Difference of 7th pay commission : अखेर 16 हजार मनपा कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन आयोगाचा फरक जमा : ‘कारभारी’ च्या पाठपुराव्याला यश 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

अखेर 16 हजार मनपा कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन आयोगाचा फरक जमा

: ‘कारभारी’ च्या पाठपुराव्याला यश 

: महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण 

 
पुणे : गेल्या कित्येक महिन्यापासून पुणे महापालिकेचे कर्मचारी वेतन आयोगाच्या 10 महिन्याचा फरक मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. कर्मचाऱ्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने विषय लावून धरला होता. त्याला यश आले असून अखेर 16 हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/ कर्मचारी यांना  शासन आदेशानुसार ७ वा वेतन आयोग मंजूर करण्यात आला असून सुधारीत वेतनश्रेणी नुसार माहे नोव्हेंबर २०२१ चे वेतन प्रत्यक्ष आदा करण्यात आलेले आहे.  ७ व्या वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष वेतन दिनांक ०१.०१.२०२१ पासून देणेबाबत नमूद आहे. त्यानुसार मनपा अधिकारी/ कर्मचारी यांना दि.०१.०१.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीतील वेतनातील फरकाच्या थकबाकीची रक्कम रोखीने त्वरित आदा होणे आवश्यक होती. मात्र 10 महिन्याची रक्कम मिळण्यास उशीर होत होता. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये रोष होता. दरम्यान वित्त व लेखा विभागाने फरक देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठवला होता. मात्र विभागाने फरक देण्याबाबत आयुक्तांकडून मार्गदर्शन मागितले होते. आयुंक्तांकडून याबाबत निर्णय होत नव्हता. अखेर महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार लगेच वित्त व लेखा विभागाने  सर्क्युलर जारी केले. लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र 11 तारीख उलटून गेली तरीही कमर्चाऱ्यांना फरक किंवा वेतन मिळाले नव्हते. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने विषय लावून धरला होता. या पाठपुराव्यास यश आले आहे. वित्त व लेखा विभागाने सगळी बिले तयार करून 16 हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली आहे. यासाठी 177 कोटी रूपये खर्ची पडले आहेत. असे वित्त व लेखा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

—-
महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा 10 महिन्याचा फरक देण्यात आला आहे. यासाठी 177 कोटी रुपये देण्यात आले. दरम्यान हा विषय मार्गी लावताना खूप तांत्रिक अडचणी होत्या. मात्र आमच्यासाठी शेवटचा कर्मचारी देखील महत्वाचा होता. त्यानुसार आम्ही मेहनत घेऊन कर्मचाऱ्यांना फरक अदा केला आहे. वेतन देखील लवकरच दिले जाईल. 
: उल्का कळसकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, महापालिका 
सांख्यिकी विभाग आणि वित्त विभागाने एकत्रित प्रयत्न करत  कर्मचाऱ्यांना वेतन आयोग अदा केला आहे. यासाठी दोन्ही विभागातील कर्मचारी, बिल लेखनिक, ऑडिटर यांनी खूप मेहनत घेतली. 
: राहूल जगताप, सिस्टिम मॅनेजर, माहिती व तंत्रज्ञान विभाग 
—-
 सांख्यिकी विभाग, लेखा व वित्त विभागाचे प्रयत्न आणि महापालिका कर्मचारी संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. विशेष करून बिल लेखनिक, ऑडिटर यांनी फार मेहनत घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळाली आहे. 
: आशिष चव्हाण, सरचिटणीस, पीएमसी एम्प्लॉईज युनियन 

Leave a Reply