Voter Awareness | निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती

Categories
Breaking News cultural Education social पुणे महाराष्ट्र
Spread the love

निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती

पुणे| भारत निवडणूक आयोगाने मतदार सुविधाकेंद्रीत निवडणूकांवर भर देण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्यादृष्टीने २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आदींसाठी मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देत आहेत.

सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी ८० वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकारी जागृती करत आहेत.

८० वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या तसेच दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी अशा मतदारांकडून मतदार नोंदणी करणारे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून ‘नमुना १२ डी’ नमुना अर्ज भरुन घेत आहेत.

त्याशिवाय दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचा समावेश असलेले मतदान यंत्र (ईव्हीएम), घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, आदीसंबंधाने चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रबोधन करण्यात आल्याची माहिती समन्वयक अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.

चिंचवड मतदारसंघात किर्तनाच्या माध्यमातून मतदान जागृती

जिल्ह्यातील 205-चिंचवड विधानसभा मतदारसंघात शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांना मतदान करण्यासाठी आग्रह धरावा यासाठी किर्तनाच्या माध्यमातून त्यांना मतदानाचे महत्व समजविण्यात आले.

श्री आनंद विद्या प्रसारक मंडळाच्या संचेती शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध कीर्तनकार श्री गजानन व्हावंल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सोप्या भाषेत आणि विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीसाठी मतदानाचे असलेले महत्व समजावले. विद्यार्थ्यांना मतदानासाठी कुटुंबातील पात्र मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याची शपथ देण्यात आली. विविध शाळांमधून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू रहाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी निवडणूक नायब तहसीलदार श्वेता आल्हाट यांनी मतदान जागृती उपक्रमाविषयी माहिती दिली. विद्यार्थीदेखील मतदान जनजागृतीत सहभागी होऊन लोकशाळी बळकट करण्यासाठी योगदान देऊ शकतात असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक सुरेश मोरे, शिक्षण अनिल शिंदे, उद्धव वाघमारे, क्रीडा शिक्षक हनुमंत सुतार आदी उपस्थित होते.