Pune RTO | दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

Categories
Breaking News social पुणे
Spread the love

Pune RTO | दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

Pune RTO | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (Pune Regional Transport Office) येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी (Two Wheeler) नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी (Four Wheeler) राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Pune RTO)
नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह ५ सप्टेंबर  रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) ६ सप्टेंबर  रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.
दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३०  ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी ७  सप्टेंबर रोजी दुपारी २.३०  वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.
अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर न केल्यास राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज बाद ठरविण्यात येणार असल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
——
News Title | Pune RTO | Attractive numbers in the two-wheeler series can be reserved for four-wheelers by paying three times the fee