PMC Budget Dispute : भाजपने सुरु केली अंदाजपत्रक मांडण्याची तयारी!  : प्रकल्पीय तरतुदी देण्यासाठी नगरसेवकांना सूचना 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

भाजपने सुरु केली अंदाजपत्रक मांडण्याची तयारी!

: प्रकल्पीय तरतुदी देण्यासाठी नगरसेवकांना सूचना

पुणे : स्थायी समितीच्या अधिकाराबाबत महापालिकेने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे. हे मार्गदर्शन मिळण्या अगोदरच इकडे सत्ताधारी भाजपने मात्र अंदाजपत्रक मांडण्याची तयारी सुरु केली आहे. सभागृह नेते कार्यालयातून आणि स्थायी समिती अध्यक्षानी नगरसेवकांना प्रकल्पीय तरतुदी सुचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सत्ताधारी नगरसेवकांनी देखील पत्र देण्यास सुरुवात केली आहे. मात्र भाजपच्या या लगबगीवरून आता विरोधी पक्षांनी टीकेचा भडीमार सुरु केला आहे.
महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्यानंतरही स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहते, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केला आहे. हा पेच सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे पत्र पाठवून काय निर्णय घ्यावा याबद्दल मार्गदर्शन मागितले आहे. निर्णयाचा चेंडू आता नगरविकास खात्याकडे टोलवला आहे.

पुणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे, १५ मार्च पासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून कारभार हातात घेणार आहेत. असे असताना गेल्या आठवड्याभरापासून महापालिकेची स्थायी समिती बरखास्त होणार की कायम राहणार यावरून दोन्ही बाजून चर्चा झडत आहे.

मात्र दुसरीकडे भाजपने अंदाजपत्रक मांडण्याची तयारी चालवली आहे. दरवर्षी अंदाजपत्रक सादर करण्या अगोदर नगरसेवकांना प्रकल्पीय तरतुदी साठी प्रस्ताव मागवले जातात. त्यानुसार स्थायी आणि सभागृह नेते कार्यालयातून नगरसेवकांना प्रस्ताव देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान शनिवारी देखील पालिकेतील नगरसचिव कार्यालय सुरु होते. यावेळी काही सत्ताधारी नगरसेवकांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत.

असे असले तरी मात्र बजेटचे पुस्तक स्थायी समिती अध्यक्ष कधी तयार करणार आणि बजेट कधी सादर करणार, याबाबत मात्र खुलासा होऊ शकलेला नाही. तसेच विरोधी पक्षांना देखील टीका करण्याचा मुद्दा मिळाला आहे.

Leave a Reply