Rain in Karvenagar Area | कर्वेनगर परिसरात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Rain in Karvenagar Area | कर्वेनगर परिसरात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची महापालिका आयुक्ताकडे मागणी

| भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली मागणी

 

Pune Rain News – (The karbhari News Service) – कर्वेनगर मधील समर्थ पथ,विठ्ठल मंदिर रस्त्यावरील सोसायट्या, ताथवडे उद्यान समोरील भाग येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिका आय,आयुक्त यांच्याकडे केली आहे.

खर्डेकर यांच्या निवेदनानुसार दोन वर्षांपासून समर्थ पथावरील प्रतिज्ञा मंगल कार्यालयासमोरील चिंतामणी, गंगानगरी, मोरयाकृपा व अन्य सोसायटीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरत आहे.येथे असलेल्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरत असून थोडा मोठा पाऊस झाला की येथील सर्व भागात पाणी साचते व सोसायटी्यांचे पार्किंग पाण्याने भरून जाते व वीज मीटर खाली असल्यामुळे वीज देखील बंद करावी लागते व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गतवर्षी रात्री उशिरापर्यंत थांबून स्वतः तत्कालीन मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी येथे पाणी उपसण्याच्या कामात लक्ष घातले होते तर यावर्षी देखील 8 जून ला अशीच परिस्थिती उद्भवली होती व मी आपणास सतर्क केले होते.

तसेच विठ्ठल मंदिर रस्त्यावर स्नेह म्हाडा सोसायटी, कुमार परितोष सोसायटी, शहीद मेजर ताथवडे उद्यानासमोरील मधुसंचय समोरील गल्ली तील बंगले व सोसायटीत तसेच नदीपात्राजवळील राजपूत वीटभट्टी, खिलारेवाडी, परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करून पाणी उपसा करत आहे. मात्र यंत्रणा देखील कमी पडत आहे. येथे कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अशी आग्रही मागणी करत आहे. आत्ताचा पाऊस ओसरल्यावर केवळ ह्या भागातच नाही तर शहरातील अश्या सर्व ठिकाणाची पाहणी करून पाणी साचणार नाही. यासाठी काय करता येईल. यावर तज्ञाचा सल्ला घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

PMC Building Development Department | बाणेर परिसरातील अनधिकृत हॉटेल्स वर कारवाई

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Building Development Department | बाणेर परिसरातील अनधिकृत हॉटेल्स वर कारवाई

PMC Action on Illegal Hotels – (The Karbhari News Service) – बाणेर येथील  हाँटेल एलिफंट व हाँटेल मद्रासी राजा यावर बांधकाम विकास विभाग झोन 3, घरपाडी चे कामगार व  पोलीस स्टाफच्या मदतीने  कारवाई  करण्यात आली. अशी माहिती बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)
या कारवाईमधे  सुमारे 2350 चौ.फूट  क्षेत्र रिकामे करण्यात आले आहे. कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता व  बांधकाम विभाग झोन क्रं. 3 चे
कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व स्टाफ यांच्या पथकाने कारवाई केली.

Maharashtra Shiksha Parishad | पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

Maharashtra Shiksha Parishad | पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

 

Maharashtra Rajya Pariksha Parishad – (The Karbhari News Service) –  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाच्या अनुषंगाने ३० एप्रिल ते १० मे २०२४ या कालावधीत संबंधित शाळेमार्फत गुणपडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीचे अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही तयार करण्यात आली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ५ वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या ५ लाख १० हजार ६७२ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ९२ हजार ३७३ उपस्थित राहिले. त्यापैकी १ लाख २२ हजार ६३६ विद्यार्थी पात्र ठरले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या ३ लाख ८१ हजार ५८८ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ६८ हजार ५४३ उपस्थित राहिले. त्यापैकी ५६ हजार १०९ विद्यार्थी पात्र ठरले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ५ वी) पात्र विद्यार्थ्यांपैकी मंजूर संचाच्या आधारे १६ हजार ६९१ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ८ वी) पात्र विद्यार्थ्यांपैकी मंजूर संचाच्या आधारे १४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळांवर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून पाहता येणार आहे. तसेच शाळांना त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येणार आहे. तथापि, शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येणार आहे. छापील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र शाळांना पाठविण्यात येणार आहे.

संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या लिंक ‘अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)’, ‘गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय)’ ‘शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय, तालुकानिहाय)’ अशा आहेत. विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लिंकवर क्लिक करून माहिती डाऊनलोड करता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे महाराष्ट्र शेती

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

Pradhan Mantri Pik Vima Yojana – (The Karbhari News Service) –  प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली असून शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनाच्या निर्गमीत होणाऱ्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरीप हंगाम २०२३-२४ ते रब्बी हंगाम २०२५-२६ करीता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’(कप ॲण्ड कॅप मॉडेल ८०:११०) राबविण्यास राज्य शासनाने २६ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होईल, आदी या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक आहे. खातेदाराच्या व्यतिरीक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. तथापि या योजनेत शेतकऱ्यांनी प्रति अर्ज केवळ १ रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. विमा हप्ता १ रुपया वजा जाता उर्वरीत फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्यशासनामार्फत अदा करण्यात येईल.

या योजनेत विमा कंपनी एका वर्षामध्ये जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्क्यापर्यंतचे दायित्व स्वीकारेल. तथापि, एका वर्षातील देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पेक्षा जास्त असल्यास ११० टक्केपेक्षा जास्तीचा भार राज्य शासन स्वीकारेल आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरीत विमा हप्ता राज्य शासनाला परत करेल.

जोखमीच्या बाबी:- हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे (जलप्रिय पिके- भात, ऊस व ताग पिक वगळून), भूस्खलन, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान या बाबींना विमा संरक्षण देण्यात येईल.

पुणे जिल्ह्याकरीता योजनेमध्ये समाविष्ट पिके, तालुके, विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (केंद्र अधिक राज्य आणि शेतकरी हिस्सा पकडून) पुढीलप्रमाणे:

भात- हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदर- प्रतिहेक्टरी ५१ हजार ७६० रुपये- विमा हप्ता (शेतकऱ्याचा १ रुपये हिस्सा पकडून) १ हजार ५५२.८० रुपये.
ज्वारी- हवेली, भोर, खेड, आंबेगाव- २७ हजार रुपये- विमा हप्ता ४ हजार ८६० रुपये.
बाजरी- हवेली, खेड, आंबेगाव, शिरुर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर- २४ हजार रुपये- २ हजार ६४० रुपये.
नाचणी- मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव- २० हजार रुपये- ८०० रुपये.
तूर- शिरुर, बारामती, इंदापूर- ३५ हजार रुपये- ७ हजार ३५० रुपये.
मूग, उडीद- शिरुर- २० हजार रुपये- ५ हजार रुपये
भुईमूग- हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर, बारामती, पुरंदर- ४० हजार रुपये- ३ हजार २०० रुपये.
सोयाबीन- इंदापूर, जुन्नर, खेड, बारामती, मावळ, आंबेगाव- ४९ हजार रुपये- ३ हजार ९२० रुपये.
कांदा- बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर- प्रतिहेक्टरी ८० हजार रुपये- विमा हप्ता ६ हजार ४०० रुपये.

ई-पीक पाहणी आवश्यक: ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई- पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.

योजनेच्या अधिक माहितीसाठी विमा कंपनी एच.डी.एफ.सी. इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई टोल फ्री क्रमांक १४४४७, ई-मेल आयडी pmfby.maharashtra@hdfcergo.com येथे किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, नजिकचे विविध कार्यकारी सोसायट्या, जवळचे सीएससी सेंटर यांचे कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरील संबंधीत कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Palakhi Sohala 2024 | पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Palakhi Sohala 2024 | पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

| उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक संपन्न

Palakhi Sohala 2024 – (The Karbhari News Service) – आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. (Aashadhi Wari 2024)

विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान आवताडे, बबनदादा शिंदे,संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा.

इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे. पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्यादृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गावरील कायमस्वरुपी सुविधेच्यादृष्टेने विभागीय आयुक्तांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पालखी सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न व्हावा यासाठी शासन- प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. शासनाचे सर्व विभाग सकारात्मक राहून सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी सुरक्षा आणि अन्य व्यवस्था देण्याबाबत राज्य स्तरावरून सूचना देण्यात येतील. वारी दरम्यान दुर्घटना घडल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने ठेवण्यात आले आहेत. रस्त्याची सुरू असलेली कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आषाढी वारीसाठी ॲप आणि प्रशासनातर्फे संपर्क पुस्तिका तयार करण्यात येईल. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली.

यावेळी लोकप्रतिनिधींनी पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सूचना केल्या. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते पालखी सोहळ्यादरम्यान करण्यात येणाऱ्या शौचालय सुविधांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे लोकार्पण करण्यात आले.

*पुणे जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात*

जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतायरीची माहिती दिली. पालखी सोहळ्यासाठी ३ हजारपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार ८००, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार २०० आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २५० शौचालयांची सुविधा करण्यात येणार आहे.

आषाढी वारीसाठी २०० पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली असून ४५ ठिकाणी पाणी भरण्याची सुविधा असणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. ११५ आरोग्य पथके, ५७ फिरते वैद्यकीय पथक आणि १७९ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे. १२ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येईल.

अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. मोबाईल टॉवरची नेटवर्क फ्रिक्वेंसी वाढविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर असलेल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

*सातारा जिल्ह्यातील नियोजन*

अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी सातारा जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. दत्त घाटाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल. पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. लोणंद पालखी तळावर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. येथे २५ फिरते आरोग्यदूत आणि ८ आरोग्य पथके असतील.

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि वाहतूक नियोजनाबाबत व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

*सोलापूर जिल्ह्यातील नियोजन*

जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा, नियुक्त करण्यात आलेले आरोग्यदूत, घटना प्रतिसाद प्रणाली, आपत्ती व्यवस्थापन व मदत केंद्र याबाबत नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार दर्शन बारीमधील प्रत्येक वारकऱ्याला एक लिटर पाण्याची बाटली व लिंबू पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मल वारीच्यादृष्टीने सर्व नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा, श्री संत निळोबाराय संस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते
0000

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

 

Pune  – New Delhi – (The Karbhari News Service) –  पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि नुकतीच केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्विकारण्यापूर्वी मोहोळ यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेत मार्गदर्शन घेतले. राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारताना विभागाचे केंद्रीय सचिव डॅा आशिष कुमार भूटानी यांची उपस्थिती होती. शिवाय शाह यांनी सहकार मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा मोहोळ हे त्यांच्या समावेत होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर मोहोळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शाह यांचे अभिनंदन केले. (Murlidhar Mohol Pune)

कार्यभार स्वीकारल्यावर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांकडून कामाबद्दल माहिती घेत चर्चाही केली. कार्यभार स्वीकारल्यानंतर मोहोळ यांनी सांगितले की, ‘भारतीय जनता पार्टीत सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळते, हे वारंवार सिद्ध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सहकार मंत्री अमित शाह जी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग महाराष्ट्रातील आणि देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी करण्याचे ध्येय ठेवले आहे. सहकार क्षेत्राबद्दल सामान्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम प्राधान्याने करायचे आहे.

ते पुढे म्हणाले, केंद्रीय पातळीवर सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर सहकाराबद्दल आणखी विश्वास वाढवण्याचे आणि सहकाराची वृद्धी करण्याचे काम सुरु असून महाराष्ट्राच्या दृष्टीने हे मंत्रालय अतिशय महत्त्वाचे आहे. सहकाराची पाळेमुळे देशाच्या ग्रामीण भागात पसरली असून या मंत्रालयामार्फत ग्रामीण जनतेसाठी काम करता येईल, याचे मोठे समाधान आहे.

मोहोळ यांनी पदभार स्विकारण्यापूर्वी सहकार मंत्री शाह यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छांची दिल्या. यावेळी शाह यांनी शुभेच्छांचा स्विकार करत मोहोळ यांच्या पाठीवर थाप टाकत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Ashadhi Wari Palkhi Sohala 2024 | सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे आदेश 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Ashadhi Wari Palkhi Sohala 2024 | सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे आदेश

 

Ashadhi Wari Palkhi Sohala – (The Karbhari News Service) –  आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. (Palkhi Sohala 2024)

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

यंदा वेळेवर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याचे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, पावसाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक सुविधा करण्यात याव्यात. पावसाळा लक्षात घेता स्वच्छता आणि आरोग्याचा परस्पर संबंध असल्याने तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. स्वच्छतेच्या नियोजनासाठी स्वतंत्र नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.

पालखी सोहळा जगातील सर्वात शिस्तबद्ध असणारा सोहळा आहे. आपण अशा सोहळ्याचे भागीदार आहोत या भावनेने सोहळ्यासाठी आपले योगदान द्यावे. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत वाढ कण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी नगरपालिकेकडील लायटिंग टॉवरचा उपयोग पालखी दरम्यान करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन याबाबत आदर्श कार्यपद्धती तयार करावी. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. शहरातील स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. त्यासाठी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, तात्पुरते शौचालय, आरोग्य तपासणी, पालखी तळाचे सपाटीकरण, इंधन आणि वीज पुरवठा, शोषखड्डे, तात्पुरता निवारा केंद्र, आरोग्य किट आदींची माहिती यावेळी देण्यात आली.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार ५००, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २०० शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी महानगरपालिका, संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व औषध प्रशासन, महावितरण आदी विभागांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला.

बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज देवस्थान, श्री संत सोपानदेव महाराज देवस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान, श्री निळोबाराय देवस्थान पदाधिकारी, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tata Smarak Bharati 2024 | टाटा स्मारक हॉस्पिटल येथे माजी सैनिकांची भरती

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Tata Smarak Bharati 2024 | टाटा स्मारक हॉस्पिटल येथे माजी सैनिकांची भरती

Tata Smarak Bharti – (The Karbhari News Service) – टाटा स्मारक हॉस्पिटल, मुंबई येथे सुरक्षा सहाय्यक, सुरक्षा रक्षक व वाहन चालक ही पदे शैक्षणिक अर्हता धारक माजी सैनिकांकडून भरण्यात येणार असून पात्र व इच्छुक माजी सैनिकांनी https://tmc.gov.in/def/inst.aspx या संकेतस्थळावर ९ मे अखेर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे तर्फे करण्यात आले आहे.

टाटा स्मारक हॉस्पिटल मुंबई येथे सुरक्षा सहाय्यक १ पद अराखीव, सुरक्षा रक्षक अराखीव २ पदे, इतर मागास प्रवर्ग २ पदे, अनुसूचित जाती ३ पदे, अनुसूचित जमाती ३ पदे व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग १ पद अशी ११ पदे तर वाहन चालक संवर्गातील अराखीव, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रत्येकी १ पद अशी ४ पदे भरती करण्यात येणार असून उमेदवारांनी भरतीचे नियम अवलोकन करून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

उमेदवारांनी संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून जतन करावीत. अर्जाची हार्ड कॉपी पाठविण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी मानव संसाधन विभाग भरती कार्यालय, ०२२-२४१७७००० विस्तार क्रमांक ४६२७ व ४६२७ वर संपर्क साधावा.

पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक अर्हताधारक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे, आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेप्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि) यांनी केले आहे.

MCCIA | Voting Awareness | मतदार जागृतीसाठी ‘एमसीसीआयए’चा पुढाकार ‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

MCCIA | Voting Awareness | मतदार जागृतीसाठी ‘एमसीसीआयए’चा पुढाकार

‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन

 

MCCIA | Voting Awareness – (The karbhari News service) –  मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला असून मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी संस्थेतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष मुकेश मल्होत्रा यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेऊन चेंबरकडून लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी घेण्यात येत असलेल्या पुढाकाराची माहिती दिली.

पुणे शहरातील मतदानाचे कमी प्रमाण लक्षात घेता शहरी भागात आणि विशेषत: औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमधील कामगारांना मतदान करण्यासाठी संस्थेने प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी व्यक्त केली.

‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून आणि औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्षात भेट घेवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मतदान टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे.

पुण्यातील नागरिकांना त्यांच्या नागरी हक्क आणि कर्तव्यांची सखोल जाणीव आहे. पुणे हे नागरी सहभागाच्या संस्कृतीचे वेगळेपण जपते आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिक मतदान करून ही परंपरा जोरकसपणे पुढे न्यायला हवी. त्यामुळे पुण्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रात मतदार जागृतीसाठी सुरू केलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढेल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचा मतदार जागृती उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल. पुणे जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रमुखांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Loksabha Election 2024 | राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली | लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Loksabha Election 2024 | राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली

| लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

 

Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – 
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे असणार आहेत.

2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या 98 हजार 114 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सर्वांत जास्त मतदान केंद्र पुण्यात तर सर्वांत कमी मतदान केंद्र सिंधुदुर्गात

सर्वांत जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. याची संख्या 8 हजार 382 आहे. यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 380 मतदान केंद्रे असणार आहेत. ठाण्यात 6 हजार 592, नाशिकमध्ये 4 हजार 800 आणि नागपूरमध्ये 4 हजार 510 मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये 918 आणि गडचिरोलीमध्ये 950 मतदान केंद्रे असणार आहेत.

3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात

3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात आहेत. अहमदनगरमध्ये 3 हजार 734,सोलापूरमध्ये 3 हजार 617, जळगावमध्ये 3 हजार 582, कोल्हापूरमध्ये 3 हजार 368, औरंगाबादमध्ये 3 हजार 085, नांदेडमध्ये 3 हजार 047 आणि सातारामध्ये 3 हजार 025 मतदान केंद्र असतील.

10 जिल्हयांत 2000 हून अधिक मतदान केंद्रे

2000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 10 जिल्हयात आहेत. रायगडमध्ये 2 हजार 719, अमरावतीमध्ये 2 हजार 672, यवतमाळमध्ये 2 हजार 532, मुंबई शहरमध्ये 2 हजार 517, सांगलीमध्ये 2 हजार 448, बीडमध्ये 2 हजार 355, बुलढाण्यामध्ये 2 हजार 266, पालघरमध्ये 2 हजार 263, लातूरमध्ये 2 हजार 102 आणि चंद्रपूरमध्ये 2 हजार 044 मतदान केंद्र असतील.

2000 पेक्षा कमी मतदान केंद्रे असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे – नंदुरबार 1 हजार 412, धुळे 1 हजार 704, अकोला 1 हजार 719, वाशिम 1 हजार 76, वर्धा 1 हजार 308, भंडारा 1 हजार 156, गोंदिया 1 हजार 288, हिंगोली 1 हजार 17, परभणी 1 हजार 587, जालना 1 हजार 719, उस्मानाबाद 1 हजार 503, रत्नागिरी 1 हजार 717 मतदान केंद्रे असतील.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

0000000