Prashant Kishor : भारतामधील सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल  : प्रशांत किशोर यांचा मोदींना टोला

Categories
Breaking News Political देश/विदेश
Spread the love

भारतामधील सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल

: प्रशांत किशोर यांचा मोदींना टोला

उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपाचा ऐतिहासिक विजय म्हणजे २०२४ मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. त्याचा संदर्भ देत, मोदींनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपा यशाची पुनरावृती करेल असा दावा गुरुवारी चार राज्यांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशानंतर बोलताना केलाय. मात्र आता यावरुन निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोदींचा साहेब असा उल्लेख करत टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले?


भाजपाच्या मुख्यालयात केलेल्या भाषणात मोदींनी या चार राज्यांचे निकाल २०२४ मधील विजयाचे संकेत देत असल्याचं म्हटलं. ‘’उत्तर प्रदेशातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित केला होता असे काही विश्लेषकांचे म्हणणे होते. उत्तर प्रदेशतील २०२२ च्या निकालाने २०२४मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिक्कामोर्तब केले असे हे विश्लेषक आता सांगू लागतील. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २०२२ च्या उत्तर प्रदेशातील निकालातून स्पष्ट दिसतो’’, असे मोदी म्हणाले. २०१४ व २०१९ मध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, २०२४ची निवडणूक जिंकल्यास भाजपा सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करू शकेल.

प्रशांत किशोर यांचा टोला


मोदींनी केलेल्या या वक्तव्याला प्रशांत किशोर यांनी विरोध केलाय. “भारतामधील सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल आणि तेव्हाच त्याचा निकाल लागेल. कोणत्याही राज्यांच्या निवडणुकांवरुन हे ठरणार नाही,” असं ट्विट त्यांनी केलंय. तसेच पुढे बोलताना, “साहेबांना (मोदींना) हे ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यातील निकालांवरुन असं (२०२४ च्या विजयाचं) वातावरण तयार करुन मानसिक दृष्ट्या विरोधकांविरोधात आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केलाय,” असा टोला प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचा थेट उल्लेख टाळत म्हटलंय.

तसेच प्रशांत भूषण यांनी मतदारांनाही आवाहन केलं आहे. “या खोट्या कथानकाला बळी पडू नका किंवा त्याचा भाग होऊ नका,” असंही ते ट्विटच्या शेवटी म्हणालेत.

Leave a Reply