State Co-operative Bank : राज्य सहकारी बँकेला ६०२ कोटींचा निव्वळ नफा : प्रशासक विद्याधर अनास्कर

Categories
Breaking News Commerce पुणे

राज्य सहकारी बँकेला ६०२ कोटींचा निव्वळ नफा : प्रशासक विद्याधर अनास्कर

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात एक हजार ४०२ कोटींचा ढोबळ नफा तर, ६०२ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच, नेट एन.पी.ए.चे प्रमाण शून्य असून, गेल्या १११ वर्षांतील उच्चांकी आर्थिक उलाढाल ४७ हजार २८ कोटी रुपयांपर्यंत पोचल्याची माहिती राज्य बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

राज्य बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. अनास्कर म्हणाले, राज्य बँकेने ३१ मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या सर्व आर्थिक निकषांचे पालन केले आहे. बँक प्रशासनाने राबविलेल्या विविध योजना आणि धोरणात्मक निर्णयामुळे बँकेची प्रगती होत आहे.राज्य बँक दरवर्षी मुख्यमंत्री सहायता निधीला पाच कोटींची रक्कम देते. बॅंकेच्या सभासदांना दरवर्षी १० टक्के लाभांश देण्यात येतो. बॅंकेच्या सहा कर्मचारी संघटनेसोबत करार करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना १२ टक्के भरीव वेतनवाढ दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवर एक टक्का अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सामाजिक बांधिलकी जपत कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘जिव्हाळा’ कर्ज योजना सुरू केली आहे.विविध कार्यकारी सोसायट्यांना थेट कर्जपुरवठाराज्य बँकेकडून अडचणीतील जिल्हा बँकांच्या अंतर्गत विविध कार्यकारी सोसायट्यांना थेट कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी नाबार्डने मंजुरी दिली असून, शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. राज्य बॅंकेने पीककर्जाचे ९७ टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केले असून, १७ हजार ७५७ कोटींचे कर्जवाटप केले आहे. काही राष्ट्रीयकृत बॅंकांनी केवळ ३७ टक्केच पीककर्ज पुरवठा केला आहे. उद्दिष्ट्य पूर्ण न करणाऱ्या अशा बॅंकांवर कारवाई झाली पाहिजे, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (२०२१-२२)

ढोबळ नफा : १ हजार ४०२ कोटीनिव्वळ नफा : ६०२ कोटीबँकेचा स्वनिधी : ६ हजार कोटीउच्चांकी उलाढाल : ४७ हजार २८ कोटीलेखापरीक्षण : ‘अ’ ऑडिट वर्गबँकेच्या प्रगतीची मुख्य कारणेस्वेच्छानिवृत्ती योजनेद्वारे कर्मचारी कपात, बँकेच्या नफा क्षमतेत वाढजिल्हा बँका, साखर कारखान्यांपर्यंत व्यवहार मर्यादित न ठेवता नागरी बँका, पतसंस्था, औद्योगिक क्षेत्राचा समावेशनागरी बँकांना सरकारी कर्जरोखे खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म, आरटीजीएस, एनईएफटी व्यवहारांसाठी पोर्टलसहकारी बँकिंग क्षेत्रासाठी ‘सायबरऑपरेशन सेंटर’ग्राहकांसाठी विदेश विनिमय व्यवहारबचत खात्यावरील व्याजदरात चार टक्क्यांपर्यंत वाढसाखर उद्योग, सूत गिरण्यांसाठी आत्मनिर्भर, एकरकमी परतफेड कर्ज योजना

Prisoners loan Scheme : ‘जिव्हाळा’ कर्ज योजनेतून आपलेपणाची भावना वाढीस लागेल : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

‘जिव्हाळा’ कर्ज योजनेतून आपलेपणाची भावना वाढीस लागेल

: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

पुणे : कैद्यांची मानसिकता आणि वर्तणुक बदलण्यासाठी प्रयत्न करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून, ‘जिव्हाळा’ कर्ज योजनेतून कैद्यांचा कुटुंबाशी सलोखा वाढून आणि आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतर्फे ‘जिव्हाळा’ या कारागृहातील कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या कर्ज योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी येरवडा कारागृहात करताना वळसे-पाटील बोलत होते. कारागृह सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, प्रभारी कारागृह उपमहनिरीक्षक (मुख्यालय) सुनील ढमाल, अधीक्षक राणी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

वळसे-पाटील पुढे म्हणाले, ‘अनेकदा कळत नकळत चुका झाल्याने कारावास भोगावा लागतो. नंतर पश्चातापाची भावना निर्माण होते. चूक अक्षम्य असली तरी सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी कारागृह सुधारगृह बनावे या उद्देशाने आखण्यात आलेल्या योजनांतून कैद्यांचा शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आध्यात्मिक विकास होत आहे. शिक्षा संपल्यावर उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे आणि त्याला सामान्य माणसासारखे जीवन जगण्याची इच्छा निर्माण व्हावी यासाठी त्याच्या आवडी-निवडी जोपासत प्रशिक्षण दिले जाते. मानवी मूल्यांवर आधारित योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. शिक्षा भोगल्यानंतर कैद्यांना समाजाने स्वीकारावे यासाठी समाजाचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे.’

अनास्कर म्हणाले, ‘शिक्षा संपल्यानंतर कैद्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना आहेत. मात्र कैद्याच्या उत्पनावर आधारित कर्जफेडीची सुविधा असणारी ही जगातील पहिलीच योजना आहे. देशात १ हजार ३०६ तुरुंग असून, ४ लाख ८८ हजार कैदी आहेत. १८ ते ३० वयोगटातील कैद्यांचे प्रमाण ४२ टक्के इतके आहे. त्यांच्यावर कुटुंबियांची फारशी जबाबदारी नसते. मात्र ३० ते ५० वयोगटातील ४१ टक्के कैद्यांवर कुटुंबाची जबाबदारी असते. कुटुंबासाठी आर्थिक मदत केली पाहिजे अशी त्यांची भावना असते. त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. केवळ सात टक्के व्याज दराने ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. व्याजाच्या रकमेपैकी १ टक्का रक्कम कैद्यांच्या कल्याण निधीसाठी दिली जाणार आहे. सध्या शेतीसाठी ७० टक्के कर्जदारांनी अर्ज केलेले आहेत. आजचा कर्जदार उद्याचा ठेवीदार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.’

कुलकर्णी म्हणाले, ‘२२२ पुरुष आणि ७ महिला कैद्यांनी या योजने अंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. आज प्रातिनिधिक स्वरूपात ५ जणांना कर्ज वाटण्यात आले. कर्ज मंजुरीची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होते. येरवडा कारागृहात सुरू झालेली ही योजना कैद्यांसाठी उपयुक्त असून ती निश्चित यशस्वी होईल.’

योगेश देसाई यांनी प्रास्ताविक आणि डॉ. अजित देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

 

नवीन कारागृहे निर्माण करणार

राज्यातील विविध कारागृहांमध्ये होणाऱ्या कैद्यांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन अत्याधुनिक, चांगल्या सुविधा असणारी कारागृहे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. कारागृहाच्या सुविधा विभागाने याबाबतचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करावा. सरकार निश्चित मदत करेल.

State Co-operative Bank : राज्य सहकारी बँक कैद्यांना देणार कर्ज!

Categories
Breaking News Commerce social पुणे महाराष्ट्र

राज्य सहकारी बॅंकेचा कैद्यांना मिळणार ‘जिव्हाळा’

जगातील पहिलीच कर्ज योजना महाराष्ट्र दिनापासून होणार सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतर्फे ‘जिव्हाळा’ या कारागृहातील कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या कर्ज योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी (१ मे) दुपारी दीड वाजता येरवडा कारागृहात करण्यात येणार असल्याची माहिती बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

अनास्कर म्हणाले, ‘दीर्घ मुदतीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, आरोग्य, मुलांचे शिक्षण आणि शिक्षेच्या कालावधीनंतर कैद्यांचे पुनर्वसन सोपे व्हावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. कैद्यांना कारागृहातून मिळणाऱ्या उत्पन्नातून (मोबदला) कर्जाची परतफेड होणार आहे. या योजनेमुळे कैदी आणि त्याच्या कुटुंबातील सलोखा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ‘जिव्हाळा’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.’

अनास्कर म्हणाले, ‘प्रथमच गुन्हा केलेला कैदी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. वार्षिक ७ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जासाठी तारण किंवा जामीनदाराची आवश्यकता असणार नाही. कर्जाची जबाबदारी राज्य शासनावर राहणार नाही. राज्य बॅंकेत कर्जदाराचे खाते उघडण्यात येणार असून, त्यामध्ये त्याचे उत्पन्न जमा करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची राहणार आहे. या खात्यातून कर्जाची परतफेड होणार आहे. कर्ज परतफेड रकमेच्या १ टक्के निधी कैद्यांच्या कल्याण निधीत जमा केला जाणार आहे.’

अनास्कर पुढे म्हणाले, ‘राज्य बॅंकेने डिसेंबर २०२१ मध्ये या योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. राज्य शासनाने या वर्षी २२ मार्चला या प्रस्तावाला मंजुरी दिली. याच वर्षी २४ एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत भाषण करताना कारागृहातील कैद्यांसाठी राष्ट्रीय योजनेअंतर्गत आदर्श कायदा करण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये कैद्यांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतुद करण्यात आली होती. अशा प्रकारे केंद्र सरकारच्या धोरणाला सुसंगत योजना देशात राबविण्याचा मान राज्य सहकारी बॅंकेने पटकाविला आहे.’

Vidyadhar Anaskar : वैकुंठभाई मेहता संस्थेचे सहकार विद्यापीठात रुपांतर होणार : विद्याधर अनास्कर

Categories
Commerce पुणे

वैकुंठभाई मेहता संस्थेचे सहकार विद्यापीठात रुपांतर होणार : विद्याधर अनास्कर

 

पुणे : वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय प्रबंधन सहकारी संस्थेचे रुपांतर सहकार विद्यापीठात होणार असून, त्यासाठी या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अकरा कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चर्चा अर्थसंकल्पा’वर या चर्चासत्रात अनास्कर बोलत होते. अधिवक्ता गोविंद पटवर्धन, सनदी लेखापाल भरत फाटक, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.

अनास्कर पुढे म्हणाले, सहकार क्षेत्रासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयकर कमी करणे, अधिभार कमी करणे, सकारासाठी विविध योजना, जिल्ह्यांत ७५ डिजिटल बॅंका, एक लाख पंधरा हजार पोस्टांच्या माध्यमातून डिजिटल बॅंकिंग, सुक्ष्म लघु उद्योगांसाठी दोन लाख कोटी रुपयांचा निधी यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था गतीमान होण्यास मदत होईल.

पटवर्धन म्हणाले, जीएसटीची पूर्वलक्षी अंमलबजावणी योग्य नाही. जीएसटी हा मूल्यवर्धित कर आहे. इनपूटची पूर्णपणे वजावट मिळत नाही. दंडाची रक्कम, विलंब शुल्क यामुळे उत्पन्न वाढते. ते कराच्या माध्यमातून वाढले पाहिजे. त्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या पाहिजेत. जीएसटीतील चुका दुरुस्ती करण्यासाठी एक तरी संधी देणे आवश्यक होते.

फाटक म्हणाले, आयकर, जीएसटी, प्रत्यक्ष करात मोठी वाढ झाली असल्याने स्थैर्य देण्यासाठी त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. भांडवली खर्चात वाढ केल्याने पायाभूत सुविधांचा विकास होईल. त्यामुळे रोजगारांची निर्मिती होईल, क्षमता वाढतील, उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

पाठक म्हणाले, रस्ते, रेल्वेमुळे प्रवास गतीमान होणार आहे. त्यामुळे सामान्य माणसांना फायदा होईल. सामनान्य नागरिकाला वस्तू स्वस्त मिळावी यासाठी जीएसटीत आवश्यक बदल केले पाहिजेत. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांनी आवाज उठवला पाहिजे.

प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी स्वागत, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी प्रास्ताविक, सचिव सुहास पटवर्धन आणि खजिनदार सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन, सीमा तोडकर यांनी आभार प्रदर्शन केले.