Maharashtra Lavni | पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका!

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Maharashtra Lavni | पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका!

Maharashtra Lavni | घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप लालित्यपूर्ण पडण्यास सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे वन्स मोअरचे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात पुणे नवरात्रौ महोत्सवात रविवारी दु. १२ ते रात्री १२ असा विक्रमी १२ तासांचा‘लावणी धमाका’श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला. महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज‘लावणी महोत्सव’पुणे नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम सुरू केला. त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो, असे भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) यांनी आज काढले. (Pune Navratri Mahotsav)
१० दिवसांच्या २९व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात रविवारी दु. १२ ते रात्री १२ अशा तब्बल १२ तासांच्या लावणी महोत्सवाचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नटराजपूजन व नारळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर व सुरेखा पुणेकर आणि आयोजक आबा बागुल व सौ. जयश्री बागुल उपस्थित होते.
खा. श्रीनिवास पाटील उद्घाटनाप्रसंगी म्हणाले, “आबा बागुल यांच्या प्रयत्नांतून सलग 29 वर्षांपासून नवरात्रौत्सव साजरा होत आहे. कन्यापूजनासह विविध उपक्रम साजरे करतात. लावणी महोत्सवात कलाकारांना व्यासपीठ मिळवून देतात,” असे सांगून त्यांनी आबा बागुल यांचे कौतुक केले. तसेच “लावणीसारख्या लोककलेला प्रतिष्ठेचे व्यासपीठ दिले हे फार मोठे योगदान आहे,” असे ते म्हणाले.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आपल्या दिलखेचक अदाकारीने ‘कारभारी दमानं होऊ दमानं’ ही लावणी सादर करून वन्स मोअरची दाद मिळवली.  शिट्ट्या व टाळ्यांची दाद प्रेक्षकांनी दिली. यावेळी त्या म्हणाल्या, देवी आणि आबा बागुल हे एक समीकरण आहे. मला आनंद वाटतो, आबा यांच्या हातून देवीची सेवा होते. त्यांच्यामुळे नवरात्रोत्सवात कलाकारांना व्यासपीठ मिळते. आम्हा सर्व कलाकारांना महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. आबांच्या हातून अशीच गोरगरीबांची सेवा होत राहावी,  अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
१२ तास चालेल्या या लावणी महोत्सवात ‘तुमच्यासाठी कायपन’ लावणी सम्राज्ञी पूनम कुडाळकर, मृणाल लोणकर, ‘नटखट सुंदरा’ नृत्यांगना आरती पुणेकर, समृद्धी पुणेकर, ‘शिवानीचा नाद खुळा’  सिनेअभिनेत्री शिवानी कोरे, काव्या मुंबईकर, ‘लावणी धमाका’ नृत्यांगना सोनाली जळगावकर, शितल पुणेकर, ‘अहो नाद खुळा’ नृत्यांगना माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ नृत्यांगना नमिता पाटील, प्राची मुंबईकर सह त्यांच्या सहकार्‍यांनी तब्बल बारा तास ठसकेबाज लावणी सादर करुन प्रक्षेकांची वाहवा मिळविली.
महोत्सवाची सुरुवात ‘तुमच्यासाठी काय पण’ ग्रुपने गणेश वंदना सादर करून  केली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्यविष्कार दाखवून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी प्रेक्षकांनी शिट्या, टाळ्या व नृत्य करुन लावणीला वन्समोअरची दाद दिली. ‘विचार काय हाय तुमचा…’, ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा…’, ‘ज्वानीच्या आगीची मशाल हाती…’ या लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
‘विचार काय आहे तुमचा पाहूनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी…’, ‘कैरी मी पाडाची….’, ‘सांगना कशी दिसते मी नववारी साडीत…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनी अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा अशा एकाहून एक सरस’ अशा लावण्या व गौळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली.
या बरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’, ‘सोडा सोडा राय नांद खुळा…’ या लावणीने वन्समोअरची दाद मिळवली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यासह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, ‘नटरंग उभा…’, या ‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका ऊर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूणी गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी..’, ‘तुझ्या उसाला लागेल कोल्हा’,  ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या  लावण्यांचे सादरीकरणाने प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.
हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग 12 तास नृत्यांगणांनी आपली लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे,  रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, मुख्य संयोजक अमित बागुल, सागर बागुल यांच्यासह माजी नगरसेवक विशाल तांबे, उद्योगपती भारत देसरडा, अमित भगत, रितेश अगरवाल, रितेश राठोड, विठ्ठल चरवड, बाळासाहेब घुले, टी. एस. पवार, सतीश पवार, रमेश सोनकांबळे आदी पदाधिकारी व मान्यवर  उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत चालू राहिला. लावणीरसिकांनी सारे प्रेक्षगृह तुडुंब भरले होते.
—-

Pune Navratri Mahotsav | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ललित पंचमीनिमित्त कन्यापुजानाचा भव्य सोहळा

Categories
Breaking News cultural social पुणे

                                                                                    Pune Navratri Mahotsav | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ललित पंचमीनिमित्त कन्यापुजानाचा भव्य सोहळा

Pune Navratri Mahotsav | वयोगट३ ते१२ वर्षांमधील१००० हून अधिकमुली, रंगीबेरंगी ड्रेस,कपाळावर चुनरी,चंद्रकोर, स्तोत्रपठण, लकी ड्राॅ,खाऊ अशा उत्साही वातावरणात शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमातामंदिराच्या प्रांगणात ललिता पंचमीनिमित्तपुणे नवरात्रौ महिला महोत्सव अंतर्गत आज कन्यापूजन कार्यक्रम संपन्न झाला.प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.सहभागी सर्व लहान मुलींच्या कपाळावर चुनरी,चंद्रकोरओम आणि कुमकुम टिलक सौ जयश्री बागुल यांनी लावलले .या सर्व लहान कन्यांचे पाय धुवून यावर स्वस्तिक चिन्ह काढण्यात आले.त्यानंतर औक्षण करून गजरे देण्यात आले. तसेच सामुहिक आरतीकरण्यात आली. (Aba Bagul)
यावेळी या मुलींनी नवारीसाडी, घागरा,पंजाबी ड्रेस असे रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते.या प्रसंगी अनेक मुलींनी गणपती स्तोत्र,श्रीसूक्त पठण, दुर्गास्तुतीतोंडपाठ म्हणून दाखवली आणि उपस्थितांची मने जिंकली. यावेळीपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लकी ड्राॅमधीलविजेत्या मुलींना दप्तर सायकल इत्यादी बक्षिसे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठनेते खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देण्यात आली तसेच सहभागीसर्व मुलींना टीफीन,वॉटर बॅग, क़ंमपास,लेजचे पाकीट  व खाऊ देण्यातआला. याप्रसंगीपुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजकअध्यक्ष व माजी उपमहापौर आबाबागुल यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रत्येकीला तू मोठी झाल्यावर काय होणार ? असेविचारले. यावर अनेकींनी डॉक्टर,पोलीस इन्स्पेक्टर, शास्त्रज्ञअशी उत्तरे दिली. यावर आबाबागुल म्हणाले की मुलींना मोठी स्वप्ने बघुद्यात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तताकरण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत घेतली पाहिजे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे खा. श्रीनिवास पाटील यांनी या प्रेरणादायी उपक्रमाबद्दलआबा बागुल व सौ. जयश्री बागुल यांचे कौतुक करून म्हंटले की, प्रत्येक मुलींनीशिकलेच पाहिजे तिच्यातील कला गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कन्यापुजनाची हीसंस्कृती प्रत्येक कुटुंबाने जोपासली पाहिजे.  पुणेनवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष जयश्री बागुल यांनीस्त्रीभृण हत्येविरूद्ध आवाज उठवण्याचे आवाहन करून म्हंटले कीपालकांनी याबाबत मुलगी झाली तरी आनंदच मानला पाहिजे.मुलीला खूप शिकवा किंवा विविध कलांमध्ये पारंगत करा.त्याचबरोबर आपले कुटुंब नातेवाईक, मित्र,शेजारी या सर्वांमध्ये स्त्री भृण हत्येबद्दल जागरण करा. यावेळी उद्योजिका अनुराधावाघोलीकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचेसूत्रसंचालन संगीता बागुल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्युल्त्ता साळी, सोनमबागुल , नुपूर बागुल आदींनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्राॅचा निकाल –
प्रथम क्रमांक -सीमा पाटील
द्वितीय क्रमांक -सबा शेख
तृतीय क्रमांक – स्वर्दा पोळेकर
उत्तेजनार्थ – हर्षदा लकडे

Pune Navratri Mahotsav | आपले प्रश्न आपणच सोडवण्याचा निर्धार करा | रुपाली चाकणकर

Categories
Breaking News cultural Political social पुणे
Pune Navratri Mahotsav | आपले प्रश्न आपणच सोडवण्याचा निर्धार करा |  रुपाली चाकणकर
Pune Navratri Mahotsav | ‘राज्य महिला आयोगाच्या (Women Commission for State of Maharashtra) माध्यमातून काम करताना कौटुंबिक कलहाची प्रकरणे सर्वाधिक असल्याचे दिसून येते. बेपत्ता होणाऱ्या मुलींचा प्रश्नही मोठा आहे. तसेच भृणहत्या आणि बालविवाह ही देखील समस्या आहे. यासाठी आपल्या सर्वांनाच मोठे काम करावे लागेल. आपली मुलगी १८ वर्षाची झाल्याशिवाय आणि स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय कोणत्याही आईने आपल्या मुलीचे लग्न करू नये हा संकल्प नवरात्रौनिमित्त केला पाहिजे’ असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हंटले.
 पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत संपन्न होणाऱ्या २४ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात लॉन टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले आणि स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री पाटील यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ११ हजार रुपये, देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा अध्यक्षा जयश्री बागुल, समितीच्या उपाध्यक्षा निर्मलाताई जगताप, सदस्या छायाताई कातुरे, विद्याताई साळी, अनुराधाताई वाघोलीकर व प्रांजली गांधी मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन झाल्यावर देवीची आरती करण्यात आली. ऋतुजा माने व सहकलावंतांनी याप्रसंगी गणेश वंदना सादर केली. महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करतांना म्हंटले की “नवरात्रौ हा स्त्री शक्तीचा महोत्सव आहे. घरातील प्रत्येक मुलीला शिकवलेच पाहिजे. विविध सामाजिक प्रश्नांमुळे मुलींची घटती संख्या आणि मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे याकडे समाजाने विचारमंथन केले पाहिजे.”
याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष  व पुण्याचे माजी महापौर आबा बागुल म्हणाले की ,  हा महिला महोत्सव सलग २४ वर्षे चालू आहे. ही सारी श्री. लक्ष्मीमातेचीच कृपा आहे. पुणे नवरात्रौ महोत्सव व पुणे नवरात्रौ महिला महोत्सव या माध्यमातून हजारोंना आधार देण्याचे विविध उपक्रम सातत्याने चालू असून सांकृतिक , शैक्षणिक, सामजिक, धार्मिक , अध्यात्मिक याबरोबरच हरवेलेले संस्कार समाजात रुजवण्यासाठी ‘संस्कारमाला’ हे उपक्रम समाजाला आधार देतात याचे समाधान आहे.
याप्रसंगी रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, “मुलगी सासरी जातांना जमवून घे असे आई मुलीला सांगत असते. मात्र आता आईनी असे सांगितले पाहिजे की सासरचे तुला जेवढे सन्मानाने वागवतील त्याच्यापेक्षा जास्त सन्मानाने तू त्यांना वागव. मात्र हुंड्यासाठी छळ होऊ लागला तर जाब विचारायला शिक.
कुठलाही उपक्रम सुरु करणे सोप्पे असते चालू ठेवणे मात्र अवघड असते. गेली २४ वर्षे पुणे नवरात्रौ महिला महोत्सव मोठ्या उत्साहात चालू आहे ही कौतुकाची बाब आहे. जयश्री बागुलांच्या मागे आबा बागुल भक्कमपणे उभे आहेत ही कौतुकाची बाब आहे. आपल्याला संविधान देऊन महिलांना हक्क मिळून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाईंच्या हाती लेखणी देणारे महात्मा फुले हे पुरुषच होते. समाजात काम करतांना पती, भाऊ, वडील यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. मात्र आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात. त्यासाठी नवरात्रौनिमित्त संकल्प करूया असे त्या म्हणल्या.
सत्काराला उत्तर देताना Rescuing Every Distressed Indian Overseas (REDIO) संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री पाटील म्हणल्या की, “तेजस्विनी पुरस्कार मिळाला हा लक्ष्मीमातेचा आशीर्वाद आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात सुखरूप परत आणणे हे मी काम करते. यामध्ये महिलांना खूप मोठा आधार मिळत असतो. पुणे नवरात्रौ महोत्सवात परवा महर्षी पुरस्काराने सन्मानित होणारे डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे माझे गुरु असून त्यांचे फार मोठे सहकार्य या कामात मिळाले. तसेच माझे पती व कुटुंबीय यांचे देखील या कामी मोठे सहकार्य लाभले. त्यामुळे डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि माझे पती व कुटुंबीय यांना मी हा पुरस्कार समर्पित करते.”
आंतरराष्ट्रीय कीर्तीची लॉन टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले म्हणल्या की, “आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव उंचावण्याची संधी मला मिळाली याचे मला खूप समाधान आहे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती रामदासी यांनी केले. आभार प्रदर्शन महोत्सवाच्या उपाध्यक्षा निर्मला जगताप यांनी केले. कार्यक्रमात महिलांची प्रचंड मोठी गर्दी होती.
या उद्घाटन सोहळ्यानंतर महिलांसाठी असणारी ‘वेशभूषा’ स्पर्धा संपन्न झाली.
——-