Pune Loksabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांकडून पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांकडून पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

 

Pune Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सायंकाळी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. (Pune District Administration)

यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर, निवडणूक पोलीस निरीक्षक विवेकानंद सिंग, निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय, पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, निवडणूक पोलीस निरीक्षक ज्योती नारायण, खर्च निरीक्षक कमलेश मकवाना, बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक पोलीस निरीक्षक जॉएस लालरेम्मावी, खर्च निरीक्षक विजय कुमार, शिरुर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, निवडणूक पोलीस निरीक्षक जया गौरी, खर्च निरीक्षक बी. मोहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल यावर लक्ष देण्यासह निवडणूक खर्चाची पडताळणी करावी. नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी, आदी सूचना योवळी निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.

निवडणुकीत रोकड, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करावी, अशाही सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा सादरीकरणाद्वारे देताना सांगितले, जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागातील मतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी गेल्या तीन वर्षात युवा मतदार, उद्योगांमध्ये काम करणारे मतदार, महिला मतदार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात ८३ लाख ३८ हजार ७४७ इतकी मतदार संख्या असून मतदान जागृती उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांची संख्या १ लाख १ हजार ४४४ तर २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ लाख ८० हजार ४३१ असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ८ हजार ३८२ मतदान केंद्रे असून १९ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नसून शॅडो भागातील ३८ मतदान केंद्रे आहेत. येथे संपर्कासाठी हॅम रेडिओसह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदारसंघांसाठी मिळून १० हजार ३१ क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी तसेच ८५९ सेक्टर पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाल, ईमेल आदीद्वारे तसेच सी-व्हिजीलद्वारे आचारसंहिता मोठ्या ७८२ तक्रारी प्राप्त झाल्या असून कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती द्विवेदी यांनी सांगितले, बारामती लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार असून मतदारसंघासाठी आवश्यक अतिरिक्त बॅलेट युनिट प्राप्त झाले त्यांच्या पुरवणी सरमिसळसह दुसरी सरमिसळ झाली आहे. मतदान कर्मचाऱ्यांचे तीन प्रशिक्षण झाले असून मतदान केंद्रांवरील तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती देतानाच परवानाप्राप्त शस्त्र जमा करण्याची कार्यवाही, मद्य, रोकड जप्तीची कारवाई आदी माहिती दिली.

बैठकीस सर्व विधानसभा मतदार संघांचे सहायक निवडणूक निरीक्षक, सर्व निवडणूकविषयक जबाबदाऱ्यांचे समन्वयक अधिकारी आदी उपस्थित होते.
0000

Pune Lok Sabha Election | लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३२ हजार फलक हटविले

Categories
Breaking News social पुणे

Pune Lok Sabha Election | लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३२ हजार फलक हटविले

 

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) –  भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय जागेतील ११ हजार ८३, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १९ हजार ६५२ आणि खाजगी जागेवरील १ हजार ८१५ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. (Pune Lok Sabha Election)

जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिते पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने ३३ मावळ लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ९६१, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे २ हजार ५५२, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २०७, ३४ पुणे लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ७८५, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ४३१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २५७, ३५ बारामती लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ४८८, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे ५ हजार २८१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २३२ तर ३६ शिरूर लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ८४९, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १० हजार ३८८, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ११९ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन व्हावे म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज पूर्णपणे हटविण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

Pune Congress | Loksabha Election | … तरच पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress | Loksabha Election | … तरच पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी!

Pune Congress – (The Karbhari News Service) – एकेकाळी पुण्यावर एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याची संधी चालून आली आहे.गटबाजी विसरून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने झोकून देऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला तर काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार तर आहेच शिवाय विधानसभा, त्यापाठोपाठ होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये यशाचा मार्ग सुकर ठरणार आहे.त्यासाठी एकीची मोट बांधली तरच पुण्यावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. (Pune Loksabha Election)

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघापैकी एक महत्वाचा असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा होता.शहरावर काँग्रेसचे प्राबल्य होते.मात्र तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर आजतागायत काँग्रेस पक्ष या हक्काच्या मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व मिळवू शकलेला नाही. कारण काँग्रेसला तीन वेळा पराभव स्वीकारावा लागलेला आहे.त्याची वेगवेगळी कारणे आहेत. असे असले तरी कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे काँग्रेसला हक्काची तीन लाख मते सातत्याने मिळत आली आहेत.

मुळात ज्यावेळी शहराचे नेतृत्व तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडे होते, त्यावेळी कर्तृत्वान आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जात असत. त्यामुळेच पक्ष हा मजबूत तर होताच शिवाय महापालिकेवर वर्चस्व होते. तेंव्हाची नगरसेवकांची संख्या आज कितीपर्यंत घसरली यावरूनच काँग्रेसला पोषक वातावरण असतानाही अधोगती का लागली हेच स्पष्ट होत असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते आजही तितक्याच ऊर्जेने काम करत आहेत.त्यामुळे काँग्रेस आजही जिवंत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आणखी ऊर्जा दिली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. काँग्रेसचे वर्चस्व वाढले तर कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होतील.त्यांचे ध्येय साध्य होईल.

कार्यकर्त्यांना जर मोठ्या पदावर जायचे असेल, प्रत्येकाला संधीची अपेक्षा असेल तर यंदाची लोकसभा निवडणूक त्यादृष्टीने खरी सुरुवात आहे. यात यशस्वी झाले तर आगामी काळात काँग्रेसला कुणीच रोखू शकणार नाही. इतकेच काय पुण्यातील ही यशस्वी सुरुवात देशभरात काँग्रेससाठी निश्चितच आदर्शवत ठरेल. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविताना लोकसभेसाठी उमेदवार निवडून आणणे हीच पदाधिकारी -कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.कार्यकर्ते -पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम केले तर यश कसे मिळते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदिलाने काम केले तर यश हमखास आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पक्षाच्या श्रेष्ठींना पत्र दिले. त्यातील उद्देश हाच आहे. काँग्रेसला पुनरुज्जीवित करणे ही काळाची गरज आहे.

आज भाजपने जर पुन्हा हा मतदारसंघ काबीज केला तर आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. पण कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असेल तर त्यात गैर काय ? आज काँग्रेसची स्थिती काय हे सर्वश्रुत आहे मात्र कार्यकर्ते आजही नेटाने पक्षाचे कार्य करत आहेत. मग त्यांचा उत्साह आणखी कसा वाढवता येईल हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे.त्यानुसारच जाहीर सभेतून जनतेचा कौल घेऊनच लोकसभेचा उमेदवार ठरवा ही आबा बागुल यांची भूमिका रास्तच आहे. आबा बागुल स्वतः लोकसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत मात्र जो कोण उमेदवार असेल याचा निर्णय जाहीर सभेतून पुणेकरांकडून मिळणाऱ्या कौलनुसार घ्या. असाच बागुल यांच्या पत्राचा आशय आहे. त्यामुळे वर्चस्व गमावले असले तरी काँग्रेसचे शहरात अस्तित्व अबाधित आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छा पूर्णत्वाच्या दिशेने जाण्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेससाठी जितकी जमेची ठरणार आहे. त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे, अशीच भूमिका आबा बागुल यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निश्चयाला ताकद दिली तर पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.