Pulse Polio : 2 लाख 61 हजार 229 बालकांना पल्स पोलिओ डोस  : पुणे महापालिका आरोग्य विभागाची माहिती 

Categories
PMC आरोग्य पुणे

2 लाख 61 हजार 229 बालकांना पल्स पोलिओ डोस

: पुणे महापालिका आरोग्य विभागाची माहिती

पुणे : शहरातील शून्य ते पाच वर्षे वयाच्या 2 लाख 61 हजार 229 बालकांना रविवारी पल्स पोलिओ लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या हस्ते नारायण पेठेतील कै. कलावती मावळे दवाखन्यात करण्यात आला. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

यावेळी डॉ. वैशाली जाधव, डॉ. अंजली साबणे, डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद पाटील, मुख्य लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर आणि लसीकरण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयाच्या 2 लाख 61 हजार 229 बालकांना लस देण्यात आली. यासाठी 1 हजार 425 बुथ लावण्यात आले होते. या मोहिमेत 4 हजार 180 कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे स्थानक, बसस्थानक याठिकाणी 70 ट्रान्झिट टीम ठेवल्या होत्या.


या एक दिवसाच्या मोहिमेत ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही त्या बालकांना आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन पोलिओ डोस देणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.

Pulse Polio Vaccination : PMC : पल्स पोलिओ लसीकरण : पुणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्व प्रभागनिहाय १ हजार ४०० पोलिओ बूथ 

Categories
PMC आरोग्य पुणे

पल्स पोलिओ लसीकरण : पुणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्व प्रभागनिहाय १ हजार ४०० पोलिओ बूथ

पुणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम-२०२२’ अंतर्गत, येत्या रविवारी ( दि. २७ फेब्रुवारी) ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण आयोजित केले आहे. याकरिता पुणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्व प्रभागनिहाय १ हजार ४०० पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत.

या मोहिमेमध्ये शहरातील ३ लाख ११ हजार बालकांना पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रविवारी बूथ द्वारे लसीकरण पार पडल्यावर, सोमवार दि. २८ फेब्रुवारी ते शनिवार दि. ५ मार्च पर्यंत पाच दिवस सर्व प्रभागनिहाय आय.पी.पी.आय. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याद्वारे घरोघरी जाऊन ० ते ५ वयोगटातील बालकांनी पोलिओ डोस घेतला आहे की नाही याची माहिती घेऊन लस न घेतल्या बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. या काळात रेल्वेस्थानक, बस स्थानक, उद्याने, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बुथ कार्यरत राहणार आहे.

सदर मोहिमेसाठी ४ हजार ५५ स्वयंसेवक, २८० पर्यवेक्षक, १५ मुख्य पर्यवेक्षक, तसेच पुणे महापालिकेचे ९० डॉक्टर्स, ५ विभागीय अधिकारी, पुणे महापालिकेच्या नर्सेस व इतर कर्मचारी व्यतिरिक्त खाजगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, रोटरीयन्स, नर्सेस कॉलेजचे विदयार्थी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व्यतिरीक्त महिला बालविकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक, आशावर्कर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

या मोहिमेत ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना पोलिओ डोस देणे बंधनकारक असून, यावर्षी सदर मोहिम एकाच सत्रात राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील वीटभट्ट्या, स्थलांतरीत वस्त्या, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे अशा जोखमीच्या भागातील बालकांना लस देणेकरीता यावर्षी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

Pulse Polio : एक कोटी पंधरा लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन 

Categories
Breaking News social आरोग्य महाराष्ट्र

एक कोटी पंधरा लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन

: राज्यात 27 फेब्रुवारीरोजी पल्स पोलिओ मोहीम

मुंबई  : राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले. यंदाच्या वर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

बैठकीस आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, अवर सचिव मं.प. कुडतरकर, महिला बालकल्याण विभाग सहाय्यक आयुक्त नितीन मस्के, आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी सचिन खांडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. धीरेन कलवाडीया, डॉ. हेमंत बंगोलिया आदी उपस्थित होते.

डॉ. रामास्वामी यांनी सांगितले की, बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. या दोन्ही लसीकरणाचे नियोजन करताना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावर परिणाम होऊ देऊ नका. पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमही मिशन मोडवरच राबविणे आवश्यक आहे.

पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमेसाठी महसूल, पोलीस, सहकार, शिक्षण, महिला बालविकास आणि नगरविकास विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी यांना सहभागी करुन घ्यावे. याबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हास्तरावर प्रचार-प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेची केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. सहाय्यक संचालक डॉ. सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरण व्दारे दिली.
बैठकीस शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, पश्चिम रेल्वे, महिला बालकल्याण, ग्राम विकास विभाग, नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

:पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत

राज्यातील सर्व जिल्ह्यात २७ फेब्रुवारीला राबविणार
एक कोटी पंधरा लाखाहून अधिक बालकांना डोस देण्याचे नियोजन
राज्यासाठी १.५४ कोटी डोस उपलब्ध
राज्यात ९२९५३ बूथ उभारणार
आरोग्य विभागाची २६१२६९ पथके घरोघरी भेट देणार
ट्रान्झिट पथकांची संख्या २९१२१
मोबाईल पथकांची संख्या १५१८२
आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, एएनएम यांचा सहभाग घेणार
मिशन इंद्रधनुष्य लसीकरण
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लसीकरण केले जाणार
सात मार्च, चार एप्रिल आणि नऊ मे पासून सलग सात दिवस मोहिम राबविण्यात येणार.
नऊ जिल्हे आणि दहा महापालिका कार्य क्षेत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार
गर्भवती आणि दोन वर्षांखालील मुलांना लस देणार