Canal Advisory Committee : यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही  : पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही

: पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी

पुणे : शहरामध्ये उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात(Water supply) कोणतीही कपात करण्यात येणार नाही. शिवाय, जिल्ह्यातील सिंचनासाठी दोन उन्हाळी आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, खडकवासला प्रकल्पात सध्या उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. उन्हाळी पिकांसाठी आवर्तन आणि शहरातील पाण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार राहूल कूल, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी या वेळी उपस्थित होते. खडकवासला प्रकल्पामधून इंदापूर, दौंड, बारामती आणि हवेली तालुक्यातील सिंचनासोबत काही गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. परंतु उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पामधील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्यात सिंचनासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार असून, त्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या.भामा आसखेड धरणामधून जेवढे पाणी घेतले जात आहे, तेवढे पाणी खडकवासला प्रकल्पामधून कमी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत कामे प्रगतीपथावर आहेत. कामे होतील त्यानुसार खडकवासलामधून पाणी कमी करू, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

 

तर, यंदा धरणात पाणी कमी असल्यामुळे महापालिकेने पाणी काटकसरीने वापरावे, असा मुद्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडला. आळंदीला दोनशे दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, महापालिकेने स्वतंत्रपणे हे पाणी द्यावे, असा नियम नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र पाणीकोटा मंजूर करावा, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.

खडकवासला प्रकल्पातून शेतीला आवर्तने देताना शहराची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, ही आमची भूमिका होती. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले, याचे समाधान आहे. शहरात नवीन समाविष्ट २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुरेसे पाणी मिळणे आवश्यकच होते. पाणीगळती रोखण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. शिवाय २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरु असून, लवकरच पूर्ण करणार आहोत.

         – मुरलीधर मोहोळ, महापौर

Leave a Reply