Pune Metro | जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र
Spread the love

जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानकाचे (Civil court metro station) 95 टक्के काम पूर्ण झाले असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा समितीकडून पुढील दोन महिन्यांत या मार्गाची तपासणी केली जाणार आहे. मार्च अखेरपर्यंत पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मार्गिका सुरू केल्या जातील, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. (pune metro)

पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट (17 किमी) आणि वनाज ते रामवाडी (16 किमी) अशा दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकामध्ये पीसीएमसी ते स्वारगेट मार्गिकेवरील भूमिगत स्थानक आणि वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना एस्किलेटर आणि लिफ्ट यांनी जोडले आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर 11.17 एकर असून, या स्थानकाला येण्या-जाण्यासाठी एकूण सात एन्ट्री पॉइंट असणार आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेता या स्थानकात मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थानकात 8 लिफ्ट आणि 18 एस्किलेटर बसविण्यात येत आहेत. सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी ही पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका देखील पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक हे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकात मेट्रो भवनचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे मेट्रोवर येथून नियंत्रण केले जाईल. मेट्रो भवनची इमारत खइउ प्लॅटिनम मानांकनानुसार बांधण्यात येणार असून, मल्टी मोडल इंटिग्रेशनसाठी पीएमपीएमएलचा थांबा असणार आहे. या संपूर्ण परिसराचे लॅंडस्केप अत्यंत आकर्षक करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कारंजे, विविध झाडे, हरित पट्टे, आकर्षक झाडी लावण्यात येणार आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली 33.1 मीटर (108.59 फूट) असून, हे भारतातील सर्वांत खोल मेट्रो स्थानक असणार आहे. या भूमिगत स्थानकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत 95 फूट उंच असून, देखील तेथे थेट सूर्यप्रकाश पोहचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्‍या खोल स्थानकावर सूर्यप्रकाश पोहचणारे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक असणार आहे.

 
दोन महिन्यांत फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच या दोन्ही मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग प्रवाशांसाठी खुले झाल्यावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरे मेट्रोसारख्या मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थेने जोडली जाणार आहेत. पीसीएमसी ते वनाज या 22 किमीचा प्रवास केवळ 31 मिनिटांमध्ये पार करणे शक्‍य होणार आहे.