Hemant Rasne : PMC : सदाशिव पेठ-शनिवार पेठ  प्रभागाला एकक मानून  विकासकामे पूर्ण करणार : हेमंत रासने

Categories
PMC पुणे
Spread the love

सदाशिव पेठ-शनिवार पेठ  प्रभागाला एकक मानून  विकासकामे पूर्ण करणार

: स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे आश्वासन

पुणे: शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये सुरु असलेली विकासकामे येत्या दीड महिन्यांत पूर्ण करून परिसरातील रस्ते सुस्थितीत आणले जातील. अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात येणार आहेत. असे ही रासने यांनी सांगितले.

: आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत विकास कामांची पाहणी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत रासने यांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शनिवार पेठ आणि केळकर रस्ता परिसरात सुरू असलेल्या मेट्रो, रस्ते, समान पाणीपुरवठा योजना, मैलापाणी शुद्धीकरण आदी विकासकामांची पाहाणी केली.
नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, उपायुक्त अविनाश सकपाळ, पथ विभागाचे प्रमुख विजय शिंदे, मैलापाणी शुद्धीकरण विभागाचे प्रमुख संतोष तांदळे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, नंदकुमार जगताप, आशिष म्हाडाळकर यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप काळोखे, किरण जगदाळे, परेश मेहेंदळे, अमित गोखले, मनिष जाधव, दिलीप पवार, अनिल बेलकर, विनायक रासने, सौरभ रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रासने म्हणाले, एप्रिल महिन्यापासून या परिसरात विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. या कामांची गती खूपच संथ आहे. काही भागात काम झाल्यानंतर रस्ते डांबर आणि सिमेंट कॉंक्रिट टाकून बुजविले आहेत. हे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने काही भागातील रस्ते खचले आहेत. तर काही भागातील रस्त्यांची पातळी असमान झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
रासने पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्तांसमवेत या भागाची पाहाणी केली. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. परंतु प्रशासनाचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून आज आयुक्तांसोबत पाहाणी करून त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. पाहाणी दरम्यान समस्यांची नोंद करण्यात आली. सर्व खात्यातील समन्वयाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून विकासकामे पूर्ण करण्यात येतील. पुढील दीड महिन्यांत या परिसरातील सर्व विकासकामे पूर्ण होऊन रस्ते सुस्थितीत येतील अशी ग्वाही देतो.

प्रभाग विकासाचा आराखडा (मॉडेल)

सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रभागात ज्या समस्या आहेत तशाच समस्या अन्य ४१ प्रभागात आहेत. आजच्या पाहाणी दौऱ्यातून एक विकासाचा आराखडा (मॉडेल) तयार करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी पुढील दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल. हा आराखडा अन्य प्रभागांमध्ये राबवून पुढील काळात त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे पुणेकरांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला.

Leave a Reply