PMC Budget | महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?

Categories
Breaking News PMC Political पुणे

 महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?

पुणेकरांनी भाजपला योग्य धडा शिकवावा | प्रशांत जगताप

राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम  कुमार यांनी पुणे महानगरपालिकेचे जे बजेट मांडलेले आहे ते अत्यंत निराशाजनक तथा अवास्तव आहे, असे आमचे ठाम मत आहे. गेल्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी साडेआठ हजार कोटींचे बजेट मांडल्यानंतर आज २४ मार्च २०२३ रोजी देखील पुणे महानगरपालिकेला या आर्थिक वर्षात साडेपाच ते सहा हजार कोटींचे पुढे उत्पन्न गाठण्यात यश आलेले नाही, असे असताना देखील पुणे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून  विक्रम कुमार यांनी यावर्षी साडेनऊ हजार कोटींचे बजेट मांडले ही एक प्रकारे पुणेकरांची थट्टाच केली आहे. हे बजेट किमान ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट आहे,असा आमचा थेट आरोप आहे.
गेली अनेक दशके लोकप्रतिनिधींच्या आड लपून हे स्थायी समितीने फुगवलेले बजेट आहे, असा आरोप करणारे प्रशासन आज वास्तववादी बजेट मांडू शकले नाही, हे या बजेट चे ठळक वास्तव आहे.

२०१७ ते २०२२ या पाच वर्षाच्या भाजपच्या काळात पुणे महानगरपालिकेची झालेली घसरण लपविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या दबावाखाली आज माननीय महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी हे बजेट मांडले आहे,असा आमचा आरोप आहे. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना पुणे महानगरपालिकेकडे कर भरणाऱ्या तब्बल १० लाख मालमत्ता होत्या,त्यावेळी ५ ते ६ हजार कोटींची जमा रक्कम येत होती. आज पुणे महानगरपालिकेमध्ये ३४ गावे समाविष्ट होऊन नव्याने ६ लाख मिलकती येवून सुधा तब्बल ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट मांडण्याची वेळ पुणे महानगरपालिका आयुक्तांवर आली, अर्थात या संपूर्ण फसलेल्या बजेटचे श्रेय पुणे भाजपला जाते. त्यांच्या दबावाखाली व त्यांचा गेल्या पाच वर्षातील भोंगळ कारभार लपविण्यासाठीच अशा प्रकारचे बजेट सादर करण्यात आलेले आहे, ही बाब ओळखून येणारे काळात पुणेकरांनी याबाबत भाजपला योग्य तो धडा शिकवावा, अशी माझी पुणेकरांना विनंती राहील.


पुण्याच्या विकासाला चालना देणारे बजेट |जगदीश मुळीक

भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले,  पुणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाला चालना देणारे आहे.
शहर भाजपने केलेल्या मागणीनुसार कोणतीही करवाढ पुणेकरांवर लादण्यात आलेली नाही.
भाजपने सुरू केलेली मेट्रो, नदी शुद्धीकरण आणि सुशोभीकरण आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय निर्मिती, ठिक ठिकाणी उड्डाणपूल, रस्ते विकास याला प्राधान्य देण्यात आले आहे. भाजपच्या कारकिर्दीत सुरू झालेली विविध विकासकामे पूर्ण होण्यास या अर्थसंकल्पामुळे चालना मिळेल.

 

Mohan Joshi | ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु

| ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

शिशुपालाचे शंभर अपराध झाले तसे आता केंन्द्रातील भाजपच्या मोदी सरकारचे झाले असून कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्या क्षणापासून कॉंग्रेसने आता रणशिंग फुंकले आहे व अंतिम लढ्याला सुरुवात केली आहे आणि पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.

ते म्हणाले, देशातील महाभयंकर महागाई, बेकारी, कोलमडलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार याविरुद्ध संसदेत मोदी सरकारला धारेवर धरणारे कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला लागलेली अखेरची घरघर आहे. किंबहुना त्यांच्या या षडयंत्राला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच म्हणावे लागेल.

राहुल गांधींच्या रूपाने देशातील जनतेला आश्वासक पर्याय निर्माण झाल्याचे चित्र देशात वाढत राहिल्यामुळेच त्यांचा आवाज बंद करण्यासाठी कटकारस्थानात मास्टरकी असणाऱ्या भाजपने राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी केलेला हा लोकशाही विरोधी प्रयत्न आहे. असे सांगून मोहन जोशी म्हणाले, मात्र देशातील जनता या लोकशाही विरोधी मोदी सरकारला सत्तेवरून दूर करण्यासाठी आता आसुसलेली असून पुण्यातील कसबा विधानसभा असो अथवा भाजपच्या ताब्यातील हिमाचल प्रदेश असो, जनतेने भाजपला धूळ चारली आहे व कॉंग्रेसला विजयी केले आहे. त्यामुळेच स्वतःला महानायक समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला धडकी भरली आहे.

गेली ९ वर्षे मनमानी पद्धतीने जनताविरोधी निर्णय घेत मित्र असणाऱ्या मुठभर उद्योगपतींचे खिसे भरण्याचे पाप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले असून, सारा देश अडानीच्या घशात घालण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या महापापाला राहुल गांधी यांनी जोरकस विरोध केला. हे स्पष्ट करून मोहन जोशी म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रेतून साऱ्या देशाला राहुल गांधींनी आपलंसं केलं. त्यांच्यामुळे आपले पंतप्रधानपद व सत्ता जाणार हे ओळखल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साऱ्या भाजपने संसदेत गोंधळ घालून राहुल गांधींना आठ दिवस बोलू दिले नाही आणि पूर्वी रचलेल्या षड्यंत्राप्रमाणे सुरतमधील सत्रन्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून निर्णय घेऊन त्याआधारे राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे या त्यांच्या महापापामुळे देशातील जनतेत संतापाची लाट आली असून राहुल गांधींची प्रतिमा आता अधिक उंचावली आहे, असे मोहन जोशी म्हणाले.

 

Breaking : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Categories
Breaking News Political देश/विदेश

काँग्रेस  नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द. दोन वर्षांची शिक्षा झाल्याने कारवाई. काँग्रेस पक्षाला मोठा झटका.

Rahul Gandhi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे
भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

आगामी २०२४च्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधींच्या प्रभावामुळे मोदी सरकार व भाजपा सत्ते वरून फेकले जाणार हे लक्षात आल्यामुळेच, खा. राहुल गांधींवर विविध खटले दाखल करून व आरोप करून लोकसभेतून त्यांना अपात्र करणे हे षडयंत्र मोदी सरकार व भाजपाने रचले आहे. सुरत सत्र न्यायाल्याचा निकाल हा त्यातीलच एक भाग आहे. मात्र यामुळे आता देशातील कॉंग्रेस कार्यकर्ते पेटून उठले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातून मोदी सरकारला कॉंग्रेस कार्यकर्ते निश्चित पराभूत करतील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज दिली.

ते म्हणाले की, कर्नाटकातील कोलार येथे २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत जाहीरसभेत केलेल्या भाषणात ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन का आहे? सर्व चोरांचे नाव मोदी का असते?’ अशी टीका कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेमुळे गुजरातमधील मोदी समाजाची मानहानी झाली असे सांगून दाखल केलेल्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा ठोठावली हा भाजपाचा राजकीय विशाल षडयंत्राचा भाग आहे असे मोहन जोशी म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपा म्हणजे भारत देश नाही असे असूनही लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेली टीका म्हणजे भारत विरोधी बाब आहे असे सांगत भाजपने गेल्या आठवड्यात संसद बंद पाडली हा देखील त्या षडयंत्राचा भाग आहे.

‘भारत जोडो’ यात्रेनंतर साऱ्या देशात बदलेल्या वातावरणामुळे मोदी सरकार व भाजपला धडकी भरली आहे. त्यातच प्रचंड महगाई, बेकारी आणि अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा यामुळे संतप्त झालेली देशातील जनता मोदी सरकार व भाजपला येणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करणार याची प्रचिती भाजपला जागोजागी येऊ लागली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा निवडणूक ही त्याचीच प्रचिती आहे असे मोहन जोशी म्हणाले.

त्यामुळेच देशातील या मोदी सरकार विरुद्धच्या असंतोषाचे नेतृत्व करणारे कॉंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांना विविध खटल्यांमध्ये अडकवणे, त्यांची प्रतिमा डागाळणे आणि सत्र न्यायाल्याने शिक्षा दिल्याच्या नावाखाली त्यांना लोकसभेतील त्यांचे अध्यक्ष यांच्या मार्फत अपात्र करणे हे मोठे षडयंत्र भाजपा ने रचले आहे. असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, यामुळे कॉंग्रेस पक्ष झुकणार नाही. लोकशाहीतील निवडणूक आयोग सत्र न्यायालय यांच्यावर दडपण आणून स्वतःला हवे तसे निर्णय लाऊन घेतले जातात अशी टीका भाजपावर होत आहे. त्याचाच हा भाग असावा. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अडाणी प्रेम उघड झाल्यामुळे ते आणि त्यांचा भाजपा पक्ष घायकुतीला आला आहे त्याचेच हे बोलके उदाहरण आहे. आमचे नेते खा. राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्राचा मुकाबला करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील असा इशारा आम्ही देतो असे मोहन जोशी यांनी शेवटी म्हटले.

 

Kasba by-election | कसब्याच्या पराभवाचे मूल्यमापन; योग्य ती कारवाई करू | देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसब्याच्या पराभवाचे मूल्यमापन; योग्य ती कारवाई करू | देवेंद्र फडणवीस

कसब्यात महाविकास आघाडीला विजय मिळाला आहे. कसब्यात पराभव का झाला याचे मुल्यमापन आम्ही केले आहे. ते आमच्यापर्यंत आलेही आहे. त्यावर आता योग्य ती कारवाई केली जाईल.असे  उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. (Kasba by-election)

एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असताना विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कसब्यातील भाजपच्या पराभवानंतर ते प्रथमच पुण्यात आले होते. त्यांच्यासमवेत प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे व अन्य काही पदाधिकारी होते. फडणवीस म्हणाले, एखादी निवडणूक हरल्यानंतर फार काही फरक पडतो असे मी मानत नाही, मात्र कोणत्याही निवडणुकीतील जय पराजयानंतर आम्ही त्याचे मुल्यमापन करतो. कसब्यातील पराभ‌वाचे तसे पोस्टमार्टे झाले आहे. त्यावरून योग्य ती कारवाई केली जाईल. असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)

NCP Vs BJP | मुरलीधर मोहोळ यांचा आरोप म्हणजे स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न | आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

मुरलीधर मोहोळ यांचा आरोप म्हणजे स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न | आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे

| भाजपच्या टिकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

पुणे | मिळकतकरातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येऊन विधी मंडळाचे काम सुरू होतानाच आंदोलन केले. मात्र याला भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी नौटंकी असे संबोधले होते. या टीकेला राष्ट्रवादी आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे म्हणाले, मिळकतकरातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येऊन विधी मंडळाचे काम सुरू होतानाच आंदोलन केले. मात्र, कसबा निवडणूकीतील पराभवाच्या कारणांचा अहवाल देण्यासाठी आलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना या राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेल्या आंदोलनाची माहिती समजल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या भेटीचा देखावा करून सवलतीची मागणी केली. मुळातच आमचे आंदोलन नियोजित होते, म्हणूनच या आंदोलनाचे फलकही आधीच तयार केले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीनंतर आघाडीच्या आमदारांना जाग आली हा मोहोळ यांचा आरोप हास्यास्पद तर आहेच पण स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्नही आहे. पुणेकरांना ही सवलत पुन्हा लागू व्हावी हीच आमची प्रामाणिक भुमिका असून त्यासाठी आम्ही आवाज उठविणारच.

| काय म्हणाले होते मुरलीधर मोहोळ?

आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर पुण्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांना जाग आली आणि त्यांनी घाईघाईने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाची नौटंकी केली. स्वतःची निष्क्रियता छाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या नौटंकीला पुणेकर भुलणार नाहीत, अशा शब्दात मोहोळ यांनी टीका केली होती.

Chandrkant Patil | BJP | सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागा! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपा कार्यकर्त्यांना सूचना

Categories
Breaking News Political पुणे

सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागा!

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपा कार्यकर्त्यांना सूचना

| खासदार गिरीश बापट आणि भाजपाचे हेमंत रासने यांची भेट

कसबा विधानसभा पोटनिवडणुक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा खासदार गिरीश बापट आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली. यावेळी हेमंत रासने यांच्या भेटीत कार्यकर्त्यांना संवाद साधून पुन्हा जोमाने कामाला लागण्याची सूचना केली.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा अनपेक्षित पराभव झाला. या पराभवानंतर काही कार्यकर्ते निराश झाले होते. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी रासने यांच्या घरी कसबा मंडलाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीत पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोट निवडणुकीत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. संघर्ष हा भाजपाचा स्थायीभाव आहे. संघर्षाच्या बळावरच आपण अनेक आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना करुन परतवून लावली. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे,” असा विश्वास दिला. यानंतर सर्वांनी आता जिंकेपर्यंत लढायचं, असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबियांशी ही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संवाद साधला. त्यांनाही कामाला लागण्याची सूचना केली. त्यावर हेमंत रासने यांच्या पत्नी सौ. मृणाली रासने यांनी ‘निवडणुकीच्या काळात सर्वांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. यातून सर्वांचे रासने कुटुंबासोबत अतूट नाते निर्माण झाले आहे. हे नाते जपण्यासोबतच अजून पुढे वाढविणार’ असल्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, रासने यांच्या भेटीपूर्वी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी खा. गिरीश बापट यांचीही सदिच्छा भेट घेतली‌. यावेळी श्री. पाटील यांनी खा. बापट तब्येची विचारपूस केली. ‘बापट साहेब आपण काळजी घ्या, आणि लवकर बरे व्हा!’ अशी सदिच्छा व्यक्त केली.

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे | कारवाईचे दिले आश्वासन

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे | कारवाईचे दिले आश्वासन

राज्य आणि देशातीलच राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी प्रचार संपल्यानंतरही थांबायला तयार नाहीत. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, त्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रवींद्र धंगेकर हे आज सकाळी कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले होते. संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी हे उपोषण मागे घेतलं आहे.
भाजपचे नेते आणि पदाधिकारी हे पोलिसांच्या उपस्थितीत कसब्यातील मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले होते. धंगेकरांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान धंगेकर यांच्यावर भाजपकडून देखील टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी धंगेकर यांना टीकेचे लक्ष्य केले होते.
तर रविंद्र धंगेकर यांच्या आरोपवर जगदीश मुळीक यांनी उत्तर देताना म्हंटलं होतं की, हा कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे, हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, असे खोटे आरोप भाजपच्या उमेदवारावर करुन फक्त सहानुभूती निर्माण करण्याचं काम ते करत असल्याची प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली होती.

आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या होत्या,
महाविकास आघाडीचे उमेदवार  धंगेकर यांना कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे पराभूत मानसिकतेतून ते भारतीय जनता पार्टीवर मतदारांना पैसे वाटल्याचा बेछूट आरोप करीत आहेत. हा कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा अपमान आहे. तो मतदार कधीही सहन करणार नाही तसेच निवडणुकीतील पराभवाची कारणे धंगेकर यांनी आतापासून शोधण्यास सुरुवात सुरुवात केली आहे. कसबा मतदारसंघातील मतदार मतपेटी द्वारे चोख उत्तर देतील. गेले काही दिवस पोलीस प्रशासन कसबा मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांततेच्या मार्गाने निवडणुका पार पाडाव्यात यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. मात्र पोलीस आणि प्रशासन यांच्यावरही धंगेकर यांनी आरोप केले आहेत. यामुळे प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. मी धंगेकर यांच्या विधानांचा तीव्र शब्दात निषेध करते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकल्याने हे असे उपोषण करावे लागत आहे. तसेच आमचा मतदार पैसे घेऊन मतदान करणारा नाही. असंही फडणवीस यांनी म्हटलं.

By election | प्रचाराच्या तोफा थंडावल्या | रविवारी मतदान | जनता कुणासोबत महाविकास आघाडी कि महायुती?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

प्रचाराच्या तोफा थंडावल्या | रविवारी मतदान

| जनता कुणासोबत महाविकास आघाडी कि महायुती?

Kasba-Chinchwad ByEelction : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार अखेर आज संध्याकाळी ५ वाजता संपला. यानंतर रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडेल. या दोन्ही मतदारसंघात जोरदार प्रचार पार पडला. भाजप-शिवसेनेसह महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेत्यांनी इथं प्रचार सभा घेतल्या. त्यामुळं मतदान किती होईल आणि कोण निवडून येईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच जनतेचा कल महाविकास आघाडीकडे आहे कि महायुती कडे याबाबतही तर्क वितर्क लढवले जात आहेत. (Kasba Chinchwad ByEelction Campaign ends vote on Sunday)

दरम्यान, चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आश्विनी जगताप तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासह काही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तर कसब्यात युतीचे उमेदवार हेमंत रासने आणि मविआचा रविंद्र धंगेकर तसेच आनंद दवे, अभिजीत बिचुकले आणि इतर अपक्ष उमेदवार यांच्यात लढत होणार आहे. पण दोन्ही मतदारसंघात युती आणि आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार पार पडला.

कसबा पोटनिवडणुक | छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळविण्यावर काँग्रेस, भाजपचा भर

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणुक | छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळविण्यावर काँग्रेस, भाजपचा भर

 कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करणारे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना शहरातील विविध संघटना आणि अनेक राजकीय पक्षांच्या स्थानिक घटकांनी पाठिंबा दिला आहे. याचाच सामना करत, भाजपने मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेली कसबा जागा राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना आणि आघाडीतील भागीदारांना एकत्र केले आहे.
 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असून आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारात भाग घेतला आहे.
 सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियानेही धंगेकरांना पाठिंब्याचे पत्र दिले असून, त्यांचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील.  दीपक निकाळजे गटाच्या नेतृत्वाखालील आरपीआय आणि ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षानेही धंगेकरांना पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली असून, माकपचे अजित अभ्यंकर यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आणि भाजपचा एकजुटीने सामना करण्याची वेळ आली आहे.  कसबा पोटनिवडणूक धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणारा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि विधानसभेत जनतेचे प्रतिनिधित्व करण्याच्या रणनीतीचा एक भाग आहे,” असे सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या एका नेत्याने सांगितले.
 दुसरीकडे, भाजपला राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, आरपीआय (ए)चे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नेत्यांनी रासनेना पाठिंबा दिला आहे.  भाजपने शहराचे खासदार गिरीश बापट यांनाही आजारी असताना सभेला संबोधित करण्यासाठी आणले आणि मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना रासने यांच्या प्रचारासाठी राजी केले.  पक्षाचे तिकीट न मिळाल्याने टिळक कुटुंबीयांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती.
महादेव जानकर म्हणाले, “आम्ही भाजपसोबतच्या युतीसाठी वचनबद्ध आहोत आणि कसब्यात त्यांच्या उमेदवाराला सर्वतोपरी पाठिंबा देऊ.
 अलीकडच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपसोबतची वाढती जवळीकही रासणेंना दिलासा देणारी ठरली आहे.  मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा आणि विकासावर लक्ष केंद्रित करत भाजपला पाठिंबा दिला आहे.  मात्र, निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतलेला नाही.
 योगायोगाने, कॉंग्रेसचे धंगेकर हे मनसेचे माजी नेते आहेत ज्यांनी 2017 मध्ये पक्ष बदलला परंतु त्यांच्या पूर्वीच्या पक्षातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
 रासने  यांच्या प्रचारासाठी भाजपने माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यासह शहरभरातील पक्षाचे माजी नगरसेवकही घेतले आहेत.  रासने यांच्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर आहे.