Maharashtra Lavni | पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका!

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Maharashtra Lavni | पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका!

Maharashtra Lavni | घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप लालित्यपूर्ण पडण्यास सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे वन्स मोअरचे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात पुणे नवरात्रौ महोत्सवात रविवारी दु. १२ ते रात्री १२ असा विक्रमी १२ तासांचा‘लावणी धमाका’श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला. महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज‘लावणी महोत्सव’पुणे नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम सुरू केला. त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो, असे भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) यांनी आज काढले. (Pune Navratri Mahotsav)
१० दिवसांच्या २९व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात रविवारी दु. १२ ते रात्री १२ अशा तब्बल १२ तासांच्या लावणी महोत्सवाचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नटराजपूजन व नारळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर व सुरेखा पुणेकर आणि आयोजक आबा बागुल व सौ. जयश्री बागुल उपस्थित होते.
खा. श्रीनिवास पाटील उद्घाटनाप्रसंगी म्हणाले, “आबा बागुल यांच्या प्रयत्नांतून सलग 29 वर्षांपासून नवरात्रौत्सव साजरा होत आहे. कन्यापूजनासह विविध उपक्रम साजरे करतात. लावणी महोत्सवात कलाकारांना व्यासपीठ मिळवून देतात,” असे सांगून त्यांनी आबा बागुल यांचे कौतुक केले. तसेच “लावणीसारख्या लोककलेला प्रतिष्ठेचे व्यासपीठ दिले हे फार मोठे योगदान आहे,” असे ते म्हणाले.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आपल्या दिलखेचक अदाकारीने ‘कारभारी दमानं होऊ दमानं’ ही लावणी सादर करून वन्स मोअरची दाद मिळवली.  शिट्ट्या व टाळ्यांची दाद प्रेक्षकांनी दिली. यावेळी त्या म्हणाल्या, देवी आणि आबा बागुल हे एक समीकरण आहे. मला आनंद वाटतो, आबा यांच्या हातून देवीची सेवा होते. त्यांच्यामुळे नवरात्रोत्सवात कलाकारांना व्यासपीठ मिळते. आम्हा सर्व कलाकारांना महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. आबांच्या हातून अशीच गोरगरीबांची सेवा होत राहावी,  अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
१२ तास चालेल्या या लावणी महोत्सवात ‘तुमच्यासाठी कायपन’ लावणी सम्राज्ञी पूनम कुडाळकर, मृणाल लोणकर, ‘नटखट सुंदरा’ नृत्यांगना आरती पुणेकर, समृद्धी पुणेकर, ‘शिवानीचा नाद खुळा’  सिनेअभिनेत्री शिवानी कोरे, काव्या मुंबईकर, ‘लावणी धमाका’ नृत्यांगना सोनाली जळगावकर, शितल पुणेकर, ‘अहो नाद खुळा’ नृत्यांगना माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ नृत्यांगना नमिता पाटील, प्राची मुंबईकर सह त्यांच्या सहकार्‍यांनी तब्बल बारा तास ठसकेबाज लावणी सादर करुन प्रक्षेकांची वाहवा मिळविली.
महोत्सवाची सुरुवात ‘तुमच्यासाठी काय पण’ ग्रुपने गणेश वंदना सादर करून  केली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्यविष्कार दाखवून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी प्रेक्षकांनी शिट्या, टाळ्या व नृत्य करुन लावणीला वन्समोअरची दाद दिली. ‘विचार काय हाय तुमचा…’, ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा…’, ‘ज्वानीच्या आगीची मशाल हाती…’ या लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
‘विचार काय आहे तुमचा पाहूनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी…’, ‘कैरी मी पाडाची….’, ‘सांगना कशी दिसते मी नववारी साडीत…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनी अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा अशा एकाहून एक सरस’ अशा लावण्या व गौळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली.
या बरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’, ‘सोडा सोडा राय नांद खुळा…’ या लावणीने वन्समोअरची दाद मिळवली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यासह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, ‘नटरंग उभा…’, या ‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका ऊर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूणी गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी..’, ‘तुझ्या उसाला लागेल कोल्हा’,  ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या  लावण्यांचे सादरीकरणाने प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.
हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग 12 तास नृत्यांगणांनी आपली लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे,  रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, मुख्य संयोजक अमित बागुल, सागर बागुल यांच्यासह माजी नगरसेवक विशाल तांबे, उद्योगपती भारत देसरडा, अमित भगत, रितेश अगरवाल, रितेश राठोड, विठ्ठल चरवड, बाळासाहेब घुले, टी. एस. पवार, सतीश पवार, रमेश सोनकांबळे आदी पदाधिकारी व मान्यवर  उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत चालू राहिला. लावणीरसिकांनी सारे प्रेक्षगृह तुडुंब भरले होते.
—-