Kasba By Election | कसबा पोटनिवडणूक | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आज बैठक तर शिंदे गट, भाजपची उद्या बैठक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आज बैठक तर शिंदे गट, भाजपची उद्या बैठक

कसबा च्या जागेसाठी कॉंग्रेस च्या इच्छुकांनी मुलाखती दिल्यानंतर कॉंग्रेस ची आज मुंबईत बैठक होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्याच्या जागेवर दावा केल्यानंतर त्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आज बारामती हॉस्टेलवर बैठक घेणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या बैठकांमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. यातच आता पुण्यात शुक्रवारी शिंदे गटाची बैठक होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात शिंदे गटामध्ये खल होणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी शिंदे गट आणि भाजपमध्ये ही बैठक संपन्न होईल.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठकीला उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. शिंदे गट कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचं स्पष्ट आहे.

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या रिक्त झालेल्या जागेची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप एकाही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही.

दरम्यान, महाविकास आघाडी ही निवडणूक लढविणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आघाडीत ही जागा कॉंग्रेसकडे असल्याचेही राष्ट्रवादी कबूल करते मात्र, या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला (ठाकरे गट) काहीच प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे अद्याप काहीच सांगण्यात येत नव्हते. मात्र, आता अजित पवार स्वत: बैठक घेणार असल्याने राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट होणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्‍ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर 26 फेब्रुवारीला पोट निवडणूक होणार आहे. तर अर्ज भरण्यासाठी दि. 7 फेब्रुवारी ही अंतीम मुदत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती मध्ये ही जागा भाजपकडे तर आघाडीत कॉंग्रेसकडे होती. तर शिवसेनेचा उमेदवार बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभा राहिला होता. त्यामुळे, निवडणूक जाहीर होताच कॉंग्रेसने या जागेवर दावा केला असून त्यांच्याकडून 16 जण इच्छूक आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही जागा कॉंग्रेसची असल्याने महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले होते.

कुणाल टिळक यांना दिल्लीतून फोन
दरम्यान, भाजपमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच सुरू असतानाच कुणाल टिळक यांना भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयातून बोलत असून तुम्हाला कसबा मतदारसंघासाठी तिकिट जाहीर झाले आहे. तुम्ही ऑनलाईन ७६  हजार रूपये पाठवा असा फोन बुधवारी आला. मात्र, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने कुणाल यांनी तत्काळ संबधितांना सुनावले. दरम्यान, याची कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसली तरी, खरबदारीचा उपाय म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष मुळीक यांना ही बाब टिळक यांच्याकडून कळविण्यात आली असून, या प्रकरणी राष्ट्रीय कार्यालयास माहिती देऊन अशा प्रकारे फसवणुकीचे फोन केले जात असल्याने खबरादारीच्या सूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

 

कसबा’साठी ‘वाडेश्‍वर कट्ट्या’वर सर्वपक्षीयांची चर्चा

आमदार मुक्‍ताताई टिळक यांच्या अकाली निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत अन्य पक्षांपेक्षा भाजपच्याच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. येत्या दोन दिवसांत आपापल्या पक्षाकडून उमेदवाराची घोषणा होईल, अशी अपेक्षा सर्वच इच्छुकांनी बुधवारी “वाडेश्‍वर कट्ट्या’वर व्यक्त केली. याशिवाय आपणच कसे योग्य उमेदवार आहोत तसेच आपण मतदार संघासाठी काय करू शकतो, याविषयी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, डॉ. सतीश देसाई, रवींद्र माळवदकर तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

Ajit Pawar | NCP Pune | पुणे राष्ट्रवादी कडून अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे राष्ट्रवादी कडून अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आक्रमकपणे गाजवल्यानंतर टीका -टिप्पणी व काही तुरळक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पहिल्यांदाच पुणे शहरात दाखल झाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

“एकच वादा.. अजितदादा…” ,”आम्ही कधीच राजकारण केले नाही धर्मांचे अन् जातीचे.., नेहमी हित पाहिले आहे महाराष्ट्राच्या मातीचे..” , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो “ अश्या प्रकारच्या घोषणांनी बारामती होस्टेलचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

“गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करण्याची एक मालिका सुरू आहे, यावेळी पुणे शहर भाजपमधील एकाही पदाधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचे आंदोलन केले नाही किंवा साधा निषेधही व्यक्त केला नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अशी भूमिका मांडल्यानंतर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अजितदादांच्या विरोधात आंदोलने केली यावर अजितदादांनी मी छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या एका धर्माच्या चौकटीत आणू इच्छित नाही , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत राहिले, सर्व जातीधर्मीय बांधवांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लाढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” याच नावाने संबोधनार, अशी ठाम भूमिका आदरणीय अजितदादांनी घेतली. या भूमिकेचे स्वागत करत, आदरणीय अजितदादांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचे हजारो कार्यकर्ते बारामती होस्टेल येथे अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी आलो आहोत” ,असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

तसेच यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “स्वराज्यरक्षक संभाजी महाराज” या नावाच्या १०००० स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले असून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर, घरांच्या दरवाजांवर व दुकाने- आस्थापनांवर अशा प्रकारचे स्टिकर्स लावण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्याबाबत आपली भूमिका रुजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.

प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर , बाळासासाहेब बोड़के , निलेश निकम , उदय महाले , शारदा ओरसे , गफूर पठान , रुपाली पाटील , विनोद पवार , संदीप बालवडकर, महेश हंडे , दिपक कामठे, रोहन पायगुडे , गुरूमीत गिल यांसह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते.

MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन | झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला | विरोधी पक्षनेते अजित पवार

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन | झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला | विरोधी पक्षनेते अजित पवार

पिंपरी चिंचवडमधील आमदार व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) (MLA Laxman Jagtap) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. जगताप यांचे अंत्यदर्शन दुपारी 2 ते सायं 6 या वेळी त्यांच्या राहत्या घरी चंद्ररंग… पिंपळे गुरव येथ असेल. तर अंत्यसंस्कार सायं 7 पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होणार आहेत.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit pawar) त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळी नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली होती.

आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. नंतरच्या काळात त्यांची तब्येत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्तीमुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तडफेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम पिंपरी-चिंचवड परिसरातील जनता कधीही विसरु शकणार नाही, अशा शद्बात अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली | “तडफदार नेतृत्व काळाने हिरावले”

“नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Ajit Pawar Vs BJP | अजित पवार यांच्या विरोधात पुणे भाजपचे आंदोलन | पवार यांनी माफी मागण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

चुकीच्या वक्तव्यासाठी अजित पवार यांनी माफी मागावी

| भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

वंदनीय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल (Chhaptrapati Sambhaji Maharaj) चुकीचे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City president Jagdish Mulik) यांनी केली.

मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली आज शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज खंडोजीबाबा चौकात तीव्र निदर्शने केली. या वेळी ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, ‘संभाजी महाराजांचे कर्तृत्व थोर आहे. त्यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणे विरोधी पक्षनेत्यांना शोभत नाही. शंभू राजांचा अपमान हा शिवछत्रपती घराण्याच्या कर्तृत्वाचा, माता जिजाऊंच्या संस्कारांचा आणि समस्त हिंदुजनांच्याअस्मितेचा अपमान असून, तो कदापि सहन केला जाणार नाही. अजित पवारांनी संपूर्ण देशाची माफी मागावी.’

युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, प्रतिक देसरडा, दिपक पवार, राजू परदेशी, सुनील शर्मा, यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrasekhar Bawankule Vs NCP | राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा |भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा

|भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुणे येथे केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गुन्ह्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे पुणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आ. माधुरी मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा आणि त्यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचा दिलेला इशारा याविषयी प्रतिक्रिया विचारली असता मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी हाताने धरून एका महिलेला बाजूला केल्याचे स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता उरली असेल तर त्यांनी आजच आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी नुकताच एका नेत्याने अपशब्द उच्चारला. भारतीय जनता पार्टी त्याचे कधीही समर्थन करणार नाही. पण त्यावेळी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओत दिसत असूनही समर्थन करतात. हा त्या पक्षाचा दुटप्पीपणा आहे.

त्यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य जितके चूक आहे तितकेच त्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करणेही चूक आहे. शहरात असे होत राहते, असे ज्यांनी म्हटले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. मा. देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील आहेत. ते गृहमंत्री असताना राज्यात दादागिरी चालू देणार नाही. भाजपा हे सहन करणार नाही.

Mahavikas Aghadi | Sinet Election | विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार | अजित पवार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार

| महाविकास आघाडी प्रणित “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल” च्या मुख्य प्रचार कचेरीचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या मुख्य निवडणूक कचेरीचा शुभारंभ आज महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या शुभहस्ते तर महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादासजी दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या माध्यमातून निवडणूक लढवत असून सर्व दहा ते दहा ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तरुण युवक व उच्च विद्याविभूषित उमेदवारांना संधी देण्यात आली असून पॅनलच्या जाहीरनाम्याचा जाहीरनामाचे प्रकाशन देखील या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की , पुणे विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही राज्याच्या शैक्षणिकदृष्ट्या एक महत्त्वाची निवडणूक मानली जाते. पुणे विद्यापीठाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा व समाजातील सर्वसामान्य बहुजन वर्गातील मुला-मुलींना तेथे उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे हीच सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलची माफक अपेक्षा आहे. विद्यापीठाच्या संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणे, विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या प्रमुख मुद्द्यांसह सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचे उमेदवार ही निवडणूक लढवित असून या पॅनलमधील सर्व उमेदवार हे उच्चविद्याविभूषित असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत त्यांना आपले पसंती क्रमांक ०१ चे मत देऊन त्यांना आपले प्रश्न सिनेट मध्ये मांडण्याची संधी नक्की द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड , कमलनानी ढोले पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, दिपाली धुमाळ,नगरसेवक विशाल तांबे, महेंद्र पठारे, रत्नप्रभा जगताप,नंदा लोणकर,सायली वांजळे, प्रदीप देशमुख,डॉक्टर सुनील जगताप,रुपाली ठोंबरे पाटील यांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Senate Election | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक | भाजप समर्थक विद्यापीठ विकास मंचचे ५  उमेदवार बिनविरोध | महाविकास आघाडीला धक्का मानला जातोय

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक | भाजप समर्थक विद्यापीठ विकास मंचचे ५  उमेदवार बिनविरोध

| महाविकास आघाडीला धक्का मानला जातोय

| विद्यापीठाच्या निवडणुकीत पहिलीच घटना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशातील विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटातून अधीसभेवर विद्यापीठ विकास मंचाच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

संस्थाचालकांच्या खुल्या गटातून डॉ. राजेंद्र विखे-पाटील, डॉ.अपूर्व हिरे, प्रा. विनायक आंबेकर, श्री. अशोक सावंत यांची आणि महिला गटात डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांचा बिनविरोध उमेदवारांत समावेश आहे.

विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

पांडे म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक झाली आहे. ही बिनविरोध होण्यासाठी विद्यापीठ विकास मंचच्या प्रयत्नांना यश आले आहे. डॉ गजानन एकबोटे,
डॉ. राजेंद्र विखे पाटील, डॉ अपूर्व हिरे, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. नितीन ठाकरे, डॉ संदीप कदम, अभाविप चेप्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले.

दरम्यान हा महाविकास आघाडी साठी धक्का मानला जातोय. कारण महाविकास आघाडी यासाठी जोरदार प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्यभर दौरे देखील होत आहेत. असे असताना विद्यापीठ विकास मंचने जोरदार धक्का दिला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस पहिल्यापासूनच या निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहे. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्याला हवे ते उमेदवार उभे करू दिले नाहीत, अशी कॉंग्रेस ची भावना आहे. त्यामुळे प्रचारात देखील कॉंग्रेस ने हिरीरीने भाग घेतलेला दिसत नाही.

दरम्यान विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल” च्या मुख्य निवडणूक कचेरीचा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादी भवन येथे करणार आहेत.

Chandrasekhar Bawankule | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय स्फोट झालेला दिसेल | चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय स्फोट झालेला दिसेल | चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?

पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला गृहमंत्री केले नाही अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड धुसफूस असून लवकरच आपल्याला राजकीय स्फोट झालेला दिसेल.

महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अठरा महिने मंत्रालयतही गेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत आणि आदित्य ठाकरे यांचे आंदोलन खोटारडे आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणाले की, माजी मंत्री आदित्य ठाकरे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या विषयावरून तळेगाव येथे करत असलेले आंदोलन म्हणजे खोटारडेपणा आहे. हे आंदोलन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करून जनतेची दिशाभूल करणे आहे.

आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प उभारण्यासाठी केलेला सामंजस्य करार दाखवावा आणि त्या प्रकल्पाला तळेगावमध्ये नेमका कोणता भूखंड दिला त्याचा त्यांच्या सरकारच्या काळातील आदेश दाखवावा, असे आव्हान मा. बावनकुळे यांनी दिले.

पीएफआयवरील कारवाईनंतर पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा काहीजणांनी दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करून मा. बावनकुळे म्हणाले की, अशा घोषणा देणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. सरकारने या विषयाची गंभीर दखल घेतली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करतील याची आपल्याला खात्री आहे.

राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रवास करत असून केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत. त्याप्रमाणे बारामती मतदारसंघाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आढावा घेतला. बारामती मतदारसंघात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले पाहिजे, असा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.

शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला परवानगी मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलण्यासारखे काही नसल्याने ही केवळ टोमणे सभा होईल आणि आपल्यासह अनेक नेत्यांवर वैयक्तिक चिखलफेक होईल. आतापर्यंत फेसबुक लाईव्हमध्ये असेच होत होते. त्यामुळे आता लोक उद्धव ठाकरे यांची गंभीर दखल घेत नाहीत.

Monsoon Session | विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

शेतकऱ्यांच्याप्रश्नी सरकार गंभीर नाही; शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही

पावसाळी अधिवेशात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणार
-विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई| “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं राज्य सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवून विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले आहे, हे सरकार अद्याप विधीमान्य नाही. सरकारकडून विकासकांना स्थगिती देऊन राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचं काम सुरु आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्यातील २८ जिल्ह्यांत अतिवृष्टी, पूरस्थितीने हाहा:कार माजला असताना, सव्वाशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असताना, राज्यातील शेतकरी मदतीअभावी आत्महत्या करत असताना, राज्य सरकारकडून सामान्य जनतेला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. ‘एनडीआरएफ’चे मदतीचे निकष कालबाह्य झालेले असताना केवळ त्याच्या दुप्पट मदत देण्याची सरकारची घोषणाही जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. राज्यात महिला, बालिकांवर अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असताना सत्ताधारी पक्षातले सदस्य चिथावणीखोर भाषा वापरुन लोकांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून सरकारला सत्तेचा दर्प चढला आहे. ज्या सरकारची विश्वासार्हता आणि वैधता संदिग्ध आहे, अशा सरकारच्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे लोकशाही व्यवस्था आणि राज्यातील जनतेशी प्रतारणा ठरेल,” असा घणाघाती आरोप करुन पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्यावतीने बोलविण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्यावतीनं बहिष्कार घालण्यात आल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

मुंबईतील विधानभवनाच्या वार्ताहरकक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सर्व विरोधी पक्षांच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल परब, आमदार भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित होते. तत्पूर्वी विधानभवनातीव विरोधी पक्षनेत्यांच्या समिती सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नाना पटोले, अनिल परब, अजय चौधरी, रईस शेख, बाळाराम पाटील, कपिल पाटील, सुनील प्रभू, सुरेश वरपूडकर, अनिल पाटील, सचिन अहिर, मनिषा कायंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला व त्यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

विरोधी पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात अतिवृष्टीने 15 लाख हेक्टरवरील पीकांचे नुकसान झालेले असताना, अतिवृष्टीग्रस्त भागात विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलं असताना, चहापान कार्यक्रम टाळून केवळ चर्चा करणं संयुक्तिक ठरलं असतं. परंतु ही संवेदनशीलता सरकारने दाखविलेली नाही. दि. 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून तब्बल 40 दिवस सत्ताधाऱ्यांनी राज्याला मंत्रिमंडळ दिलं नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊ शकला नाही. महाराष्ट्रासारखं देशातलं सर्वात प्रगत राज्य वाऱ्यावर सोडण्याचं काम आपण केलं.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याची घोषणा घाईघाईनं करुन जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असून त्यात अनेक घटकांचा समावेश नाही. दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे ही घोषणा फसवी आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री पाच वेळा दिल्लीला जाऊन आले, परंतु महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची किंवा राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्याची मागणी केंद्र सरकारकडे त्यांनी केली नाही.

दिल्ली भेटीतील ‘नीती’ आयोगाच्या बैठकीवेळचा फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो फोटो महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आहे. फोटो पाहिल्यानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांनी विचारलेला ‘एकनाथ कुठे आहे…?’ हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडला आहे. मा. मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून सन्मान ढासळावा एवढा महाराष्ट्र निश्चितंच लेचापेचा नाही, परंतु आमचे मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्राचा सन्मान राखू शकले नाहीत, याचे दु:ख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीचा अभिमानास्पद इतिहास रचलेल्या महाराष्ट्राला हे दु:ख अधिक बोचणारं आहे. यापुढे तरी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही, याची काळजी आपण घ्यावी.

महाराष्ट्राच्या अभिमानाला धक्का लावण्याचं काम आपल्याकडून सातत्यानं घडत आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या स्मारक विकासाच्या कामाला आपण स्थगिती दिली. वंचित – शोषितांच्या वेदनांना आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच 1 ऑगस्टला साजरी झाली. महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समिती स्थापन करून 7 खंड प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता, त्यापैकी 2 खंड प्रकाशितही झाले. परंतु, सरकारमध्ये आल्याआल्या कोणताही विचार न करता आपण ही समितीही बरखास्त केली, प्रकाशनाचे काम रखडवले. छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊं माँसाहेब महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहेत. अशा महामानवांच्या स्मारकांच्या विकासकामांना आणि समित्यांना स्थगिती देणं, पुनर्विचाराचा निर्णय करणं, हे निषेधार्ह आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. सन्माननीय ठाकरे साहेबांनी अंतिम टप्प्यात घेतलेले अनेक निर्णय शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांना गती देणारे होते. त्या निर्णयप्रक्रियेत आपलाही सहभाग होता. असं असूनही, मंत्री म्हणून स्वत:च घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्री झाल्यानंतर स्थगिती देण्याचा प्रकार अनाकलनीय, राजकीय हेतूने प्रेरित व विकास कामात अडथळा निर्माण करणारा आहे. राज्याचे मा. मुख्यमंत्री कुणाच्यातरी दबावाखाली असल्याने लोकोपयोगी निर्णय, विकासयोजनांना स्थगिती देत आहेत, राज्याच्या विकासप्रक्रियेला खीळ घालत आहेत, ही लोकभावना आहे. त्याबद्दल लोकप्रतिनिधी व जनतेत आपल्याबद्दल तीव्र रोष आहे. मुंबईतील बीकेसी येथील मध्यवर्ती मोक्याची जागा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नाममात्र किमतीत देण्याचा आपला निर्णय अशाच प्रकारचा व राज्याच्या हितांशी प्रतारणा करणारा आहे. मुंबईतील मेट्रो-सहाच्या कारशेडसाठी आपण आता कांजूरमार्गची जागा मागितली आहे. मेट्रो-तीन साठी आरे आणि मेट्रो-सहा साठी कांजूरमार्ग हा घोळ वाढवून पर्यावरणाचं आणि आता राज्याचं हजारो कोटींचं नुकसान करण्यास आपलं सरकार जबाबदार आहे.

आपण मुख्यमंत्री असलेल्या दोन सदस्यीय मंत्रिमंडळाने 40 दिवसात 750 शासननिर्णय निर्गमित केले. मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवून मुख्यमंत्री म्हणून आपण, केवळ एका व्यक्तीने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे सगळे निर्णय घेतलेत. राज्याचे धोरणात्मक निर्णय केवळ एका व्यक्तीने घेण्याची कृती सामुहिक निर्णयप्रक्रियेला छेद देणारी, लोकशाही व्यवस्था, नैतिकतेचे धिंडवडे काढणारी आहे. आपल्या सरकारने सत्तास्थापनेपासून शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, व्यापारी, उद्योजक, महिला, विद्यार्थी, युवक या समाजघटकांबद्दल असंवेदनशीलता दाखवली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी कमी झाल्यानंतरही त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याबाबत आपल्याकडून कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत. ही अकार्यक्षमता, असंवेदनशीलता अक्षम्य आहे.

महोदय, विधानसभेचे विरोधी पक्षनेते व अन्य नेत्यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचे दौरे केले. या दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्तांचं दाहक, वेदनादायी वास्तव समोर आलं. ते वास्तव आणि करावयाच्या उपाययोजनांबद्दलचे सविस्तर निवेदन मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री महोदयांना देऊनही अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अपेक्षित निर्णय घेण्यात आले नाहीत. अतिवृष्टीने झालेले नुकसान लक्षात घेऊन विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यात इतर भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार व फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत तत्काळ द्यावी. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पांरपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता शैक्षणिक शुल्क सरसकट माफ करावे, बुडालेल्या मजूरीपोटी शेतमजूरांना एकरकमी अनुदान द्यावे, आदीवासी बांधवांना खावटी अनुदान तत्काळ द्यावे, शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी आर्थिक मदतीसह आवश्यक उपाययोजना कराव्यात, ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’च्या प्रचलित निकषांच्या पलिकडे जावून मदत करावी, अशा मागणी आपणास भेटून निवेदनाद्वारे केली होती. परंतु आपण ‘एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत देण्यात येईल’, अशी अवघ्या एका ओळींची घोषणा करुन आम्ही केलेल्या सर्व मागण्या दुर्लक्षित केल्या. आम्ही दिलेल्या निवेदनातील सर्व मागण्या मान्य होऊन त्यानुसार तात्काळ अतिवृष्टीग्रस्तांना, शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करण्यात यावी, अशी पुनर्मागणी करीत आहोत.

महोदय, अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. वीजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडीत आहे. शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटपाचे उद्दीष्ट निम्म्यानेही पूर्ण झालेले नाही. खरीप पिकांवरील रोगगाईचा प्रश्न गंभीर आहे. मराठवाड्यात गोगलगायींनी सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. विदर्भात मिलिपिड किटकांमुळे शेतकरी संकटात आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत ई-पीकपाहणी व ऑनलाईन पद्धतीच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. विमायोजनेच्या लाभांपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. नाफेडकडून कांदाखरेदी बंद झाल्याने कांद्याचे भाव पडले व त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आहे. या सर्वांना राज्य सरकारकडून अपेक्षित मदत तातडीने उपलब्ध करण्यात यावी.

नगराध्यक्ष व सरपंच यांची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय लोकशाहीविरोधी व अव्यवहार्य असल्यानं त्याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे. राज्यातील नागरिक पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी, पीएनजी, वीजेच्या दरवाढीनं हवालदिल आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्ष म्हणून आपण राज्य सरकारकडे इंधनावरील करात पन्नास टक्के कपात करण्याची मागणी करत होता, परंतु सत्तेवर आल्यानंतर अवघी दोन ते तीन टक्के करकपात करुन आपण नागरिकांना फसवलं आहे. महागाई वाढवण्याचं पाप आपल्याकडून सातत्यानं घडत आहे. तांदूळ, डाळी, पीठ, दुध, दही, पनीरसारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय व आपण त्याला न केलेला विरोध हा राज्य सरकारची अगतिकता, संवेदनाशून्यता अधोरेखित करणारा आहे. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाला विरोध करण्याचं धाडस आपण दाखवू शकला नाही, याचा खेद आहे.

राज्यातील जनता महागाईने पोळली असताना युवकांच्या वाढत्या बेरोजगारीचा प्रश्नही तितका गंभीर आहे. राज्य सरकारमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने व्हावी. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी बांधवांच्या आरक्षणाचा मार्ग खुला झाला असला तरी आरक्षणाची टक्केवारी कमी झाली आहे. याचा तातडीने पुनर्विचार झाला पाहिजे. मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेला लढा ऐतिहासिक आहे. मराठा समाजाला त्यांचा न्याय्य हक्क, आरक्षणाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावानं मिळावा. मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासासाठीच्या योजनांना निधी देऊन त्या अधिक गतिमान करण्यात याव्यात.

टीईटी परीक्षा गैरव्यवहारात सत्तारुढ गटातील नेत्याच्या मुलांवर गंभीर आरोप होत असताना त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एका निरपराध मुलीवर अत्याचार व तिच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप असलेली व्यक्ती पुन्हा मंत्रिमंडळात आली आहे. विरोधी पक्षात असतांना ज्या तत्कालिन मंत्र्यांवर आपण सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा अनेकांना आपण मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मंत्रिमंडळातील नव्या 18 पैकी 15 मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. मंत्रिमंडळातील मंत्री भ्रष्ट नाहीत की आपण त्यावेळी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे होते, याचा खुलासा आपल्याकडून होणे अपेक्षित आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर असलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

भ्रष्टाचार व भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण, प्रोत्साहन देण्याचे आपल्या सरकारचे धोरण दिसते. भ्रष्टाचार, अकार्यक्षमतेमुळे निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा, प्रशासनात बेदिली, अनागोंदी निर्माण करणारा आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्रीच रात्री-बेरात्री रुग्णालयांना भेट देत असतील, मध्यरात्री ध्वनीक्षेपक लावून जाहीर सभा घेत असतील, स्वत:च्याच नावाच्या अनधिकृत बागेच्या उद्घाटनाला जाणार असतील, तर या राज्यात कायदे कोण पाळणार? कायद्याची भिती कुणाला वाटणार? पोलिस कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ? राज्यातलं पोलिस दल आज हतबल दिसत आहे.

गोंदिया जिल्ह्यात एका महिलेवर दोन वेळा सामुहिक बलात्कार होतो. पुण्यात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्तारुढ पक्षाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. राज्यात गुंडगिरी वाढली आहे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मात्र 50% लोकसंख्या असणाऱ्या महिलांना आपल्या मंत्रिमंडळात स्थानच दिलेले नाही. कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. त्याचबरोबर राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचाही बोजवारा उडालेला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच राज्यात लेप्टो, मलेरिया व स्वाईन प्लूचे रुग्ण दिवसेंगणिक वाढत आहेत. राज्यात या सारख्य महत्वाच्या खात्यांना मंत्री नव्हते. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याची नामुष्की सरकारवर आली होती, त्यामुळे जनतेला कुणी वाली राहिलेला नाही.

आपल्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रविरोधी आहे. राज्याच्या हिताचे प्रकल्प, विकासयोजनांना स्थगिती दिली जात असताना गुजरातच्या हिताचे निर्णय धडाधड होत आहेत. गुजरातसाठी महत्वाच्या अशा बुलेटट्रेन प्रकल्पाला बीकेसीतील मध्यवर्ती तसंच पालघर येथील दुग्धव्यवसाय विभागाची जागा देताना आपण दाखवलेला वेग बुलेटट्रेनच्या वेगालाही लाजवणारा आहे.

महोदय, राज्याच्या मा.महामहिम राज्यपाल महोदयांकडून महाराष्ट्राबद्दल, महापुरुषांबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद निर्माण करुन सामाजिक अस्थैर्य निर्माण करण्याचा, राजकीय वातावरण बिघडवण्याचा, कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मा.महामहिम राज्यपाल महोदयांची वक्तव्ये सरळसरळ महाराष्ट्रविरोधी, महाराष्ट्रवासियांच्या भावना दुखावणारी आहेत. ही वक्तव्ये सहन करणं शक्य नाही. महामहिम राज्यपाल महोदयांच्या वक्तव्यांची पाठराखण करण्याचा आपल्याकडून होत असलेला प्रयत्नही तितकाच निषेधार्ह असून अशी वक्तव्ये आणि त्यांची पाठराखण सहन केली जाणार नाहीत, असा इशारा देण्यात येत आहे.
महोदय, राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी व राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. सबब मा. मुख्यमंत्री महोदयांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकत आहोत, असे पत्रात म्हटले आहे.

Pune DCC Bank | विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा मोठा निर्णय

Categories
Breaking News Commerce Education Political पुणे महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा मोठा निर्णय

| अजित पवार यांची माहिती

सध्या देशात महागाई प्रचंड वाढत आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Pune Cooperative Bank) संचालक बोर्डानं मोठा निर्णय घेतलाय. बोर्डानं शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यमांशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘देशात महागाई खूप वाढत आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं संचालक बोर्डानं शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.’

ते पुढं म्हणाले, ‘आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 30 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. याआधी हे कर्ज 15 लाख रुपये होते. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्यासाठी 40 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. याआधी हे कर्ज 25 लाखांपर्यंत मिळत होते.’ शिवाय, गृहकर्जाची मर्यादा 75 लाख असेल आणि व्याज दर 8 टक्के असणार आहे. याआधी ते व्याज 9 टक्के होते. जिल्हा बँकेकडून पगारदारांना देण्यात येणारे कर्ज आता 20 वीस लाख रुपयांपर्यंत देणार आहे. आधी ही मर्यादा 15 लाख होती. वीस लाखांहून अधिक रक्कमेची ज्या संस्थाना अडचण असेल अशा 13 तालुक्यातील 109 संस्थाना नऊ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे, असंही त्यांनी जाहीर केलं.

वाहनाच्या कर्जाबाबत देखील त्यांनी निर्णय घेतलाय. वाहनासाठी कर्ज मर्यादा दोन लाखांहून पाच लाख करण्यात आलीय. तर, व्याजदर साडेदहा टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आहे. नोटबंदीच्या कालावधीतील 22 कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेने अद्याप स्वीकारलेले नाहीत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात खटला देखील सुरुय. राज्यातील वेगवेगळ्या बॅंकांची अशी रक्कम नव्वद ते 100 कोटी रुपये इतकी आहे, या सगळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. बोर्डानं घेतलेल्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.