Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी

 

 

Jharkhand Congress | भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली तीनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे, तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही मोदी की गॅरंटी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा घणाघाती दावा भाजपचे  माधव भांडारी  (Madhav Bhandari)  यांनी पत्रकार परिषदेत केला.

झारखंडमध्ये काँग्रेसच्या एका संसद सदस्याच्या घरात ही कोट्यवधींची रोकड सापडली, तर या हिशेबाने काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरी आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या गांधी कुटुंबाकडे किती संपत्ती असेल? याचा हिशेब जनतेने करावा असेही भांडारी म्हणाले.या हिशेबानुसार, गांधी परिवार हा जगातील सर्वात भ्रष्ट परिवार ठरेल, असा आरोपही त्यांनी केला. (BJP Pune)

जेथे जेथे लोकप्रतिनिधी काँग्रेसचा आहे, तेथे तेथे भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे, आणि जेथे भाजप आहे, तेथे स्वच्छ कारभाराची गॅरंटी आहे, असेही श्री. भांडारी म्हणाले. काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांना जेथे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण मिळते, ते केंद्रस्थान आता देशाला माहीत झाले आहेच, तर त्याचे नाव गांधी करप्शन सेंटर असे ठेवावे, असा उपरोधिक सल्लाही श्री. भांडारी यांनी दिला. या परिवाराकडूनच काँग्रेसींना भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण दिले जाते का, असा सवालही त्यांनी केला. या सेंटरमधून प्रशिक्षण घेतलेल्यांच्या काळ्या कमाईचा नेमका किती हिस्सा गांधी परिवाराकडे जातो त्याचा हिशेब द्या, अशी मागणी करून ते म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याची गॅरंटी देणाऱ्या मोदी सरकारने आता या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्याखेरीज स्वस्थ बसू नये. काँग्रेसच्या एका खासदाराकडे कपाटे ओसंडू वाहतील एवढा काळा पैसा असून ज्यांच्या कृपेने हे नेते बनले त्या गरीब जनतेचे डोळे या संपत्तीने दिपून गेले असतील.

भ्रष्टाचाराचे भांडे फुटू लागल्यामुळेच सारे भ्रष्ट नेते इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आले असून एकएक प्रकरण बाहेर पडू लागल्यामुळे आता ईडी, सीबीआय, आयटीसारख्या संस्थांच्या नावाने सामूहिक रडगाणे सुरू झाले आहे. झारखंडमधील सत्तारूढ पक्षाच्या एका खासदाराचा हा घोटाळा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या डोळ्यादेखत उघडकीस आल्याने आता त्यांना क्षणभरही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या सत्तेला खडे बोल सुनावले. इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आलेल्या सर्वांचा इतिहास भ्रष्टाचाराचाच आहे. बेंगलुरूमध्ये काँग्रेसच्या एका निकटवर्तीच्याच घरी ४२ कोटींचे घबाड सापडले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील पार्थ चटर्जी यांच्या घरात ५० कोटींची रोकड व कोट्यवधींचे सोने सापडले होते, तर अरविंद केजरीवाल यांचा इमानदार साथीदार सत्येंद्र जैन याच्याकडेही सोन्याची नाणी व कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्यावर केजरीवाल यांनी मौन धारण करून भ्रष्टाचार लपविण्याची धडपड चालविली आहे, असे ते म्हणाले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर असताना उघडकीस आलेल्या महादेव ऑनलाईन जुगारातील हप्तेखओरी प्रकरणात खुद्द मुख्यमंत्र्यांचेच हात बरबटले होते, म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसवून मोदींच्या गॅरंटीवर गाढ विश्वास व्यक्त केला, असे श्री. भांडारी म्हणाले. काँग्रेस आणि हेमंत सोरेन यांच्याठगबंधन सरकारने मनरेगामध्ये साडोपाचशे कोटी, कोळसा खाणींच्या व्यवहारात दीड हजार कोटी, अवैध खाण उत्खननातून दीड हजार कोटी, ग्रामीण विकास निधीतून दीड हजार कोटी, जमीन घोटाळ्यातून तीन हजार कोटींच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदी की गॅरंटी ही केवळ निवडणूक प्रचाराचा मुद्दा नाही. भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या मोदी सरकारच्या गॅरंटीने कांग्रेसच्या भ्रष्ट कारभाराच्या मुळावर घाव घालण्यास सुरवात केली असून इंडिया आघाडीतील एकामागोमाग एक भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या काळ्या कारभाराचा हिशेब जनतेसमोर द्यावाच लागणार आहे असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला.

Madhav Bhandari : पंतप्रधान संग्रहालयाला काँग्रेसचा विरोध दुर्दैवी

Categories
Political पुणे

पंतप्रधान संग्रहालयाला काँग्रेसचा विरोध दुर्दैवी

पुणे : ‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथे तीन मूर्ती भवन येथे उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला काँग्रेस पक्षाने केलेला विरोध हा त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या सरंजामी वृत्तीचा निदर्शक आहे. देश बदलला आहे याची जाणीव ठेऊन काँग्रेस पक्षाने आता तरी भारत हा कोण्या एकट्याची जहागीर असल्याची भावना सोडावी,’’ असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
 भांडारी म्हणाले, ‘‘पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे तीन मूर्ती भवन येथे वास्तव्य होते. तेथे देशाचे पंतप्रधान म्हणून आतापर्यंत काम केलेल्या सर्व नेत्यांच्या कार्यांचे स्मरण करणारे संग्रहालय उभारले आहे. येथे केवळ भाजपचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण केलेले नाही. तर, काँग्रेससह अन्य पक्षांच्या माजी पंतप्रधानांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख आहे. त्यामुळे काँग्रेसने संग्रहालयावर टीका करून ते अन्यत्र उभारायला हवे होते, असे म्हणणे दुर्दैवी आहे.’’‘‘देशात लोकशाही असली तरी प्रत्यक्षात काँग्रेसने आणि त्यातही नेहरू गांधी घराण्याने देशावर राज्य करत राहावे, अशी काँग्रेस पक्षाची मानसिकता आहे. भारत बदलला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत जनतेने काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्याही जागा दिल्या नाहीत. आता तरी काँग्रेसने इतर पक्षातील नेत्यांचा आदर करावा,’’ असे त्यांनी नमूद केले.

Madhav Bhandari : Nawab Malik : नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा ‘ मुख्यमंत्री दाखवणार का?

   : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

: राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

पुणे : बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा  महाराष्ट्राचा अपमान असून  उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरी बाणा  दाखवणार का , असा सवाल  भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  माधव भांडारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला . दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप हा देशद्रोहाएवढाच गंभीर असल्याने असा ठपका असलेला मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिमांच्या अनुनयाकरिता देशद्रोही दाऊदच्या हस्तकास अभय देण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल असा इशाराही श्री. भांडारी यांनी दिला. नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे ‘ईडी’कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या दाऊद इब्राहीमने १९९२ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेत देशाविरुद्धचा सर्वात घातक दहशतवादी कट आखला, त्याच दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास विरोध करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लांगूलचनाच्या राजकारणाची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल. अशा देशद्रोही कारवायाना मदत केल्याचे पुरेसे पुरावे ईडीकडे असल्याचे सांगण्यात येत असतानाही मलिक यांना मंत्रिपदावर ठेवण्याच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण कणाहीन राजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीकाही  केली.

१९९२-९३ च्या बॉम्बस्फोटात दाऊदच्या हल्ल्यापासून मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आज मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या हव्यासापोटी दहशतवादी दाऊदच्या हस्तकास वाचविण्याचा घातक खेळ करत आहे, असा आरोप करून, ठाकरे यांच्या कणाहीन राजकारणामुळे महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर आता मलिक यांची हकालपट्टी करावी, असे ते म्हणाले.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर विधिमंडळात भ्रष्ट पोलीस आधिकारी सचिन वाझे याची पाठराखण केली होती. त्यानंतर खंडणीखोर अनिल देशमुख यांनाही पाठीशी घालण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट, व्यभिचारी आणि लाचखोर, खंडणीखोर सहकाऱ्यांना वाचविताना ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्यास मूठमाती दिली. आता मतांच्या राजकारणासाठी देशद्रोही कारवायांतील सहभागाचा आरोप असलेल्या नवाब मलिक या मंत्र्याकरिता आपला कणा झिजविण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे अनुयायी असलेल्या कडवट शिवसैनिकांच्या भावनांची थट्टा चालविली आहे, असा आरोप भांडारी यांनी केला.

नवाब मलिक या मंत्र्याने दाऊदच्या कारवायांसाठी बेनामी पद्धतीने मालमत्ता हडप करून गरीब कुटुंबांची फसवणूक केली असून हा पैसा दाऊदकडे वळविल्याचा आरोप आहे. दाऊदच्या दहशतवादी कारवायांना आर्थिक साह्य करण्याच्या अशा गुन्हेगारी व देशद्रोही कारवायांना सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने संरक्षण द्यावे हा महाराष्ट्राच्या कोट्यवधी नागरिकांच्या सुरक्षिततेशी सामूहिक खेळ आहे. अशा खेळात सहभागी होऊन राज्याच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या जनताविरोधी सरकारच्या निषेधार्थ भाजप संपूर्ण शक्तिनिशी लढा देईल, असा इशाराही  भांडारी यांनी दिला.