Talathi recruitment | 3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | 3 हजार 628 पदे निर्मितीला राज्य शासनाची मान्यता

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र
Spread the love

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

| महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

| 3 हजार 628 पदे निर्मितीला राज्य शासनाची मान्यता

तलाठी भरती (Talathi Recruitment) आणि मंडळ अधिकारी (Circle officer) पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Revenue minister radhakrishn vikhe patil) यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. मंत्री श्री. विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते.तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे असते. आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसुली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या 3 हजार 110 साझे आणि 518 महसुली मंडळ कार्यालयासाठी 3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण 3 हजार 628 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 7 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

पुणे महसुली विभागाअंतर्गत एकूण 602 तलाठी साझे आणि 100 महसुली मंडळे आहेत. अमरावती महसुली विभागाअंतर्गत एकूण 106 तलाठी साझे आणि 18 महसुली मंडळे आहेत. नागपूर महसूली विभागाअंतर्गत एकूण 478 तलाठी साझे आणि 80 महसुली मंडळे आहेत. औरंगाबाद महसुली विभागाअंतर्गत एकूण 685 तलाठी साझे आणि 114 महसुली मंडळे आहेत. नाशिक महसुली विभागाअंतर्गत एकूण 689 तलाठी साझे आणि 115 महसुली मंडळे आहेत. कोकण महसुली विभागाअंतर्गत एकूण 550 तलाठी साझे आणि 91 महसुली मंडळे आहेत.