Jumbo Covid Centre : २८ फेब्रुवारीनंतर जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

२८ फेब्रुवारीनंतर जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय

:पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक

:शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे प्रमाणात नियंत्रणात येत असल्याने शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करण्यात यावे आणि जम्बो कोविड रुग्णालय येत्या २८ फेब्रुवारीनंतर बंद करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले, जम्बो कोविड रुग्णालय बंद केल्यानंतर तेथील परिसर पूर्ववत करण्यात यावा. रुग्णालयातील साहित्य पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात उपयोगात आणले जावे. कोविड संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. उद्यान आणि दुकानांच्या वेळा पूर्वीप्रमाणे करण्यात याव्या. ग्रामीण भागात ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना वर्धक मात्रा देण्याचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत .राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात गेल्या ७ दिवसात नवीन रुग्णांच्या संख्येत ५१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणात ८५ लाखाने, तर १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणात ४९ हजाराने वाढ झाली. जिल्ह्याने १ कोटी ७२ लक्ष लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ५८ टक्के व्यक्तींना लशीची वर्धक मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीस आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सह पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply