासमवेत करतील.”

आज मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र
“नवाब मलिकांकडे दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. तिथे आता परभणीत धनंजय मुंडे हे पालकमंत्री असतील आणि गोंदियात प्राजक्त तनपुरे हे पालकमंत्री असतील, हा निर्णय आम्ही घेतला आहे. उद्याच (शुक्रवारी) मी मुख्यमंत्र्यांनी मी पत्र पाठवून आमच्या पक्षाकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार आहे, मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील. नवाब मलिकांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या विभागाचं काम पूर्णपणे ठप्प झालं आहे. यामुळेच ही जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांना देण्याची आवश्यकता आहे,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

चुकीच्या पद्धतीने अटक
“नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलेलं आहे. अनिल देशमुखांनी अटक झाल्यावर स्वत:हून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची जी अटक झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे, अशी आमची धारणा आहे. त्या पद्धतीने न्यायालयात लढाई सुरू आहे.तोपर्यंत त्याच्या विभागाचा भार हा दुसऱ्यांना सोपवला जात आहे, नवाब मलिक हे मंत्रिपदावर कायम राहतील,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

Jayant Patil : आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही!  

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही!

: राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : नवाब मलिक (Nawab Malik) यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून (ED) अटक करण्यात आली होती. अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी सुद्धा राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी मलिकांच्या  राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आम्ही राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्टंच सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पुणे शहरातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्याबाबत जे घडलं नाही, ते दाखवायचा प्रयत्न भाजपकडून  सुरू आहे. त्यामुळे आम्ही एक राजीनामा घेतला. ते रोज उठून एका मंत्र्यांमागे चौकशी करतील. अशा वेळी आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ असं नाही. आम्ही नवाब मालिकांचा राजीनामा घेणार नाही. आणि किरीट सोमय्या यांच्याबाबत आता तरी न बोललेलं बरं आहे. असंही ते यावेळी म्हणाले.

 महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहिती असून औरंगाबाद कोर्टाने देखील निर्णय दिला आहे. त्यामुळे जबाबदार पदावर असलेल्या राज्यपालांसारख्या व्यक्तीने अशा गोष्टी बोलणं टाळायला हवं, अशी वक्तव्ये करणं योग्य नसल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारने युक्रेन मधील वाचवण्यास उशीर केला असून त्यांनी मुलांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यावर लक्ष दिलं पाहिजे. दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अनेक पालक आणि मुलांशी बोलणं सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Pune : NCP : Nawab Malik : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून भाजपचा निषेध 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून भाजपचा निषेध

पुणे : केंद्र सरकारमधील सत्ताधारी भाजप वारंवार विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता निर्भीडपणे आपली भूमिका मांडणाऱ्या नवाब मलिक साहेबांना काल पासून सातत्याने त्रास देण्याची भूमिका ईडी ने घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सकाळी पहाटे पाच वाजता कुठलाही समन्स न बजावता अचानकपणे त्यांच्या घरावर धाड टाकने असो किंवा समन्स न बजावतात केलेली अटक असो अशा विविध माध्यमातून वारंवार नवाब मलिक साहेबांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच मलिक साहेबांना पाठिंबा देण्यासाठी तसेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या या घाणेरड्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख व युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर ,शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अलका टॉकीज चौक येथे एकवटले. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित राहत भाजपच्या या वृत्तीचा निषेध केला. समवेत युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक बोके, राकेश कामठे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, शहर कार्याध्यक्ष मनोज पाचपुते अजिंक्य पालकर,विशाल वाकडकर आदींसह मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Madhav Bhandari : Nawab Malik : नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा ‘ मुख्यमंत्री दाखवणार का?

   : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

: राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

पुणे : बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा  महाराष्ट्राचा अपमान असून  उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरी बाणा  दाखवणार का , असा सवाल  भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  माधव भांडारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला . दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप हा देशद्रोहाएवढाच गंभीर असल्याने असा ठपका असलेला मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिमांच्या अनुनयाकरिता देशद्रोही दाऊदच्या हस्तकास अभय देण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल असा इशाराही श्री. भांडारी यांनी दिला. नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे ‘ईडी’कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या दाऊद इब्राहीमने १९९२ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेत देशाविरुद्धचा सर्वात घातक दहशतवादी कट आखला, त्याच दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास विरोध करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लांगूलचनाच्या राजकारणाची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल. अशा देशद्रोही कारवायाना मदत केल्याचे पुरेसे पुरावे ईडीकडे असल्याचे सांगण्यात येत असतानाही मलिक यांना मंत्रिपदावर ठेवण्याच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण कणाहीन राजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीकाही  केली.

१९९२-९३ च्या बॉम्बस्फोटात दाऊदच्या हल्ल्यापासून मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आज मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या हव्यासापोटी दहशतवादी दाऊदच्या हस्तकास वाचविण्याचा घातक खेळ करत आहे, असा आरोप करून, ठाकरे यांच्या कणाहीन राजकारणामुळे महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर आता मलिक यांची हकालपट्टी करावी, असे ते म्हणाले.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर विधिमंडळात भ्रष्ट पोलीस आधिकारी सचिन वाझे याची पाठराखण केली होती. त्यानंतर खंडणीखोर अनिल देशमुख यांनाही पाठीशी घालण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट, व्यभिचारी आणि लाचखोर, खंडणीखोर सहकाऱ्यांना वाचविताना ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्यास मूठमाती दिली. आता मतांच्या राजकारणासाठी देशद्रोही कारवायांतील सहभागाचा आरोप असलेल्या नवाब मलिक या मंत्र्याकरिता आपला कणा झिजविण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे अनुयायी असलेल्या कडवट शिवसैनिकांच्या भावनांची थट्टा चालविली आहे, असा आरोप भांडारी यांनी केला.

नवाब मलिक या मंत्र्याने दाऊदच्या कारवायांसाठी बेनामी पद्धतीने मालमत्ता हडप करून गरीब कुटुंबांची फसवणूक केली असून हा पैसा दाऊदकडे वळविल्याचा आरोप आहे. दाऊदच्या दहशतवादी कारवायांना आर्थिक साह्य करण्याच्या अशा गुन्हेगारी व देशद्रोही कारवायांना सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने संरक्षण द्यावे हा महाराष्ट्राच्या कोट्यवधी नागरिकांच्या सुरक्षिततेशी सामूहिक खेळ आहे. अशा खेळात सहभागी होऊन राज्याच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या जनताविरोधी सरकारच्या निषेधार्थ भाजप संपूर्ण शक्तिनिशी लढा देईल, असा इशाराही  भांडारी यांनी दिला.

Agitation By NCP Pune : आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा :  प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा :  प्रशांत जगताप

: नवाब मलिकांच्या समर्थनार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात तसेच महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांच्यावर ईडीद्वारे सूड बुद्धीने केलेल्या कारवाईच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राला विनयशील राजकारणाचा संमृद्ध वारसा दिला. आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह सर्व नेत्यांनी तो वारसा जपला आणि वाढवला. भारतीय जनता पार्टीने मात्र या परंपरेला हरताळ फासत सुडाचे राजकारण सुरु केले. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडू लागताच भाजपच्या वतीने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी याचा तीर्व आंदोलन करत भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा मागितला यावर प्रतिक्रिया देताना “नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील ६३% मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, म्हणून राजीनामा मागायचा असेल तर आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा” असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले.

या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपालीताई धुमाळ,प्रदीप देशमुख, मृणालिनीताई वाणी,रुपाली ठोंबरे पाटील, किशोर कांबळे, सुषमा सातपुते, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Allegation of Chandrakant Patil : Sharad pawar : शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात

: चंद्रकांत पाटलांचा आरोप

पुणे – शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात, त्यांचा तसा प्रयत्न असतो असा आरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील  केला आहे.


 राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईडी सूडबुद्धीने कारवाई करते असं विरोधकांनी म्हणायचं नसत. एखादी चौकशी सुरू असताना त्यावर तात्काळ बोलणं योग्य नाही. सत्ताधारी एकही केस न्यायालयात जिंकू शकलेले नाहीत. ते न्यायालयात का जात नाहीत, असा सवाल भाजपाचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.
आज ते पुण्यात (Pune) बोलत होते.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शहरातील विविध प्रश्नांवर पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, ईडी (ED) सूडबुद्धीने कारवाई करते असं विरोधकांनी म्हणायचं नसत. एखादी चौकशी सुरू असताना त्यावर तात्काळ बोलणं योग्य नाही. या केसमध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पाहिजे. सत्ताधारी एकही केस न्यायालयात जिंकू शकलेले नाहीत. ते न्यायालयात का जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, काँग्रेसकडे (Congress) टीका करण्यासाठी विषय नाहीत म्हणून अर्थहीन चर्चा करत असतात. आमचा येणाऱ्या महापालिकेत मुद्दा हाच आहे. ५० वर्ष विरुद्ध ५ वर्ष असा फॉर्म्युला आहे. आम्ही काय केलं हे सांगू, तुम्ही काय केलं ते सांगा, असेही ते म्हणाले आहेत. जे गलिच्छ बोलतात त्यांना परवानगी आणि मी तर सुसंस्कृत बोलतो, नाव न घेता असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. भुजबळांना दोन वर्षे जेलमध्ये कोणी भेटायला पण जात नव्हते. शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात, त्यांचा तसा प्रयत्न असतो असा आरोपही त्यांनी केला आहे.

Big Breaking News : Nawab Malik : ED : मोठी बातमी:  ईडीने नवाब मलिकांना घेतले ताब्यात 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

मोठी बातमी:  ईडीने नवाब मलिकांना घेतले ताब्यात

: ईडीच्या कार्यालयात सकाळपासून मलिकांची चौकशी

मुंबई – राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे  प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने (Enforcement directorate) मोठी कारवाई केली आहे. आज पहाटे मलिक यांच्या निवास्थानी आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांना मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले असून, तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे.

 कुर्ल्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांची चौकशी करण्यात येत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे समोर आणत नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार  केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपांबाबतच्या चौकशीसाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

Nawab Malik : Sharad Pawar : शरद पवार हेच चाणक्य : नवाब मलिक यांचा पवारांवर कौतुकाचा वर्षाव 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शरद पवार हेच चाणक्य

: नवाब मलिक यांचा पवारांवर कौतुकाचा वर्षाव

पुणे : पुण्यात महाविकास आघाडीचे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक  यांचा महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी मलिक यांनी शरद पवार यांचे भरभरून कौतुक करण्याबरोबरोच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ”शरद पवार हे असे चाणक्य आहेत, जे स्वतःला चाणक्य समजतात त्यांच्यावर मात केली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.”

”शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अस कुणीही स्वप्नात पहिले नव्हते. तशीच परिस्थिती देशात आहे. बरेच लोक एकत्र येतील अशी कधी चर्चा होत नाही. या सर्वांची मोट बांधण्याचे काम पवार करतील. सर्वांना एकत्र आणायचा आहे त्या दृष्टीने पवार काम करत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

”देशात प्रश्न निर्माण झाल्यानंतर ज्याप्रमाणे युपीएच्या बैठका होणे आवश्यक आहे त्या होत नाहीत. त्यामुळे ममता दीदी, सपा, टीआरएस, आरजेडीसह दक्षिणेतील पक्षांची मोट बांधून काँग्रेस सकट एक मोर्चा तयार करायचा आहे. सामूहिक नेतृत्व निर्माण करून हा मोर्चा काम करेल. संपूर्ण देशात सध्या भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे देशभरातील भाजपविरोधकांची मोट बांधण्याचं काम शरद पवार करत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.”

आता देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार

”देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावं, एनडीए मध्ये कोणीही शिल्लक राहत नाही, एनडीए सोडून लोक जात आहेत. आजच्या घडीला भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाला आहे. देशातल्या सर्व विरोधकांची मोट बांधण्याचे काम पवारांनी घेतला आहे. ममतादीदीसोबत त्याच विषयावर चर्चा झाली आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन मोठी आघाडी निर्माण करून देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार आहोत. त्याची चिंता भाजपला सतावत आहे.” 

Nawab Malik : भाजपला सतावून सोडणाऱ्या नवाब मलिक यांचा पुण्यात महाविकास आघाडी करणार सत्कार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपला सतावून सोडणाऱ्या नवाब मलिक यांचा पुण्यात महाविकास आघाडी करणार सत्कार

पुणे : बहुचर्चित drug case आणि आर्यन खान प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब  मलिक यांनी भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच सतावून सोडले. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचे कौतुकच केले. त्याचाच एक भाग म्हणून आता पुण्यातील महाविकास आघाडी मलिक यांचा उद्या सत्कार करणार आहे.

 

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगतात यांनी सांगितले कि  2 डिसेंबर 2021 रोजी महाविकास आघाडीचे संघर्षयोद्धा,सातत्याने भाजप कडून होणाऱ्या सातत्याने घडवल्या जाणाऱ्या षडयंत्रांना खंबीरपणे सामोरे जात परखडपणे सत्य समोर आणणारे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते  नवाबभाई मलिक यांचा महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे. आझम कॅम्पस,कॅम्प, पुणे येथे सांयकाळी  5 वाजता ह कार्यक्रम होईल, असे जगताप यांनी सांगितले.

Nawab Mallik vs Devendra Fadanvis : सत्तेत राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस काहीही करू शकतात! : नवाब मलिक यांचा टोला 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सत्तेत राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस काहीही करू शकतात!

: नवाब मलिक यांचा टोला

पुणे : राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या काळात कोरोना असतानाही सरकारने कुठलाही प्रकल्प रद्द केला नाही. अनेक योजना अंमलात आणल्या. महागाई, बेरोजगारी मोठा प्रश्न असताना ऑनलाइन नोकरी देण्याच काम आम्ही केलं आहे, असं मंत्री नवाब मालिकांनी सांगितले. पुढे बोलताना मलिक म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते सत्तेवर येण्यासाठी काहीही करू शकतात.

पुण्यात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मलिक बोलत होते. मलिक पुढे म्हणाले, जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आमच्या सरकारला डेडलाईन देत होते. त्यात कधी चंद्रकांतदादा म्हणत होते सरकार पडेल, यांनी साम दाम दंड भेद याचा वापर केला. परत आता सरकार पाडण्यासाठी नारायण राणेंनी मार्चची डेडलाईन दिली. त्यांना माहिती आहे आता सरकार पडत नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते सत्तेवर येण्यासाठी काहीही करू शकतात. सध्या फडणवीस त्यांच्या पक्षात छोटे होऊ लागले आहेत. भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे, असं नवाब मलिक म्हणाले. विनोद तावडे यांची भाजपच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. यावर बोलताना मलिक म्हणाले, ज्यांना भाजपमध्ये तिकीट नाकारले ते आता भाजप पक्षाचे सरचिटणीस झाले याचा अर्थ काय?