Farmers Protest Support: केंद्र सरकार विरोधात सर्व भाजपेतर पक्षांची पुण्यात एकजूट

Categories
Political देश/विदेश पुणे
Spread the love

केंद्र सरकार विरोधात सर्व भाजपेतर पक्षांची पुण्यात एकजूट

: कृषी कायदे मागे घेण्याची मागणी

पुणे:  ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांचा पुतळा येथे देश पातळीवरील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या या मागणीसाठी विविध पक्ष आणि संघटना यांनी एकजूट केली होती.

: वेगवेगळ्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला

 तिरंगी झेंड्यावरील घड्याळ किंवा हात,भगवा झेंडा,पांढरे घोड्यावरून झाडू चिन्ह,पांढर्‍या हिरव्या झेंड्यावरील डोक्यावर मोळी घेतलेली शेतमजूर स्त्री,लाल झेंड्यावरील विळा-हातोडा अशा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस,साम्यवादी पक्ष,आम आदमी पक्ष,जनता दल धर्मनिरपेक्ष,शिवसेना या विविध पक्षांचे शहर प्रमुख आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे जमले होते. केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या,बेबंद खाजगीकरण थांबवा,बेरोजगारीला आळा घाला,रेल्वे-विमानतळ-बँका- एलआयसी अशा सार्वजनिक संपत्तीची विक्री करू नका,महागाईला आळा घाला अशा जोरदार घोषणा कार्यकर्ते देत होते. निमित्त होते आज किसान संयुक्त मोर्चाने दिलेल्या भारत बंदच्या आवाहनाचे,या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या पक्ष आणि कष्टकरी संघटना,लोकायत,कामगार संघटना,दगडखाण कामगार संघटना इत्यादी संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्या वतीने याआधी प्रमाणे आजही किसान मोर्चाच्या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला. तर बंदचा संयुक्त कार्यक्रम म्हणून आज येथे असंतोष प्रकट सभा घेण्यात आली. लोकमान्य टिळक यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? आणि राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हे दोन अग्रलेख लिहून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले होते. गेले तीनशे पाच दिवस थंडी-ऊन-वारा-पावसातही सुरू असलेले आंदोलन व  604 हुतात्मे यांचे बलिदान होऊनये शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार प्रतिसाद देत नाही. म्हणून हे दोन प्रश्न आजच्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला विचारण्यासाठी असंतोष प्रकट सभा घेण्यात आली होती. सभेत  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे व बाळासाहेब भांड,जनता दल धर्मनिरपेक्ष चे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्र्दत,मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव एडवोकेट नाथा शिंगाडे, भारतीय साम्यवादी पक्षाचे पदाधिकारी अरविंद जक्का,कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक प्रा. अजित अभ्यंकर, स्त्री मुक्ती समितीच्या मेधा थत्ते, लोकायतचे नीरज जैन- अलका जोशी,बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे शिरीष राणे यांनी मार्गदर्शन केले. सभेत वरील पक्षांसह हमाल पंचायत,कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत,मोलकरीण संघटना,रिक्षा पंचायत आदी  संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

: केंद्र सरकारवर टीका

    यावेळी बोलताना वक्त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पंजाबमधील शेतकऱ्यांचं प्रमाण मोठे आहे आणि आज शहीद भगतसिंग यांची जयंती आहे,याचा संदर्भ देऊन जालियनवाला बाग हत्याकांड उल्लेख वक्त्यांना केला. अंदाधुंद गोळीबार करून 380 स्त्री-पुरुष-लहान मुलांना ठार केले होते. गेले तीनशे पाच दिवस सुरू असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनात 604 हुतात्मे झालेत,अजुन किती जणांचे बळी नरेंद्र मोदी भाजपा सरकारला हवे आहेत ? असा तिखट प्रश्न यावेळी विचारण्यात आला. तसेच केंद्र सरकार सतत गॅस दरवाढ करत आहे त्यासाठी चुकीच्या आणि खोट्या माहितीचा संदर्भ देत आहे.  आपल्या देशात आपल्या गरजेच्या 50 टक्के इतका स्वयंपाकाचा गॅस निर्माण होतो. उर्वरित 50 टक्के  गॅस आयात करावा लागतो. मात्र या सर्व शंभर टक्के गॅसला आयात गॅसचा एकच दर लावून सरकार भरमसाठ दरवाढ करत आहे. हीच बाब पेट्रोल डिझेल या इंधन दरवाढीची आहे.या इंधनावर प्रचंड कर केंद्र सरकारने लावलाय. काही प्रमाणात राज्य सरकारचाही त्यात वाटा आहे.  केंद्राच्या कराचा खूप कमी वाटा राज्य सरकारला मिळतो. मात्र त्याचे प्रमाण जास्त दाखवून केंद्र सरकार या दरवाढीचा खापर राज्य सरकारावर फोडते. तसेच संरक्षण सामग्रीचे उत्पादन करणारे सरकारी कारखाने केंद्र सरकार खाजगी उद्योजकांच्या घशात घालत आहे आणि देशातील सुरक्षा केंद्र सरकारने धोक्यात आणले आहे. याविषयी वक्त्यांनीही आकडेवारी सह प्रखर टीका केली.   भाजपप्रणित केंद्र सरकार आल्यावर आणि भाजपप्रणित राज्य सरकार जेथे आहे त्या ठिकाणी महिला अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. आणि या  केंद्र सरकारला सत्तेवरून खाली खेचे पर्यंत एकजुटीने संघर्ष चालू ठेवण्याचा निर्धार उपस्थितांनी  यावेळी केला. समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी प्रस्तावना केली. पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अभय छाजेड यांनी भूमिका मांडली. स्वप्नील भिसे यांनी सूत्रसंचालन केले. तर सचिन गाडे यांनी आभार मानले. दरम्यान किसान मोर्चाने केलेल्या बंदच्या आवाहनाला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुण्यातील मुख्य घाऊक धान्य बाजार,भाजीपाला आणि फळे बाजार  येथे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.  व्यापारी पेठाही अंशतः बंद होत्या. रिक्षाचालकांनी 11 ते 1 या वेळेत मोठ्या प्रमाणात बंद पाळला.  दैनंदिन व्यवहार बर्‍याच प्रमाणात सुरू होते.

Leave a Reply