Pune Congress | Loksabha Election | … तरच पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी!

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

Pune Congress | Loksabha Election | … तरच पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी!

Pune Congress – (The Karbhari News Service) – एकेकाळी पुण्यावर एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याची संधी चालून आली आहे.गटबाजी विसरून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने झोकून देऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला तर काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार तर आहेच शिवाय विधानसभा, त्यापाठोपाठ होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये यशाचा मार्ग सुकर ठरणार आहे.त्यासाठी एकीची मोट बांधली तरच पुण्यावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. (Pune Loksabha Election)

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघापैकी एक महत्वाचा असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा होता.शहरावर काँग्रेसचे प्राबल्य होते.मात्र तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर आजतागायत काँग्रेस पक्ष या हक्काच्या मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व मिळवू शकलेला नाही. कारण काँग्रेसला तीन वेळा पराभव स्वीकारावा लागलेला आहे.त्याची वेगवेगळी कारणे आहेत. असे असले तरी कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे काँग्रेसला हक्काची तीन लाख मते सातत्याने मिळत आली आहेत.

मुळात ज्यावेळी शहराचे नेतृत्व तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडे होते, त्यावेळी कर्तृत्वान आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जात असत. त्यामुळेच पक्ष हा मजबूत तर होताच शिवाय महापालिकेवर वर्चस्व होते. तेंव्हाची नगरसेवकांची संख्या आज कितीपर्यंत घसरली यावरूनच काँग्रेसला पोषक वातावरण असतानाही अधोगती का लागली हेच स्पष्ट होत असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते आजही तितक्याच ऊर्जेने काम करत आहेत.त्यामुळे काँग्रेस आजही जिवंत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आणखी ऊर्जा दिली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. काँग्रेसचे वर्चस्व वाढले तर कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होतील.त्यांचे ध्येय साध्य होईल.

कार्यकर्त्यांना जर मोठ्या पदावर जायचे असेल, प्रत्येकाला संधीची अपेक्षा असेल तर यंदाची लोकसभा निवडणूक त्यादृष्टीने खरी सुरुवात आहे. यात यशस्वी झाले तर आगामी काळात काँग्रेसला कुणीच रोखू शकणार नाही. इतकेच काय पुण्यातील ही यशस्वी सुरुवात देशभरात काँग्रेससाठी निश्चितच आदर्शवत ठरेल. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविताना लोकसभेसाठी उमेदवार निवडून आणणे हीच पदाधिकारी -कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.कार्यकर्ते -पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम केले तर यश कसे मिळते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदिलाने काम केले तर यश हमखास आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पक्षाच्या श्रेष्ठींना पत्र दिले. त्यातील उद्देश हाच आहे. काँग्रेसला पुनरुज्जीवित करणे ही काळाची गरज आहे.

आज भाजपने जर पुन्हा हा मतदारसंघ काबीज केला तर आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. पण कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असेल तर त्यात गैर काय ? आज काँग्रेसची स्थिती काय हे सर्वश्रुत आहे मात्र कार्यकर्ते आजही नेटाने पक्षाचे कार्य करत आहेत. मग त्यांचा उत्साह आणखी कसा वाढवता येईल हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे.त्यानुसारच जाहीर सभेतून जनतेचा कौल घेऊनच लोकसभेचा उमेदवार ठरवा ही आबा बागुल यांची भूमिका रास्तच आहे. आबा बागुल स्वतः लोकसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत मात्र जो कोण उमेदवार असेल याचा निर्णय जाहीर सभेतून पुणेकरांकडून मिळणाऱ्या कौलनुसार घ्या. असाच बागुल यांच्या पत्राचा आशय आहे. त्यामुळे वर्चस्व गमावले असले तरी काँग्रेसचे शहरात अस्तित्व अबाधित आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छा पूर्णत्वाच्या दिशेने जाण्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेससाठी जितकी जमेची ठरणार आहे. त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे, अशीच भूमिका आबा बागुल यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निश्चयाला ताकद दिली तर पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.