Mother Support Group | मातांकडून मिळाला गर्भवतींना कानमंत्र | मदर सपोर्ट ग्रुपची मुहुर्तमेढ

Categories
Breaking News cultural social पुणे
Spread the love

मातांकडून मिळाला गर्भवतींना कानमंत्र | मदर सपोर्ट ग्रुपची मुहुर्तमेढ

|उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलचा उपक्रम

गर्भवती असताना कामानिमित्ताने दररोज करावा लागणारा ६० ते ७० किलोमीटरचा प्रवास.., हार्मोन्सच्या बदलामुळे होणारी चिडचिड.., नवव्या महिन्यात अचानक वाढलेली शुगर…, काही कारणाने करावा लागलेला गर्भपात आणि त्यानंतर झालेला  मानसिक त्रास आणि त्यावर यशस्वीपणे केलेली मात असे अनुभव कथन करत गर्भावस्थेत कधीही खचून न जाता प्रत्येक समस्येला धैर्याने सामोरे जात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असा मोलाचा सल्ला महिला भगिनींनी गर्भवतींना दिला. निमित्त होते ते मदर सपोर्ट ग्रुपच्या कार्यशाळेचे!

बाळाला दूध पाजताना येणाऱ्या अडचणी, प्रसूती नैसर्गिक की सिझेरियन, डिलिव्हरीनंतर येणारे नैराश्य, वंध्यत्वावरील उपचारानंतरची प्रसूती, अशा विविध प्रश्नांबाबत मातांना मार्गदर्शन करण्यासाठी मदर सपोर्ट ग्रुप सुरू करण्यात आला आहे. उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या पुढाकाराने हा ग्रुप स्थापन करण्यात आला असून अशा पद्धतीचा हा पहिलाच ग्रुप ठरला आहे. या ग्रुपचा पहिला मेळावा नुकताच पार पडला. यामध्ये आई होताना आलेल्या विविध अडचणी आणि त्यावर केलेली मात याबाबत उपस्थित महिलांनी आपले अनुभव सांगितले.
नवी दिल्ली येथील ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. अशोक खुराना,  हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रमोद उमरजी, डॉ. मुक्ता उमरजी, डॉ. चिन्मय उमरजी, डॉ. केतकी उमरजी, प्रियांका उमरजी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. संभाजी महाडिक, चाइल्ड सर्जन डॉ. विशेष दीक्षित, स्त्री मनोरोग तज्ज्ञ डॉ. सविता गायकवाड, डॉ. प्रणाली काकडे, डॉ. श्रृती माहेश्र्वरी, श्वेता वाटवे, टीम सृजनम यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. सुलभ प्रसूतीसाठी ‘जिवंती’ यासह अन्य सपोर्ट ग्रुप यावेळी स्थापन करण्यात आले.
या कार्यशाळमध्ये सहभागी झालेल्या मातांनी आपले अनुभव सांगताना विविध गुणदर्शन देखील सादर केले.  यामध्ये नृत्य, गाणे, रॅम्प वॉक यांचा समावेश होता.

पेशंटला सर्वात अधिक दिलासा हा त्रास अनुभवलेली व्यक्तीच देऊ शकते. या उद्देशानेच मदर्स सपोर्ट ग्रुप ची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक दोन महिन्यांनी या ग्रुपची बैठक होणार आहे. हे काम विनामूल्य स्वरूपात केले जाणार आहे. पुण्याबाहेरील मातांना यामध्ये सहभागी होता यावेत, यासाठी ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतली जाणार आहे. या सपोर्ट ग्रुपची मुहुर्तमेढ यानिमित्त रोवली गेली आहे.

डॉ. चिन्मय उमरजी, संचालक,
(उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल)