Marathi Language University | मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र
Spread the love

Marathi Language University | मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन

| उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई | रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठासाठी (Marathi Language University) विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विधेयक मंजूर करून पुढील वर्षीच्या जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज मंत्री श्री. पाटील यांच्या दालनात मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचा अहवाल सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सदस्य प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. अविनाश आवलगावकर, श्री. कारंजेकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन शासनाने समितीचे गठन केले होते. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचे ऐतिहासिक काम मार्गी लावल्याबद्दल त्यांनी समितीच्या सदस्यांचे आभार मानले. तसेच या मसुदा समितीचे रूपांतर मराठी भाषा विद्यापीठाच्या सल्लागार समितीत करावे.

मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समितीचे यापुढेही सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त करीत मंत्री श्री. पाटील म्हणाले की, ऋद्धिपूर येथे लीळा चरित्र लिहिण्याबरोबरच मराठी भाषेतील ग्रंथ निर्मितीचे केंद्रही राहिले आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम होतील याचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा वेगळेपण केंद्रस्थानी ठेऊन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी सांगितले.

०००