Scavenger | सफाई कामगारांच्या वारसांना लाभ देण्याबाबत महापालिका करणार अंमलबजावणी | वारसा हक्काची प्रकरणे सादर करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

सफाई कामगारांच्या वारसांना लाभ देण्याबाबत महापालिका करणार अंमलबजावणी

| वारसा हक्काची प्रकरणे सादर  करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

पुणे | सफाई कामगारांच्या (Scavenger)व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या (Lad Committee) शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून (State government) घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने (PMC Pune) देखील यावर अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. सफाई कामगारांच्या वारसांना लाभ देण्याबाबत वारसा हक्काची प्रकरणे सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी सर्व खात्याना दिले आहेत.

राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचे काम केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य दिले जाईल. वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी केल्यामुळे हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबीयांची अनेक वर्षांची मागणी मान्य झाली आहे.

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वारसा हक्काबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून एकत्रित नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका अंमलबजावणी करणार आहे. सफाई कामगारांच्या वारसांना लाभ देण्याबाबत वारसा हक्काची प्रकरणे सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सर्व खात्याना दिले आहेत. यामुळे महापालिका काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना चांगला आधार मिळणार आहे. (Pune Municipal Corporation)