Spread the love

भाजप आणि मनसे युतीबाबत शरद पवारांचे सूचक वक्तव्य

राज ठाकरेंनी मनसेच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणापासूनच भाजपा आणि मनसे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरेंनी भाजपावर टीका करणं टाळून फक्त महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर टीका केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात मनसे भाजपासोबत जाऊन कडवं आव्हान उभं करणार का? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला असता शरद पवारांनी केलेलं सूचक विधान मनसेच्या भविष्यातील राजकारणाविषयी तर्क-वितर्कांमध्ये भर घालणारं ठरलं आहे.

जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी मनसेच्या राजकीय भवितव्याविषयी देखील भाष्य केलं. सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मनसे त्यांच्या भूमिकेच्या आधारावर आपली जागा निर्माण करू शकेल का? असा प्रश्न विचारला असता आत्तापर्यंत तसं काही झालं नसल्याचं शरद पवार म्हणाले. “ते मला सांगता येणार नाही. आत्तापर्यंत तर काही झालं नाही. पण सामाजिक ऐक्य धोक्यात येता कामा नये”, असं शरद पवार म्हणाले

“तुम्ही काहीही भूमिका घेतली तरी आमची भूमिका महत्त्वाची नाही. आमच्याबद्दल लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. राज ठाकरेंबद्दल लोकांनी गेल्या निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे”, असा टोला देखील त्यांनी लगावला.

राज ठाकरे हिंदूजननायक?

दोन दिवसांपासून राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक म्हणून करणाऱ्या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता मनसेला त्यांचं धोरण ठरवण्याचा अधिकार असल्याचं शरद पवार म्हणाले. “त्यांची जी भूमिका दिसली, त्यात पहिल्यांदा त्या सभेतलं त्यांचं भाषण ऐकल्यानंतर असं दिसतंय की त्या रस्त्याने जायचा त्यांचा कार्यक्रम दिसतोय. प्रत्येक पक्ष आपला कार्यक्रम ठरवत असतो. त्यांनीही तसा कार्यक्रम ठरवला असेल”, असं शरद पवार म्हणाले.

मनसे आणि भाजपाची युती होऊ शकते?

दरम्यान, यावेळी सध्या चर्चेत असलेल्या भाजपा-मनसे युतीविषयी माध्यमांनी विचारणा करताच शरद पवारांनी ते शक्य असल्याचं नमूद केलं आहे. “मी सांगू शकत नाही. पण दोघांचंही लक्ष सध्या सत्तेत असणाऱ्या संघटनेवर आहे. त्यांना एकत्र यायचं असेल तर ते येऊ शकतात”, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

One reply on “BJP and MNS alliance : Sharad Pawar : भाजप आणि मनसे युतीबाबत शरद पवारांचे सूचक वक्तव्य ”

भाजपाची मनसे सोबत युती म्हणजे हाडळनिला नाही नवरा आणि झुटिंगाला नाही बायको अश्या पद्धतीची झाली तर होईल..
तसं झालं तर काही सांगता येणार नाही

Leave a Reply