Handa Morcha : PMC : माजी जलसंपदा राज्यमंत्री पुणे महापालिकेवर आणणार हंडा मोर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

माजी जलसंपदा राज्यमंत्री पुणे महापालिकेवर आणणार हंडा मोर्चा

: फुरसुंगी, उरुळी देवाची गावाची पाणी समस्या सोडवण्याची मागणी

पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाची ही दोनही गावे तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांना पाणीपुरवठासुद्धा नीट होत नसल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत. मी मंत्री असताना जलसंपदा विभागाला निर्देश देऊन कालव्याद्वारे नियमित पाणी सोडत होतो. मात्र आता नागरिक परेशान आहेत. त्यामुळे या गावांची पाणी योजना 15 दिवसांत पूर्ण नाही झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेला दिला आहे.

: गावांना व्यवस्थित पाणीपुरवठा नसल्याची केली तक्रार

शिवतारे यांच्या पत्रानुसार फुरसुंगी, उरुळी देवाची ही दोनही गावे तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नसल्याने येथील लोकांच्यात तीव्र रोष आहे. त्यातच अलीकडे या गावांना पाणीपुरवठासुद्धा नीट होत नसल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायत असताना पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात होता. अडचणीच्या काळात मी जलसंपदा विभागाला निर्देश देऊन कालव्याद्वारे नियमित पाणी सोडत होतो. निदान त्याद्वारे स्थानिक टैंकर्स घरोघरी पाणीपुरवठा करीत होते. दुर्दैवाने महापालिकेत गेल्यानंतर या गावांचा पाणीपुरवठा सुधारण्याऐवजी पूर्ण कोलमडून गेला आहे.

: पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांच्या या मागण्यांचा विचार व्हावा

१) ग्रामपंचायतची जुनी पाणीयोजना आणि जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करावा जेणेकरून पाणीपुरवठा सुरळीत व्हायला मदत होईल.
२) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला मनपाकडून देय असलेला निधी लवकरात लवकर वर्ग करावा.
३) फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीयोजना लवकरात लवकर पूर्ण करावी.

या बाबत १५ दिवसात समाधानकारक कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव पुणे मनपावर हंडा मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी हे पत्र हीच नोटीस समजण्यात यावी. असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.

Leave a Reply