Vidyadhar Anaskar : वैकुंठभाई मेहता संस्थेचे सहकार विद्यापीठात रुपांतर होणार : विद्याधर अनास्कर

Categories
Commerce पुणे
Spread the love

वैकुंठभाई मेहता संस्थेचे सहकार विद्यापीठात रुपांतर होणार : विद्याधर अनास्कर

 

पुणे : वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय प्रबंधन सहकारी संस्थेचे रुपांतर सहकार विद्यापीठात होणार असून, त्यासाठी या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अकरा कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चर्चा अर्थसंकल्पा’वर या चर्चासत्रात अनास्कर बोलत होते. अधिवक्ता गोविंद पटवर्धन, सनदी लेखापाल भरत फाटक, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.

अनास्कर पुढे म्हणाले, सहकार क्षेत्रासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयकर कमी करणे, अधिभार कमी करणे, सकारासाठी विविध योजना, जिल्ह्यांत ७५ डिजिटल बॅंका, एक लाख पंधरा हजार पोस्टांच्या माध्यमातून डिजिटल बॅंकिंग, सुक्ष्म लघु उद्योगांसाठी दोन लाख कोटी रुपयांचा निधी यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था गतीमान होण्यास मदत होईल.

पटवर्धन म्हणाले, जीएसटीची पूर्वलक्षी अंमलबजावणी योग्य नाही. जीएसटी हा मूल्यवर्धित कर आहे. इनपूटची पूर्णपणे वजावट मिळत नाही. दंडाची रक्कम, विलंब शुल्क यामुळे उत्पन्न वाढते. ते कराच्या माध्यमातून वाढले पाहिजे. त्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या पाहिजेत. जीएसटीतील चुका दुरुस्ती करण्यासाठी एक तरी संधी देणे आवश्यक होते.

फाटक म्हणाले, आयकर, जीएसटी, प्रत्यक्ष करात मोठी वाढ झाली असल्याने स्थैर्य देण्यासाठी त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. भांडवली खर्चात वाढ केल्याने पायाभूत सुविधांचा विकास होईल. त्यामुळे रोजगारांची निर्मिती होईल, क्षमता वाढतील, उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

पाठक म्हणाले, रस्ते, रेल्वेमुळे प्रवास गतीमान होणार आहे. त्यामुळे सामान्य माणसांना फायदा होईल. सामनान्य नागरिकाला वस्तू स्वस्त मिळावी यासाठी जीएसटीत आवश्यक बदल केले पाहिजेत. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांनी आवाज उठवला पाहिजे.

प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी स्वागत, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी प्रास्ताविक, सचिव सुहास पटवर्धन आणि खजिनदार सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन, सीमा तोडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply