Pune : School : College : पहिली ते नववीच्या शाळा, महाविद्यालये उद्यापासून सुरू  :  १५ ते १८ वयोगटाच्या लाभार्थ्यांना फिरत्या वाहनातून लस

Categories
Breaking News Education पुणे
Spread the love

पहिली ते नववीच्या शाळा, महाविद्यालये उद्यापासून सुरू

:  १५ ते १८ वयोगटाच्या लाभार्थ्यांना फिरत्या वाहनातून लस

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील पहिली ते आठवीच्या शाळा अर्धवेळ (चार तास), तर नववीचे वर्ग पूर्णवेळ उद्यापासून (१ फेब्रुवारी) सुरू होणार आहेत. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणे पालकांना बंधनकारक नाही. तसेच १५ ते १८ वयोगटाच्या लाभार्थ्यांना फिरत्या वाहनातून (मोबाइल व्हॅन) लस दिली जाणार आहे. याशिवाय महाविद्यालयेही १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळेल.

 ‘पुण्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने शहरासह जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा अर्धवेळ, तर नववीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण ८६ टक्के झाले आहे. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये या वयोगटाचे लसीकरण कमी झाले आहे. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात लसीकरण होऊनही पुणे, पिंपरी-चिंचवडमुळे राज्याच्या तुलनेत १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण सरासरीमध्ये कमी दिसून येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांचे फिरत्या वाहनातून लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास जवळच एका खोलीत उपचारांची व्यवस्थाही केली जाणार आहे. याबाबतचे आदेश सर्व संस्थाचालक आणि शाळांना दिले जातील. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत आहेत. मात्र, लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल.

दरम्यान, शाळा, महाविद्यालये सुरू होणार असली, तरी पालकांनी मुलांना शाळा, महाविद्यालयात पाठवायचे किंवा कसे, याबाबतचे बंधन सध्या असणार नाही. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत मुखपट्टी काढावी लागू नये म्हणून दुपारची सुट्टी झाल्यानंतर घरीच जेवणाला मुलांनी जावे म्हणून सध्या शाळेची वेळ चार तासच ठेवण्यात आली आहे. बाधितांचे प्रमाण पाहून पुढील आठवडय़ात पहिली ते आठवीचे वर्गही पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

Leave a Reply