Karnataka: Transgender: कर्नाटक सरकार तृतीयपंथीयांना देणार पोलिसांची नोकरी

Categories
Breaking News social देश/विदेश

कर्नाटक सरकार तृतीयपंथीयांना देणार पोलिसांची नोकरी 

विविध पदांसाठी अर्ज मागविले

बंगळूर : कर्नाटक सरकारने प्रथमच राज्य पोलिस खात्यातील भरतीसाठी तृतीयपंथी (transgenders) उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ‘कर्नाटक नागरी सेवा (सामान्य भरती) नियम- १९७७’ च्या दुरुस्तीनुसार तृतीयपंथीयांना एक टक्का नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक पोलिस विभागाने (Karnataka Police) विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

अलीकडेच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, कर्नाटक राज्य राखीव पोलिस (Karnataka State Reserve Police -KSRP)) दलात विशेष राखीव उपनिरीक्षकाची चार पदे आणि भारतीय राखीव बटालियनमध्ये एक पद राखीव असेल. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या ‘तृतीयपंथी (हक्कांचे संरक्षण) नियम- २०२०’ नुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक (भरती) यांनी सदर अधिसूचना प्रकाशित केली आहे. आता ७० पैकी पाच पदे तृतीयपंथीयांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पात्र उमेदवार १८ जानेवारीपर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये (एफएसएल) तृतीयपंथी उमेदवारांसाठी ‘सीन ऑफ क्राईम’ ऑफिसरसाठी तीन पदे राखीव ठेवण्यात आली आहेत त्यासाठी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील.

तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आम्ही कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यंदा आमच्या बाजूने निकाल आला. कर्नाटक पोलिस आम्हाला कामावर घेणार आहेत, हा एक स्वागतार्ह निर्णय आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या निशा गुल्लूर यांनी मांडलंय.